Sangli district bank election : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 21 जागांपैकी 15 जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील बहुतांश जागांवरील थेट लढत टळली आहे. मात्र, उर्वरित सहा जागांसाठी निवडणूक होणार असून, त्यामध्ये जत, तासगाव, कवठेमहांकाळ आणि मिरज या सोसायटी गटांसह अनुसूचित जाती आणि भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातील जागांचा समावेश आहे. या सहा जागांसाठी एकूण 14 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीची विशेष चर्चा सुरू आहे. जिल्ह्यातील भाजपचे अनेक प्रमुख नेते बिनविरोध निवडून आले असताना पडळकर यांना मात्र निवडणूक लढवावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवर बिनविरोध निवड का झाली नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : भीमाशंकर वृक्षतोडीवर देवेंद्र फडणवीस रोखठोक, टोरंट प्रकल्पाचं समर्थन करत काय म्हणाले?
सांगली जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध कशी झाली?
जिल्हा बँकेच्या 21 जागांसाठी सुरुवातीला 278 अर्ज दाखल झाले होते. 19 ऑक्टोबरला आठ उमेदवारांनी, तर 21 ऑक्टोबरला शेवटच्या दिवशी 249 उमेदवारांनी माघार घेतली. दहा वर्षांहून अधिक काळ सदस्यपदावर असलेल्या उमेदवारांनी माघार घेणे, हे त्यामागील एक कारण असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी फोन करून बिनविरोध निवडणुकीची इच्छा व्यक्त केल्याचे सांगितले. त्यानंतर जयंत पाटील आणि काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांच्याशी चर्चा झाली. शेवटच्या दोन दिवसांत महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बैठकांचे सत्र सुरू होते. या चर्चांमधून सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील बिनविरोध निवडीचे राजकीय समीकरण तयार झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या प्रक्रियेत पडळकर यांच्या जागेवर सहमती होऊ शकली नाही.
हेही वाचा ; हॉटेलच्या खोलीत प्रवेश करताच बँक मॅनेजरची पत्नी कोसळली, 6 सेकंदात मृत्यू
गोपीचंद पडळकरांची जागा बिनविरोध का होऊ शकली नाही?
पडळकर यांच्या उमेदवारीभोवती चर्चेची दोन प्रमुख कारणे सांगितली जात आहेत. पहिले कारण म्हणजे भाजपमधील अंतर्गत राजकारण. पडळकर हे स्वतःच्या राजकीय भूमिकेला अधिक महत्त्व देतात आणि इतरांना सोबत घेण्याबाबत त्यांच्यावर पक्षातील काही नेते नाराज असल्याचा दावा केला जात आहे. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनीही अलीकडेच पडळकर यांच्याबाबत जाहीरपणे भाष्य केले होते. दुसरे कारण म्हणजे सांगली जिल्हा बँकेच्या राजकारणात जयंत पाटील, विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. पडळकर आणि जयंत पाटील यांच्यात यापूर्वीही राजकीय संघर्ष झाल्याचे पाहायला मिळाले आहे. बँकेसाठी अर्ज दाखल करताना पडळकर यांच्या मिरवणुकीत जयंत पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह घोषणा दिल्याचा उल्लेखही या चर्चेत केला जात आहे. त्यामुळे पडळकर यांची जागा बिनविरोध न होण्यामागे या संघर्षाची भूमिका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
गोपीचंद पडळकरांविरोधात कोण लढणार?
जत सोसायटी गटात पडळकर यांच्यासमोर विनोद पवार यांचे आव्हान आहे. विनोद पवार हे जत तालुक्यातील भाजपचे जिल्हा परिषद सदस्य सुनील पवार यांचे बंधू आहेत. पडळकर यांच्या विरोधात स्थानिक पातळीवर समविचारी आघाडी तयार झाली असून, या आघाडीने विनोद पवार यांना उमेदवारी दिल्याचे सांगितले जात आहे. या गटात एकूण 88 मतदार आहेत. त्यामुळे या मतदारांचे महत्त्व वाढले असून, त्यांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. दरम्यान, पडळकर यांचा अर्ज छाननीदरम्यान अपात्र ठरवण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती मिळवली. त्यामुळे त्यांची उमेदवारी कायम राहिली. दुसरीकडे, तासगावमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सुमनताई पाटील यांनाही निवडणूक लढवावी लागत आहे. अशा परिस्थितीत सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील उर्वरित सहा जागांचे निकाल आणि त्यामागील राजकीय समीकरणे याकडे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT












