Devendra Fadnavis On Audio Clip Controversy : मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत ऐकवलेल्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले असून, या प्रकरणात आता फॉरेन्सिक चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे. नागपूर येथे विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि वैज्ञानिक तपासणी करण्याचे स्पष्ट आश्वासन दिले आहे.
ADVERTISEMENT
शिंदे गटाच्या शिष्टमंडळाची भेट
काल (22 ऑक्टोबर) शिवसेना शिंदे गटाचे एक शिष्टमंडळ या प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी गेली होती. या भेटीदरम्यान त्यांनी या ऑडिओ क्लिप प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. विरोधकांकडून किंवा संबंधित पक्षांकडून होत असलेल्या या मागणीवर बोलताना फडणवीसांनी स्पष्ट केले की, खुद्द मनोज जरांगे पाटील यांनी देखील या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.
हे ही वाचा : 'तो मराठवाड्यात गिळून घेईल तुम्हाला...', जरांगेंनी ऐकवलेल्या खळबळजनक ऑडिओ क्लिपमधील प्रत्येक शब्द जसाच्या तसा...
'सत्य बाहेर काढू'
शिवसेना शिंदे गटाच्या शिष्टमंडळाच्या भेटीविषयी बोलताना फडणवीस म्हणाले की, 'काल अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जी काही क्लिप किंवा जे काही संभाषण समोर आलेलं आहे याची पूर्णपणे फॉरेन्सिक, त्या ठिकाणी जाच (तपासणी) होईल. त्या संदर्भात, त्यांना देखील मी आश्वासित केलंय. आम्हाला सगळ्यांनाच हा प्रश्न पडलेला आहे. अडीच वर्षानंतर हे संभाषण आत्ता बाहेर येण्याच्या पाठीमागे नेमके हेतू काय आहेत? कोणाला टार्गेट केलं जातंय? कशाकरता केलं जातंय? या संदर्भातले अनेक प्रश्न आहेत. पण मला असं वाटतं कि निश्चितपणे, त्याच्या चौकशीची मागणी मनोज जरांगे यांनी देखील केलेली आहे आणि त्याच्या चौकशीची मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली आहे आणि भाजपने केली आहे. त्यामुळे निश्चित त्याची पूर्ण चौकशी करून आणि फॉरेन्सिक अशा पद्धतीची चौकशी करून त्यातलं जे काही सत्य आहे ते आम्ही बाहेर काढू.
हे ही वाचा : 'ऑडिओ क्लिपमध्ये अतुल भातखळकर, श्वेता शालिनी यांच्यासारखा आवाज', उदय सामंतांचा भाजपवर थेट आरोप अन्...
काय आहे प्रकरण?
मनोज जरांगे यांनी दसरा मेळाव्यात 500 कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराचा उल्लेख करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर टीकास्त्र डागले होते. या पार्श्वभूमीवर भाजपच्या कॉन्फरन्स मीटिंगमधील असल्याचा दावा केला जाणारी एक कथित ऑडिओ क्लिप मनोज जरांगेंनी काल (22 ऑक्टोबर) पत्रकार परिषदेत ऐकवली. क्लिपमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून जरांगेंपर्यंत 500 कोटी पोहोचल्याचा दावा करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. ('मुंबई तक' या क्लीपची पुष्टी करत नाही.)
ADVERTISEMENT












