nagpur graduates constituency election result : नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी यांनी विजय मिळवला आहे. वंजारी यांना प्रथम आणि द्वितीय पसंतीक्रमाची मिळून 67 हजार 231 मते मिळाली, तर भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांना 63 हजार 960 मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी वंजारी यांना विजयाचे प्रमाणपत्र प्रदान केले. या निकालानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया देताना मोदी आणि फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. 'मोदी-फडणवीसांचा भ्रमाचा भोपळा फुटला,' असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीच्या विजयाचा उल्लेख केला.
ADVERTISEMENT
हेही वाचा : सतिश चव्हाणांचा गेम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं? इनसाईड स्टोरी..
नागपूरमधील मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात मंगळवार, 27 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली होती. एकूण 84 टेबलवर मतमोजणीची प्रक्रिया सुरू होती. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 41 तासांपेक्षा अधिक वेळ लागला. पहिल्या पसंतीच्या दोन फेऱ्यांमध्ये कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी आवश्यक असलेला 75 हजार 438 मतांचा कोटा पूर्ण करता आला नाही. एकूण 1 लाख 65 हजार 906 मतांपैकी 15 हजार 35 मते अवैध ठरली, तर 1 लाख 50 हजार 874 मते वैध ठरली.
पहिल्या पसंतीच्या फेऱ्यांमध्ये विजयाचा कोटा पूर्ण न झाल्यामुळे निवडणूक प्रक्रियेनुसार द्वितीय पसंतीक्रमाची बाद फेरी घेण्यात आली. या फेरीतही कोणत्याही उमेदवाराला निर्धारित मतांचा कोटा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे पहिल्या आणि द्वितीय पसंतीक्रमाच्या बाद फेरीतील मतांची एकत्रित गणना करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक 67 हजार 231 मते मिळवणाऱ्या अभिजीत वंजारी यांना विजयी घोषित करण्यात आले.
हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांना डिवचलं
या निकालानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया देत भाजपवर टीका केली. 'मोदी-फडणवीसांचा भ्रमाचा भोपळा फुटला,' असे त्यांनी म्हटले. विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने तीन जागांवर विजय मिळवल्याचा दावा करत त्यांनी भाजप आणि महायुतीवर निशाणा साधला. नागपूर पदवीधर मतदारसंघातून काँग्रेस-महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केल्याचे त्यांनी नमूद केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे शहर असलेल्या नागपुरात काँग्रेसने सलग दुसऱ्यांदा भाजपचा पराभव केल्याचेही सपकाळ यांनी म्हटले. भाजपकडे सत्ता, पैसा आणि सर्व शक्ती असतानाही पराभव झाल्याची टीका त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निकालापूर्वीच काँग्रेसला 'झिरो' म्हणून हिणवल्याचा उल्लेख करत सपकाळ यांनी अखेर भ्रमाचा भोपळा फुटल्याचे म्हटले.
ADVERTISEMENT












