Solapur Politics : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उजनी धरणावर प्रस्तावित असलेल्या एआय डेटा सेंटर प्रकल्पाला आता राजकीय विरोधही वाढू लागला आहे. माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि करमाळ्याचे माजी आमदार संजय मामा शिंदे हे या प्रकल्पाच्या विरोधात एकत्र आलेले पाहायला मिळाले. एकमेकांचे राजकीय कट्टर विरोधक असलेले हे दोन्ही नेते जिल्ह्याच्या हितासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून आंदोलनात सहभागी झाल्याचे बोलले जात आहे. उजनी धरणातील पाण्याचा वापर या प्रकल्पासाठी होणार असल्याने स्थानिक शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला आहे. 31 ऑक्टोबरला हिंगणगाव येथील पुलावर शेतकऱ्यांकडून तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि संजय मामा शिंदे यांच्यासह आमदार रोहित पवार इतर राजकीय नेतेही सहभागी झालेले पाहायला मिळाले. सर्व राजकीय पक्षांनी आपापले गटतट बाजूला ठेवून आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन स्थानिक शेतकऱ्यांनी केले होते.
ADVERTISEMENT
हेही वाचा : वाल्मिक कराडच्या मुलाचं सोलापुरातील 'ते' जुनं कांड; अखेर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
धरणाच्या परिसरातील अनेक गावांचा पाण्यासाठी संघर्ष
उजनी धरणाची निर्मिती तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून झाली. शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी या धरणाची निर्मिती करण्यात आली. मात्र, आजही धरणाच्या परिसरातील अनेक गावांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी माढा तालुक्यातील तुळशी गावातील नागरिकांनी पाणीटंचाईमुळे गाव विक्रीला काढल्याची घटना समोर आली होती. उजनी धरणापासून अवघ्या 26 किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात पिण्यासाठीही पाणी उपलब्ध नसल्याची परिस्थिती आहे. जिल्ह्यातील अनेक गावांना पाण्याची समस्या भेडसावत असताना मोठ्या प्रमाणात पाणी लागणाऱ्या एआय डेटा सेंटरची गरज काय, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. या प्रकल्पात सौर ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन, न्यूक्लिअर पॉवर आणि बॅटरी प्रकल्पांचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, प्रकल्पाची नेमकी व्याप्ती किती असेल, याची स्पष्ट माहिती प्रशासनाकडून दिली जात नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. या प्रकल्पामुळे शेतकरी, मच्छीमार, स्थानिक नागरिक आणि पर्यावरणावर अवलंबून असलेल्या घटकांच्या रोजगारावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : सांगली: मतिमंद मुलीवर घरात घुसून लैंगिक अत्याचार, बाप-लेकाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
'प्रस्तावित प्रकल्पासाठी पाणी कुठून उपलब्ध करून दिले जाणार?'
माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी या प्रकल्पाबाबत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. उजनी धरणात सध्या पाणी शिल्लक नसून पाण्याचे वाटप झाले आहे. अशा परिस्थितीत प्रस्तावित प्रकल्पासाठी पाणी कुठून उपलब्ध करून दिले जाणार? असा सवाल त्यांनी केला आहे. अधिकारी चुकीची माहिती देत असल्याचा आरोप करत सर्वांच्या हिताचा प्रकल्प असेल तर स्थानिक शेतकरी आणि नागरिकांना विश्वासात का घेतले जात नाही? असेही त्यांनी विचारले. दुसरीकडे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यासह शेजारच्या जिल्ह्यांतील आमदार, खासदार आणि माजी आमदारांना पत्रव्यवहार केला आहे. या प्रकल्पाची वस्तुस्थिती समजून घेऊन त्याविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. काकोडकर समितीची पुनर्रचना करावी आणि उजनीबाबतचा निर्णय बंद दाराआड घेऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली आहे. सर्वांना विश्वासात घेऊनच निर्णय घ्यावा, अशी त्यांची भूमिका आहे.
या एआय डेटा सेंटरला विरोध होण्यामागे पाण्याची गरज, ध्वनी प्रदूषण आणि रोजगाराच्या मर्यादित संधी ही प्रमुख कारणे सांगितली जात आहेत. डेटा सेंटरमधील यंत्रणा थंड ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे पाणीटंचाई असलेल्या भागांमध्ये स्थानिकांच्या पिण्याच्या पाण्यावर आणि शेतीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते. तसेच कुलिंग फॅन्स आणि मोठ्या जनरेटरमुळे सतत आवाज निर्माण होऊ शकतो. उजनी परिसरात विविध पक्षी आणि जलचर प्राण्यांचा वावर आहे. फ्लेमिंगो पक्षीदेखील येथे मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे ध्वनी प्रदूषणाचा परिणाम पक्षी आणि जलचरांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे स्थानिक मच्छीमारांच्या व्यवसायावरही परिणाम होण्याची भीती आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात जमीन लागूनही तुलनेने कमी रोजगार निर्माण होणार असल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. धरणासाठी पूर्वी सरकारने घेतलेल्या जमिनी परत देण्याची मागणीही संजय मामा शिंदे यांनी केली आहे. त्यामुळे उजनी धरणावरील या प्रस्तावित प्रकल्पाला विरोध वाढत असून, आता जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते या आंदोलनात एकत्र येणार का, याकडे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT












