दिग्गज नेते शाहांच्या भेटीला, पण सुनेत्रा पवारांची अनुपस्थिती कशामुळे? राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया

मुंबई तक

02 Nov 2026 (अपडेटेड: 02 Nov 2026, 01:41 PM)

Maharashtra Politics : अमित शाह यांच्या भेटीला सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार अनुपस्थित राहिल्याने राजकीय चर्चांना सुरुवात झाली. राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी या भेटीमागील कारण स्पष्ट केले.

Maharashtra Politics

Maharashtra Politics

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

दिग्गज नेते शाहांच्या भेटीला, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या?

point

राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Politics  : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. मात्र, या भेटीला पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच खासदार पार्थ पवार उपस्थित नसल्याने राजकीय चर्चांना सुरुवात झाली. या भेटीचा फोटो समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी प्रतिक्रिया देत भेटीमागील नेमके कारण स्पष्ट केले आहे. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना डावलून ही भेट झाल्याच्या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे या भेटीवरून निर्माण झालेल्या चर्चांना राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

हे वाचलं का?

अमित शाहांच्या भेटीवेळी कोणते नेते उपस्थित होते?

दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, समीर भुजबळ, हसन मुश्रीफ

विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला अपयश, अर्थखात्याची मागणी? कशावर चर्चा? 

या भेटीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेससमोर काही महत्त्वाचे राजकीय आणि पक्षाशी संबंधित प्रश्न आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या गटातील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे अपयश आले होते. त्यातच अजित पवार यांच्याकडे असलेले अर्थखाते त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आलेले नाही. हे खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे मिळावे, अशी पक्षाची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याने या बैठकीत नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली होती. विशेष म्हणजे या भेटीवेळी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार उपस्थित नसल्याने त्यांना बाजूला ठेवून ज्येष्ठ नेत्यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा सुरू झाली होती.

हेही वाचा : कुटुंबियांना वाटत होतं मुलगी लंडनमध्ये शिकतेय, पण पुण्यात मृतदेह सापडला!

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांचे स्पष्टीकरण

या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी समाजमाध्यमांवरून स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या दिल्लीतील भेटीला अनावश्यक राजकीय रंग देऊन पक्षांतर्गत मतभेदांचे कथानक निर्माण करण्याचा प्रयत्न दुर्दैवी आहे. यापूर्वी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार तसेच खासदार पार्थ पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीत स्वर्गीय अजितदादांच्या निधनानंतर पक्षासमोरील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली होती. त्याचवेळी सुनेत्रावहिनी पवार यांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे शिष्टमंडळ अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती दिली होती. तसेच या भेटीसाठी वेळ उपलब्ध करून देण्याची विनंतीही केली होती. त्यानुसार आजची भेट पूर्वनियोजित आणि औपचारिक स्वरूपाची होती. या बैठकीत संबंधित ज्येष्ठ नेत्यांनी आपापल्या मतदारसंघांमधील विविध प्रश्न मांडले. तसेच महायुतीतील मित्रपक्षांच्या नेत्यांमध्ये होणारी अनौपचारिक चर्चा आणि विचारांची देवाणघेवाणही झाली, असे उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.

सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना डावलून ही भेट झाल्याच्या बातम्या पूर्णतः चुकीच्या, तथ्यहीन आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याचा दावा उमेश पाटील यांनी केला. काही अदृश्य शक्तींकडून अशा बातम्या पसरवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद आहेत आणि नेतृत्वामध्ये समन्वय नाही, असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी म्हटले. हा निव्वळ खोडसाळपणा असल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस हा महायुतीचा महत्त्वाचा घटक असून पक्ष राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रावहिनी पवार यांच्या नेतृत्वाखाली एकसंघ आणि एकदिलाने काम करत असल्याचे उमेश पाटलांनी स्पष्ट केले. माध्यमांनी बातम्या प्रसिद्ध करताना वस्तुस्थितीची खातरजमा करावी आणि केवळ तर्कवितर्कांच्या आधारे पक्षांतर्गत संघर्षाचे चित्र रंगवू नये, असे आवाहनही त्यांनी केले. मित्रपक्षांच्या नेत्यांमधील औपचारिक भेटीचे राजकारण करू नका, असे म्हणत त्यांनी या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.