Varsha Bungalow Meeting : मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा 500 कोटी रुपयांच्या कथित डीलिंगचा आरोप करत एक ऑडिओ क्लिप जाहीर केली. या ऑडिओ क्लिपमध्ये 500 कोटी रुपयांचा व्यवहार खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत जरांगे पाटलांकडे वळवण्याचा उल्लेख असल्याचे समोर आल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. जरांगे पाटलांनी केलेल्या या आरोपानंतर सत्ताधारी शिवसेना आणि भाजपच्या गोटात तातडीने हालचाली सुरू झाल्या. महायुती सरकारमधील अंतर्गत मतभेद आणि सत्तेचा ताण आता उघड्यावर येऊ लागला असून, विरोधी पक्षांची पोकळी असतानाच सत्ताधाऱ्यांमध्येच वर्चस्वाची लढाई रंगल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
ADVERTISEMENT
आरोप-प्रत्यारोप
या ऑडिओ क्लिपप्रकरणावर सर्वात आधी शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. क्लिपमधील बोलणाऱ्या व्यक्तींचा संबंध भारतीय जनता पक्षाशी असल्याचा दावा करत त्यांनी थेट भाजप नेतृत्वाकडे अंगुलीनिर्देश केला. महायुतीत फूट पाडण्याचा किंवा मुख्यमंत्र्यांच्या अपरोक्ष काही शिजवण्याचा हा प्रयत्न आहे का, याची चौकशी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्याने करावी, अशी मागणी सामंत यांनी केली. याला प्रत्युत्तर देताना भाजप नेते आशिष शेलार यांनी मित्रपक्षाचा गैरसमज झाला असावा आणि तो दूर केला जाईल, असं सांगितलं. मात्र, या संपूर्ण आरोप-प्रत्यारोपामुळे महायुतीतील शिवसेना आणि भाजपमधील अंतर्गत तणाव अधिकच ताणला गेला.
हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यात वातावरणात बदल, 'या' जिल्ह्यांना उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट
मुंबईत राजकीय घडामोडींना वेग
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला. शिवसेनेचे आणि भाजपचे प्रमुख नेते ज्यात राहुल शेवाळे, सचिन अहिर, रवींद्र वायकर, दीपक सावंत तसेच भाजपचे नेते प्रसाद लाड यांचा समावेश होता. हे एकत्र येत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' या निवासस्थानी पोहोचले. जरांगे पाटलांशी आतापर्यंतच्या वाटाघाटींमध्ये मध्यस्थी करणारे उदय सामंत आणि प्रसाद लाड या दोघांची भूमिका या बैठकीत अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. परस्परांवर चिखलफेक करण्यापेक्षा आणि सरकारची प्रतिमा मलिन होऊ देण्यापेक्षा एकत्र येत या प्रकरणाचा मुकाबला करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
हे ही वाचा : 'अडीच वर्षानंतर हे संभाषण...' जरांगेंच्या ऑडिओ बॉम्बवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले?
'वर्षा'वर काय घडलं?
'वर्षा' बंगल्यावरील या महत्त्वपूर्ण खलबतांनंतर महायुती सरकार या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथकाद्वारे (SIT) चौकशी करणार असल्याची चर्चा आहे. या एसआयटी चौकशीमार्फत संबंधित ऑडिओ क्लिपचे फॉरेन्सिक ऑडिट केले जाईल, तसेच त्यात समाविष्ट असलेल्या व्यक्तींच्या आवाजांचे नमुने (Voice Samples) घेऊन क्लिपची सत्यता आणि त्यामागील सूत्रधार तपासले जातील. एकीकडे सत्ताधारी एसआयटीच्या माध्यमातून सत्य बाहेर आणण्याचा दावा करत असताना, दुसरीकडे मनोज जरांगे पाटील आणि विरोधक या चौकशीच्या वेळेवर आणि हेतूवर प्रश्न उपस्थित करत आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या एसआयटी चौकशीचा अहवाल कधी येतो आणि जरांगे पाटील पुढील काय पाऊल उचलतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT












