शिंदेंच्या घराकडे निघालेल्या पुर्णेकर कुटुंबाला रोखताच ठाण्यामध्ये राडा

मुंबई तक

28 Oct 2026 (अपडेटेड: 28 Oct 2026, 09:31 AM)

Pradeep Purnekar murder case : ठाण्यातील प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीयांनी आक्रमक भूमिका घेत एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर आंदोलनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी राम पुर्णेकर यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलीस ठाण्याबाहेर आंदोलकांनी अटकेची मागणी केली.

Pradeep Purnekar murder case

Pradeep Purnekar murder case

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

शिंदेंच्या घराकडे निघालेल्या पुर्णेकर कुटुंबाला रोखताच ठाण्यामध्ये राडा

point

ठाण्यात राडा, पुर्णेकर कुटुंब शिंदेंच्या घराकडे, ठिय्या | Rajendra Shinde

Pradeep Purnekar murder case : ठाण्यातील प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणात पुर्णेकर कुटुंबीयांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मयत प्रदीप पुर्णेकर यांचा मुलगा राम, पत्नी आणि भावाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी राम पुर्णेकर यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. या घटनेनंतर पुर्णेकर कुटुंबीयांच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने आंदोलक रस्त्यावर उतरले. ठाण्यातील पोलीस ठाण्याबाहेर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेना (शिंदे गट) नेते राजेंद्र शिंदे आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांना अटक करण्याची मागणी आंदोलकांनी केली. तसेच, पुर्णेकर कुटुंबीयांनी पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारत या प्रकरणाच्या तपासाबाबत प्रश्न उपस्थित केले.

हे वाचलं का?

न्याय मागणाऱ्या लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप 

प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येला 27 दिवस उलटूनही न्याय मिळत नसल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला. पोलिसांना पुरावे दिल्यानंतरही कारवाई होत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. आरोपीला संरक्षण दिले जात असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. या प्रकरणातील पुराव्यांच्या आधारे तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. आंदोलनात सहभागी असलेल्या काही व्यक्तींना पोलिसांकडून ताब्यात घेतले जात असल्याचा आरोपही करण्यात आला. रात्रीच्या वेळी घरात जाऊन आंदोलकांना शोधले जात असल्याचे सांगत, आम्ही दहशतवादी आहोत का? असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला. न्याय मागणाऱ्या लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

हेही वाचा : Graduate-Teacher Constituency Election Result: राज्यातील 5 मतदारसंघांत आज फैसला! कुठे कोणाची लढत? वाचा उमेदवारांची संपूर्ण यादी

आपल्या वडिलांच्या हत्येप्रकरणी न्याय मागण्यासाठी गेलो होतो, असे यावेळी राम पुर्णेकर यांनी सांगितले. तसेच, या प्रकरणात राजकारण केले जात असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. आरोपींवर कारवाई करण्याऐवजी त्यांना संरक्षण दिले जात असल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.

दरम्यान, शिवसेना नेत्या मिनाक्षी शिंदे यांनी या प्रकरणातील आरोपांना उत्तर देताना पोलिसांकडून निष्पक्ष चौकशी सुरू असल्याचे सांगितले. पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्यास आपण स्वतःहून उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी म्हटले. आपली वेळोवेळी चौकशी झाल्याचेही त्यांनी सांगितले. आरोप-प्रत्यारोपांना उत्तर देण्याऐवजी चौकशीतून काय निष्पन्न होते, हे पाहावे लागेल, अशी भूमिका त्यांनी मांडली. दुसरीकडे, पुर्णेकर कुटुंबीयांनी मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्या अटकेची मागणी कायम ठेवली. जोपर्यंत संबंधितांना अटक होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशाराही आंदोलकांनी दिला. त्यामुळे प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणातील तपास आणि कारवाईच्या मागणीवरून ठाण्यातील आंदोलन अधिक तीव्र झाले.