फाईव्ह स्टार हॉटेलच्या रुममध्ये बिझनेसमनचा मृत्यू, सोबत असलेली तरुणी ताब्यात; काय घडलं?
छत्तीसगडमधील प्रसिद्ध व्यावसायिक दीपक मित्तल यांचा हॉटेमधील रुममध्ये संशयास्पद मृत्यू झाला. यावेळी त्यांच्यासोबत एक तरुणी असल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
फाईव्ह स्टार हॉटेलच्या रुममध्ये बिझनेसमनचा मृत्यू
सोबत असलेली तरुणी ताब्यात
Businessman Death In Taj Hotel : छत्तीसगड मधील प्रसिद्ध राइस मिल व्यावसायिक आणि 'संजय ग्रेन प्रोडक्ट्स प्राइवेट लिमिटेड'चे व्यवस्थापकीय संचालक (MD) दीपक मित्तल (वय 56) यांचा चंदीगडमधील ताज हॉटेलमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. पंजाब सरकारच्या सुमारे 400 कोटी रुपयांच्या 'मेरी रसोई' (आटा-दाल) योजनेअंतर्गत राशन किट पुरवठ्याच्या कामानिमित्त ते चंदीगड येथे आले होते. मंगळवारी (20 ऑक्टोबर) रायपूरहून आल्यानंतर ते आपल्या चालकासोबत जालंधर येथील कार्यालयात गेले होते आणि सायंकाळी ताज हॉटेलमध्ये परतले होते. बुधवारी सकाळी त्यांना सेक्टर-३५ मधील मार्कफेडच्या कार्यालयात एका महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहायचे होते, मात्र त्याआधीच ही दुर्दैवी घटना घडली.
हॉटेलच्या खोलीत काय घडलं?
बुधवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास त्यांच्यासोबत हॉटेलच्या खोलीत थांबलेल्या एका तरुणीने त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती हॉटेल व्यवस्थापनाला दिली. हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्यांना तात्काळ जीएमएसएच-16 या शासकीय रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारापूर्वीच वाटेत त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत हॉटेलच्या खोलीची कसून पाहणी केली. पोलिसांनी खोलीतून दारूच्या बाटल्या, काही औषधे, सुमारे पाच लाख रुपयांची रोकड आणि एक बॅग जप्त केली असून, तरुणीला ताब्यात घेऊन चौकशीनंतर सोडून दिले.
हे ही वाचा : Uddhav Thackeray Dasara Melava | बाळासाहेब ठाकरेंची भेट आणि गाडीची गोष्ट
मृत्यूचं कारण काय?
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, मद्यप्राशनानंतर घेतलेल्या एखाद्या भारी औषधामुळे किंवा इतर कारणांमुळे हा मृत्यू झाला असावा, या दिशेने कसून तपास सुरू आहे. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी पोलिसांनी मृतदेहाचे विसेराचे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले आहेत. तसेच, रात्रीच्या वेळी खोलीत इतर कोणी व्यक्ती भेटण्यासाठी आली होती का, हे शोधण्यासाठी हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले जात आहेत. या घटनेची माहिती मिळताच छत्तीसगडहून त्यांचे कुटुंबीय चंदीगडमध्ये पोहोचले.
हे ही वाचा : मनोज जरांगेंना नडून एकनाथ शिंदे मराठा मतांची जोखीम घेणार?
व्यावसायिक वर्तुळात खळबळ
जीएमएसएच-16 रुग्णालयात डॉक्टरांच्या विशेष पथकाकडून मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले, त्यानंतर कुटुंबीयांनी पार्थिव रायपूरकडे नेले. हॉटेल ताजच्या व्यवस्थापनाने या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले असून पोलिसांच्या तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. या हाय-प्रोफाइल घटनेमुळे व्यावसायिक वर्तुळात आणि प्रशासकीय पातळीवर मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांचा अंतिम अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल.
