Sanjay Gaikwad on farmer suicide, जका खान : बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच ठेवलीये. आता शेतकरी आत्महत्येवरुन ते बरळलेले पाहायला मिळालेत. शेतकरी आत्महत्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय. "शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याऐवजी आपल्या अडचणी आमदार, खासदार आणि सरकारला सांगाव्यात, जेणेकरुन त्यातून मार्ग काढता येतील. तसेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या अंत्यविधीलाही जाऊ नये", असं वक्तव्य त्यांनी केलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ते नेमकं काय म्हणाले? सविस्तर जाणून घेऊयात..
ADVERTISEMENT
हेही वाचा : नागपूर पदवीधर : शेवटच्या टप्प्यात काँग्रेसने गेम पलटवला, अन् सपकाळांनी फडणवीसांना डिवचलं
दोन दिवसांपूर्वी माध्यमांच्या प्रतिनिधींनी संजय गायकवाड यांना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या शेतकऱ्यांबाबतच्या वक्तव्यावर प्रश्न विचारला होता. प्रकाश आंबेडकर यांनी शेतकऱ्यांना नालायक म्हटल्याच्या वक्तव्याबाबत त्यांना विचारण्यात आलं. यावर उत्तर देताना गायकवाड यांनी शेतकरी आत्महत्या का करतात? असा प्रश्न उपस्थित केला. शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याऐवजी आपल्या भागातील आमदार आणि खासदारांना अडचणी सांगाव्यात. त्यातून त्यांच्या समस्यांवर तोडगा काढता येऊ शकतो, असं त्यांनी म्हटलं. शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या कुटुंबाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे आत्महत्येचा निर्णय घेण्यापूर्वी शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबाचा विचार करावा, असंही गायकवाड म्हणाले.
हेही वाचा : नेत्यांना फोनवर शिवीगाळ करणाऱ्या रमेश पाटलांना किती मतं मिळाली?
'आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या अंत्यविधीला जाऊ नका'
संजय गायकवाड पुढे बोलताना म्हणाले,"आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या अंत्यविधीला देखील जाऊ नये. मी तर असं सांगेन की, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या अंत्यविधीला देखील जाऊ नये. जेव्हा आपलं शरीर एखादा प्राणी खाईल तेव्हा कसं वाटेल, हे त्यांना समजेल. त्यानंतर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत." गायकवाड यांनी प्रकाश आंबेडकर यांचं भाषण ऐकल्याचंही सांगितलं. "अनेकदा रागाच्या भरात वक्तव्य केलं जातं. शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याऐवजी सरकारला पत्र लिहून आपल्या समस्या सांगाव्यात. तसेच आमदार आणि खासदारांनाही आपल्या अडचणींची माहिती द्यावी, जेणेकरून सर्वजण मिळून त्यांना मदत करू शकतील", असंही त्यांनी स्पष्ट केलं.
शेतकरी आत्महत्या करून आपल्या मुलांना एक प्रकारे शिक्षा देतात. शेतकरी पत्नीबरोबर सात फेरे घेऊन सात जन्म एकत्र राहण्याचं वचन देतो. मात्र मध्येच आत्महत्या करून जीवन संपवतो, असंही त्यांनी सांगितलं. संजय गायकवाड हे शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार असून बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. यापूर्वीही ते आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत. त्यांच्या विधानांमुळे पक्षालाही अडचणींचा सामना करावा लागलाय. यावेळी शेतकरी आत्महत्यांबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांची भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे.
ADVERTISEMENT












