Dharashiv Politics धाराशिव, गणेश जाधव : वाशी तालुक्यातील ठाकरेंच्या उपतालुका प्रमुखाने शेतातील कांद्याच्या पिकात अफूची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यानंतर आता अफू लागवड प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या उपतालुका प्रमुख समाधान मनोहर उघडे यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून तात्काळ हकालपट्टी करण्यात आली आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. बेकायदेशीर प्रकारला पाठिंबा देणार नाही, असा ठाम संदेश ओमराजे निंबाळकर यांनी कृतीतून दिलाय.
ADVERTISEMENT
ओमराजे निंबाळकर त्यांच्या पोस्टमध्ये काय म्हणाले?
समाधान उघडे यांनी स्वतःच्या शेतीमध्ये अफूची लागवड केल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे. या बेकायदेशीर कृत्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली असून संघटनेच्या शिस्तीला गंभीर धक्का बसल्याचे ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केले आहे. पक्षाच्या विचारसरणीला आणि शिस्तीला बाधा आणणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या कृत्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात कधीही थारा दिला जाणार नाही. त्यामुळे माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार समाधान उघडे यांची पक्षातून तत्काळ हकालपट्टी करण्यात येत असल्याचे पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणावर यापूर्वी मुंबई तक या वृत्तवाहिनीवर सविस्तर बातमी प्रसारित करण्यात आली होती. त्या बातमीत अफू लागवडीची संपूर्ण घटना मांडत ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेकडे लक्ष वेधण्यात आले होते. या वृत्तानंतर राजकीय हालचालींना वेग आला आणि त्यानंतर थेट पक्षांतर्गत कठोर कारवाई झाल्याने या निर्णयाचे महत्त्व अधिक ठळक झाले आहे.
हेही वाचा : आधी जावयासोबत अन् आता मेहुण्यासोबत पळाली; अनिताच्या प्रेमप्रकरणांची देशभर चर्चा
ओमराजे निंबाळकर यांनी यापूर्वी अनेक वेळा अवैध धंद्यांच्या विरोधात भूमिका मांडली आहे. एकीकडे अवैध व्यवसाय आणि समाजविघातक प्रवृत्तींच्या विरोधात सातत्याने भूमिका मांडण्यासाठी ओमराजे निंबाळकर ओळखले जातात. मात्र, दुसरीकडे त्यांच्या पक्षातीलच पदाधिकाऱ्यावर अफूची शेती केल्याचा गंभीर गुन्हा उघडकीस आला. या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली हकालपट्टी ही पक्षाच्या शिस्तीचा आणि भूमिकेचा स्पष्ट संदेश देणारी कारवाई मानली जात आहे. आता या प्रकरणात त्यांनी कृतीतूनच आपण कोणत्याही बेकायदेशीर प्रकाराला पाठिंबा देणार नाही, असा ठाम संदेश ओमराजेंनी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
घटना नेमकी काय आहे?
धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील मौजे दशमेगाव शिवारात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपतालुका प्रमुखाने कांदा पिकाच्या आंतरपिकामध्ये बेकायदेशीररित्या अफूची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी केलेल्या कारवाईत 485 किलो 650 ग्रॅम वजनाची अफूची झाडे जप्त करण्यात आली असून त्याची अंदाजे किंमत 72 लाख 84 हजार 750 रुपये इतकी आहे.
11 फेब्रुवारी 2026 रोजी मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने सर्वे क्रमांक 163, मौजे दशमेगाव येथे छापा टाकून ही कारवाई केली होती. समाधान मनोहर उघडे, रा. दशमेगाव, ता. वाशी, जि. धाराशिव यांचे हे शेत असल्याचे निष्पन्न झाले होते. नायब तहसीलदार वाशी व शासकीय पंचांच्या उपस्थितीत अफूची झाडे जप्त करण्यात आली.
या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 45/2026 अन्वये एनडीपीएस कायदा 1985 कलम 8 (क) व 18 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार आणि वाशी पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











