Sanjay Shirsat on Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 500 कोटी रुपयांच्या कथित व्यवहारासंदर्भातील ऑडिओ क्लिप समोर आणल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडालीये. या क्लिपमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मनोज जरांगे यांच्यापर्यंत 500 कोटी रुपये पोहोचल्याचा दावा एका महिलेने केल्याचे ऐकायला मिळत असल्याचे सांगण्यात आले. ही क्लिप एका कॉन्फरन्स कॉलमधील असल्याचा दावा करण्यात आला आहे. जरांगे यांनी ही क्लिप ऐकवल्यानंतर शिंदेसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर प्रतिक्रिया दिली. संबंधित ऑडिओ क्लिपची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच ही क्लिप जरांगे पाटील किंवा एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्यासाठी वापरली जात आहे का, याचाही तपास झाला पाहिजे, असे शिरसाट म्हणाले.
ADVERTISEMENT
हेही वाचा : नागपूर : 10 वीच्या मुलाकडून कॉलेजात शिकणारी मुलगी गर्भवती, धक्कादायक प्रकार; गुन्हा दाखल
आपल्याविरोधात मोठे षडयंत्र रचले जात असल्याचा जरांगेंचा आरोप
मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकरणावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संबंधित प्रकरणाचा तपास करण्याचे आवाहन केले. “फडणवीस साहेब, हे वागणं चांगलं नाही. कोणी कोणाला 500 कोटी दिले, यात कोण लोकं आहेत, हे तुम्ही शोधून काढा. हे आपले आरक्षण संपवतील, कुणबी प्रमाणपत्र संपवतील,” असे जरांगे म्हणाले. आपल्याविरोधात मोठे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. एकनाथ शिंदे यांनाही उद्देशून त्यांनी आपल्याविरोधात टीम पेरू नये, असे म्हटले. तुमचा कोणता मंत्री कोणाला काय पुरवतो, याची माहिती आपल्याला असल्याचा दावाही जरांगे यांनी केला. “फडणवीस साहेब, मी जर खोलात गेलो तर माझ्याकडे आणखी खूप काही भयंकर आहे,” असे ते म्हणाले. या प्रकरणात योग्य तपास झाला नाही, तर त्याचा परिणाम 2029 मध्ये दिसेल, असा इशाराही त्यांनी दिला.
हेही वाचा : फाईव्ह स्टार हॉटेलच्या रुममध्ये बिझनेसमनचा मृत्यू, सोबत असलेली तरुणी ताब्यात; काय घडलं?
ऑडिओ क्लीपमध्ये बांगलादेशाच्या तुकड्यापासून पालघरपर्यंतच्या विषयांचा उल्लेख
या ऑडिओ क्लिपवर प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट म्हणाले की, त्यांनी मनोज जरांगे यांनी ऐकवलेली क्लिप काळजीपूर्वक ऐकली आहे. या क्लिपमध्ये चार जण बोलत असून राजकारणात काय केले पाहिजे, यावर चर्चा होत असल्याचे त्यांनी सांगितले. बांगलादेशाच्या तुकड्यापासून पालघरपर्यंतच्या विषयांचा उल्लेख या संभाषणात असल्याचेही शिरसाट म्हणाले. पैसे दिल्यास कोणाला फायदा होईल, याबाबतही त्यात चर्चा असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या संभाषणाच्या आधारे करण्यात येणाऱ्या दाव्यांची सत्यता तपासणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही क्लिप सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2024 मधील असल्याचा दावा करत त्यांनी तिच्या सत्यतेबाबत प्रश्न उपस्थित केला. तसेच ही क्लिप AIच्या मदतीने तयार करण्यात आली आहे का? याचाही तपास झाला पाहिजे, असे ते म्हणाले.
“ही ऑडिओ क्लिप जरांगे पाटलांना बदनाम करण्यासाठी सुरू आहे का? शिंदे साहेबांना बदनाम करण्यासाठी सुरू आहे का? याची चौकशी झाली पाहिजे,” असे संजय शिरसाट यांनी सांगितले. शिंदे यांच्यावरील आरोप खोटा असल्याचे क्लिपमधून समोर आल्याचा दावाही त्यांनी केला. मात्र, क्लिपची सत्यता आणि त्यातील संभाषणाचा संदर्भ तपासण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. शिंदे यांच्या विरोधात आणि जरांगे यांच्या विरोधात कोण आहे, याचीही तपासणी झाली पाहिजे. जरांगे पाटील यांच्याकडे संबंधित प्रकरणातील काही नावे असतील, तर त्यांनी ती जाहीर करावीत, अशी मागणीही शिरसाट यांनी केली. समाजा-समाजात भांडणे लावणे योग्य नसून, समाजात तेढ निर्माण झाल्यास त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात, असा इशारा त्यांनी दिला.
ADVERTISEMENT












