Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नरेंद्र मोदी कुठेही जाणार नाहीत, असं अमित शाह यांनी म्हटलं होतं. त्यावर प्रत्युत्तर देताना राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी कुठेही जाऊ शकत नाहीत. आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही, असं म्हटलं. त्यांनी पुढे असा इशाराही दिला की, मतचोरीच्या आरोपांप्रकरणी नरेंद्र मोदी, अमित शाह आणि ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. देशाला न्याय मिळवून दिला जाईल. ज्ञानेश कुमार यांच्यानंतर आपण अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्यासमोर उभे राहणार असल्याचं सांगत राहुल गांधींनी या नेत्यांना मतचोरीच्या आरोपांवरून जबाबदार धरण्याचा निर्धार व्यक्त केला. देशातील जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. ते दिल्लीतील इंडिया आघाडीच्या सभेत बोलत होते.
ADVERTISEMENT
RSS ने देशातील सर्व संस्थांवर नियंत्रण मिळवल्याचा आरोप
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशातील सर्व संस्थांवर नियंत्रण मिळवल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. शिक्षण, आरोग्य, सीबीआय, ईडी, न्यायव्यवस्था, नोकरशाही आणि पोलीस यंत्रणांचा त्यांनी यामध्ये उल्लेख केला. या संस्था नरेंद्र मोदी, अमित शाह किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नसून देशातील तरुणांच्या आणि नागरिकांच्या असल्याचं ते म्हणाले. या संस्थांवरील नियंत्रणामुळे शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळत नाही, तरुणांना रोजगार मिळत नाही आणि कामगारांनाही न्याय मिळत नसल्याचा दावा त्यांनी केला. देशातील बहुतांश संपत्ती दोन ते तीन उद्योगपतींच्या हातात जात असल्याची टीकाही त्यांनी केली. मोठ्या उद्योगपतींची हजारो आणि लाखो कोटी रुपयांची कर्जे माफ होतात; मात्र एखाद्या शेतकऱ्याच्या मुलाने, कामगाराने किंवा छोट्या व्यावसायिकाने बँकेकडून कर्ज घेतलं आणि ते परत करता आलं नाही, तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाते, असं राहुल गांधी म्हणाले. अदानी यांच्याकडे विमानतळ, रेल्वे, पायाभूत सुविधा, वीज व्यवस्था, मोबाईल फोन आणि शस्त्रास्त्रांशी संबंधित क्षेत्रे जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. देशातील व्यवस्था काही मोजक्या लोकांच्या हातात असलेली आपल्याला मान्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा : लातूर: फ्लॅटमध्ये 3 पुरूष आणि तरुणी, पोलिसांकडून देह व्यापार रॅकेटचा भांडाफोड
देश कसा असावा, हे सांगताना राहुल गांधी यांनी भगवान शंकराच्या तांडवाचं उदाहरण दिलं. शंकराच्या बारातीत प्रत्येकाला सहभागी होता येतं, त्याचप्रमाणे देशात प्रत्येक नागरिकाला समान संधी मिळाली पाहिजे, असं ते म्हणाले. शेतकऱ्याने मेहनत केली तर त्याला त्याच्या कष्टाचं फळ मिळालं पाहिजे. विद्यार्थ्याने 18 तास अभ्यास केला तर त्याला चांगलं शिक्षण आणि रोजगाराची संधी मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. देशातील शेवटच्या रांगेत उभ्या असलेल्या व्यक्तीचा आवाज सर्वाधिक महत्त्वाचा असल्याचं सांगत त्यांनी महात्मा गांधी यांच्या विचारांचा दाखला दिला. हिंदू, मुस्लीम, शीख, आदिवासी, दलित, महिला आणि दिव्यांग अशा प्रत्येक घटकाचा आवाज जपला पाहिजे, असंही ते म्हणाले. देशात कोणताही नागरिक आपला आवाज मांडण्यापासून वंचित राहता कामा नये, हीच आपली भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
नरेंद्र मोदी, अमित शाह आणि ज्ञानेश कुमार यांच्याबद्दल आपल्याला वैयक्तिक द्वेष नसल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं. काँग्रेस आणि विरोधक हे द्वेषाचं राजकारण करणारे नसून प्रेम आणि अहिंसेच्या विचारांवर विश्वास ठेवणारे आहेत, असं ते म्हणाले. देशाच्या संविधानावर, लोकशाहीवर आणि देशाच्या आत्म्यावर हल्ला होत असल्याचा आरोप करत हा प्रकार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. विरोधकांनी हिंसेचा मार्ग न स्वीकारता प्रेम आणि बंधुभावाच्या माध्यमातून लढा दिला पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं. देशातील जनतेला द्वेष नको, तर प्रेम, शांतता आणि बंधुभाव हवा आहे. देश पुन्हा योग्य मार्गावर आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं सांगत राहुल गांधी यांनी उपस्थितांचे आभार मानले. तसेच मतचोरीच्या आरोपांवरून संबंधितांवर कारवाई होईल, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
ADVERTISEMENT












