माजी आमदार राजेश पाटील गोकुळचे नवे अध्यक्ष, महाडिकांची घोषणा, महायुतीचा सत्तेचा फॉर्म्युलाही सांगितला

सुमित भुजबळ

10 Nov 2026 (अपडेटेड: 10 Nov 2026, 02:52 PM)

Rajesh Patil new chairman of Gokul : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी माजी आमदार राजेश पाटील यांची निवड झाली आहे. धनंजय महाडिक यांनी महायुतीचा अध्यक्षपदाचा फॉर्म्युला आणि आगामी काळातील भूमिकाही स्पष्ट केली.

Rajesh Patil new chairman of Gokul

Rajesh Patil new chairman of Gokul

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

माजी आमदार राजेश पाटील गोकुळचे नवे अध्यक्ष

point

महाडिकांची घोषणा, महायुतीचा सत्तेचा फॉर्म्युलाही सांगितला

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदी माजी आमदार राजेश पाटील यांची निवड झाली आहे. भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत ही अधिकृत घोषणा केली. अध्यक्षपदाच्या निवडीत राजेश पाटील यांना 16 मते मिळाली, तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या बाजूने 13 मते पडली. त्यामुळे 16 विरुद्ध 13 अशा मतांच्या फरकाने राजेश पाटील यांनी अध्यक्षपदाची निवड जिंकली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गोकुळच्या अध्यक्षपदावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये राजकीय संघर्ष सुरू होता. अखेर या संघर्षानंतर महायुतीने गोकुळच्या सत्तेची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. या निवडीनंतर धनंजय महाडिक यांनी महायुतीचा अध्यक्षपदाचा फॉर्म्युलाही स्पष्ट केला.

हे वाचलं का?

माजी आमदार राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी पहिल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसला प्राधान्य देण्याचे महायुतीमध्ये ठरले होते. त्यानुसार माजी आमदार राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पुढील वर्षी महायुतीचे सर्व नेते एकत्रित बैठक घेऊन अध्यक्षपदाबाबत निर्णय घेतील, असे धनंजय महाडिक यांनी सांगितले. त्यामुळे पुढील काळात भाजप आणि शिवसेनेलाही अध्यक्षपदाची संधी मिळणार का? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होऊ शकते. सव्वा सव्वा वर्षासाठी अध्यक्षपदाचे वाटप होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. मात्र, पुढील वर्षीच्या अध्यक्षपदाचा निर्णय त्यावेळी एकत्रित चर्चा करून घेतला जाईल, असे महाडिक यांनी स्पष्ट केले. गोकुळमध्ये सत्तेचा डेडलॉक निर्माण झाला होता. सहकाराच्या नियमांनुसार अध्यक्ष निवडीसाठी आवश्यक असलेला 14 संचालकांचा कोरम पूर्ण होत नसल्याने निवड रखडली होती. हा पेच सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत केल्याचे महाडिक यांनी सांगितले.

हेही वाचा : जातीवरून शिवी ते तोंडामध्ये लघुशंका? रोहित पठारे हत्याकांडाने छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ

गेल्या महिनाभरापासून गोकुळच्या सत्तासंघर्षात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. निवडणुकीत दोन्ही बाजूंना जवळपास समान मते मिळाली होती. महाविकास आघाडीकडे केवळ एका संचालकाचे अधिक संख्याबळ होते. मात्र, कोरमअभावी त्यांना अध्यक्ष निवडता येत नव्हता. यावरून विरोधकांकडून सरकार लोकशाही पायदळी तुडवत असल्याचा आरोप केला जात असल्याचे धनंजय महाडिक म्हणाले. मात्र, महायुतीच्या संचालकांनी विरोधकांना मदत केली असती तर दूध उत्पादकांनी दिलेल्या कौलाचा अनादर झाला असता, असेही त्यांनी सांगितले. गोकुळ दूध संघावर विरोधकांची सत्ता आल्यास हा संघ डी. वाय. पाटील दूध संघ होण्याची भीती होती, असा आरोपही महाडिक यांनी केला. यावेळी त्यांनी विरोधकांवर चुकीचा नरेटिव्ह पसरवल्याचा आरोप केला. कोल्हापुरी चप्पल आणि कोल्हापूरच्या संस्कृतीचा उल्लेख करत विरोधकांनी केलेल्या कृतीवरही त्यांनी टीका केली. न्यायालयीन लढाईतही विरोधकांना यश आले नसल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे महाडिक यांनी आभार मानले.

दरम्यान, गोकुळसमोर आगामी काळात आर्थिक आणि नैसर्गिक परिस्थितीची मोठी आव्हाने असल्याचे धनंजय महाडिक यांनी सांगितले. दूध संघ अंदाजे 20 ते 25 कोटी रुपयांच्या तोट्यात असल्याचा दावा त्यांनी केला. याशिवाय दुष्काळाचे सावट, कमी पाऊस आणि वैरणीची कमतरता यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. दूध उत्पादकांना सध्याचा खर्च परवडत नसल्याने त्यांना चांगला दर देण्यासोबतच आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावर महायुतीचे संचालक काम करतील, असे त्यांनी सांगितले. यासाठी राज्य सरकारच्या मदतीचीही आवश्यकता असल्याचे महाडिक यांनी स्पष्ट केले. गोकुळ हा कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचा संघ असून तो शेतकऱ्यांच्याच मालकीचा राहिला पाहिजे, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचेही त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांचे हित जपणे आणि दूध व्यवसायाला अडचणीच्या काळात आधार देणे, हेच आगामी काळातील प्राधान्य असेल, असे आश्वासन त्यांनी दिले.