जातीवरून शिवी ते तोंडामध्ये लघुशंका? रोहित पठारे हत्याकांडाने छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ

Rohit Pathare Murder Case : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरमध्ये 23 वर्षीय रोहित पठारे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत 10 आरोपींना अटक करण्यात आली असून, कुटुंबीयांनी न्यायाची मागणी केली आहे.

ADVERTISEMENT

Rohit Pathare Murder Case
Rohit Pathare Murder Case
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

जातीवरून शिवी ते तोंडामध्ये लघुशंका?

point

रोहित पठारे हत्याकांडाने छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ

Rohit Pathare Murder Case :  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे 23 वर्षीय रोहित पठारे याच्या हत्येच्या घटनेने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. रोहितला घरातून उचलून नेत त्याच्यावर अत्यंत क्रूरपणे हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. बर्फ तोडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या हत्याराने त्याच्या शरीरावर वार करण्यात आले. तसेच कोयता, कत्ती, लोखंडी रॉड, दांडके आणि दगडांचाही मारहाण करण्यासाठी वापर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. रोहितच्या कमरेखाली, मांडीवर आणि पायांवर मोठ्या दगडांनी घाव घालण्यात आले. त्याच्या तोंडात बोळा कोंबल्यामुळे त्याला आवाजही काढता येत नव्हता, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मारहाणीदरम्यान त्याने पाणी मागितल्यानंतर आरोपींनी त्याच्या तोंडात लघुशंका केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आलाय. रोहित मृत झाल्याचे समजून आरोपींनी त्याला निर्जनस्थळी फेकून दिले आणि घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या रोहितला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, 3 नोव्हेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला.

हत्येमागे गणेशोत्सवाच्या काळात झालेल्या किरकोळ वादाचे कारण 

या हत्येमागे गणेशोत्सवाच्या काळात झालेल्या किरकोळ वादाचे कारण असल्याचा आरोप केला जात आहे. या वादानंतर आरोपी रोहितचा पाठलाग करत होते. यापूर्वी त्याच्या वडिलांनाही आरोपींकडून शिवीगाळ करण्यात आल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. 31 ऑक्टोबर रोजी आरोपींच्या टोळक्याने रोहितला घरातून उचलून नेले आणि त्याच्यावर हल्ला केला. या प्रकरणात जातीवाचक शिवीगाळ करून रोहितची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केलाय. सुरुवातीला पोलिसांनी रोहितविरोधातच गुन्हा दाखल केल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला. आरोपींविरोधात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यासाठी आणि त्यांना अटक करण्यासाठी रोहितच्या नातेवाईकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले. आरोपींना अटक होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतली होती. यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे आणि स्थानिक आमदार रमेश बोरणारे यांनी कुटुंबीयांची भेट घेतली. पोलिसांच्या तपासावर आणि कारवाईला झालेल्या विलंबावरही नातेवाईकांनी प्रश्न उपस्थित केले. या प्रकरणात राजकीय दबाव होता का, असा सवालही उपस्थित करण्यात आला.

हेही वाचा : 'सर्व घडामोडींवर पवार साहेब लक्ष ठेवून, क्षणाक्षणाची अपडेट...', सुप्रिया सुळेंनी थेट व्हिडिओच केला शेअर

 मुख्य आरोपीसह एकूण 10 जणांना अटक

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 30 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, मुख्य आरोपीसह एकूण 10 जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये जयदेव राजपूत, हर्षल राजपूत, सागर राजपूत, गजू राजपूत, अमर राजपूत, अमन उंटवाळ, शंकर राजपूत, पंकज राजपूत, क्रिश राजपूत आणि सोनू राजपूत यांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि वैजापूर पोलिसांची मिळून पाच विशेष पथके तयार केली होती. अप्पर पोलीस अधीक्षकांच्या देखरेखीखाली या पथकांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी तसेच जिल्ह्याबाहेर आणि राज्याबाहेर छापेमारी केली. गोपनीय माहिती आणि नियोजनबद्ध तपासाच्या आधारे दहा आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. त्यामध्ये रोहितच्या मारहाण आणि हत्या प्रकरणातील आठ आरोपी, तर गुन्हा क्रमांक 698/2026 मधील दोन आरोपींचा समावेश आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची पोलीस कोठडी घेण्यात आली असून, त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि हत्येमागील इतर कारणे काय आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत असल्याचे पोलिसांनी सांगितले. रोहित पठारेच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी ग्रामीण पोलीस कटिबद्ध असून, या प्रकरणातील कोणालाही सोडले जाणार नाही आणि सर्व आरोपींविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, रोहितच्या कुटुंबीयांनी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. मुलगा परत येणार नसला, तरी त्याच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांना कायद्यानुसार शिक्षा मिळावी, अशी कुटुंबीयांची अपेक्षा आहे. त्यामुळे या प्रकरणातील उर्वरित आरोपींच्या अटकेसह पुढील पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.