'फेकनाथ मिंधेला एवढी हिंमत असती ना तर...', आदित्य ठाकरे ठाण्यात जाऊन शिंदेंवर बरसले!

मुंबई तक

• 07:27 PM • 29 Oct 2026

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका करत कथित मुख्य सूत्रधाराला वाचवले जात असल्याचा आरोप केला आहे. मीनाक्षी शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर आरोपी आणि मास्टरमाइंडला अटक कधी होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

shiv sena ubt leader aaditya thackeray slams eknath shinde  shiv sena meenakshi shinde over purnekar murder case mastermind arrest thane police

आदित्य ठाकरेंची ठाण्यात जाऊन शिंदेंवर टीका!

Google CTA

ठाणे: ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज्यात वाढणाऱ्या हत्यांच्या घटना, गृहखात्याची भूमिका आणि पूर्णेकर हत्या प्रकरणातील आरोपींच्या अटकेचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी सरकारला धारेवर धरले. मीनाक्षी शिंदे यांचे नाव या प्रकरणात चर्चेत आल्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी शासकीय यंत्रणेचा वापर होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र, हे राजकीय आरोप असून त्यांची स्वतंत्रपणे पडताळणी होणे आवश्यक आहे.

हे वाचलं का?

'मुख्यमंत्री गृहमंत्री, मग राज्यात हत्यांच्या घटना का?'

आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गृहखात्याची जबाबदारी असल्याचा उल्लेख करत राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. केवळ ठाण्यातच नव्हे, तर राज्याच्या विविध भागांत हत्यांच्या घटना घडत असल्याचे ते म्हणाले. अशा घटनांकडे लक्ष देण्याऐवजी सरकार राजकारण, पक्षफोडी आणि झाडे तोडण्यामध्ये व्यस्त असल्याची टीका त्यांनी केली. सह्याद्री विकण्याच्या मुद्द्यावरूनही त्यांनी सरकारला लक्ष्य केले.

'फेकनाथ मिंधे मास्टरमाइंडला वाचवायला एवढे उत्सुक का?'

'मीनाक्षी शिंदे यांचं नाव आल्यानंतर फेकनाथ मिंधे त्यांना वाचवायला एवढे उत्सुक का आहेत? का लावली एवढी शासकीय यंत्रणा.. त्यांनाच वाचवण्यात एवढी शासकीय यंत्रणा का लावली आहे? मेन मास्टरमाईंड आहेत ते मिंधेंच्या जवळ आहेत.. त्यांना का एवढं वाचवलं जात आहे? मास्टरमाईंड नसतील तर पोलिसांनी सांगावं याबाबत तसं. मिंधेला एवढी हिंमत असती ना तर पूर्णेकरांच्या मुलाला भेटले असते.'

हे ही वाचा>> पूर्णेकर हत्या प्रकरण: नगरसेविका पद सोडलंच नाही, मीनाक्षी शिंदेंकडून फक्त शिवसेनेच्या 'या' पदाचा राजीनामा!

'या मुलाला (राम पूर्णेकर) मिंधे घाबरतात. येऊ दे ना समोर.. म्हस्केंनी जशी शिंदेंना शिविगाळ केली होती मातोश्रीमध्ये.. ती अजूनही माझ्या लक्षात आहे. त्यांना डांबून कसं ठेवलं होतं मिंधेंनी.. हे देखील मला आठवतं. मी तेच म्हणणार होतो.. ते डुगूडुगू चालतात पगसारखे मिंधेंच्या.. पण पगचा अपमान होईल.. जर मी काही त्यांच्यावर बोललो तर.. कारण पग हा निष्ठा जपणारा प्राणी आहे.'

'यांची निष्ठा म्हणजे.. ज्या मिनिटाला यांच्या हातातून चिन्ह जाईल आणि जेव्हा रिजिम चेंज होईल.. हे परत मिंधेला कशा शिव्या घालतील ते बघा..'

हे ही वाचा>> पूर्णेकर हत्या : 'हो.. मी मारेकऱ्यांना ओळखतो...', शिवसेना नगरसेविका मिनाक्षी शिंदेंच्या पतीचा खळबळजनक जबाब

'आज आम्ही बोलून दाखवलंय.. या समोर इथे.. आम्ही थांबलोय इथे. कसले नेते.. (नरेश म्हस्के) हेच शिव्या देतात. मी बोलत नाही काय-काय शिव्या देतात.' असं म्हणत आदित्य ठाकरेंनी पूर्णेकरांच्या हत्येप्रकरणी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.

'राजीनामा नाही, आरोपी आणि मास्टरमाइंडला अटक कधी?'

मीनाक्षी शिंदे यांनी ठाणे जिल्हा शिवसेना महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा दिल्यानंतर या प्रकरणाला नवे राजकीय वळण मिळाले आहे. मात्र, राजीनामा हा मुख्य मुद्दा नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास नेमका कोणत्या दिशेने सुरू आहे आणि आरोपींसह कथित मुख्य सूत्रधाराला अटक कधी होणार, हा आमचा सवाल असल्याचे त्यांनी म्हटले.

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात मीनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीवर आरोप केले आहेत. दुसरीकडे आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे पूर्णेकर हत्याकांडावरून सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. आता या प्रकरणात पोलिसांकडून काय माहिती समोर येते आणि आरोपींच्या अटकेबाबत कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.