'सर्व घडामोडींवर पवार साहेब लक्ष ठेवून, क्षणाक्षणाची अपडेट...', सुप्रिया सुळेंनी थेट व्हिडिओच केला शेअर

गोकुळ दूध उत्पादक सहकारी संघाच्या निवडणुकीनंतर शासनाने चार सदस्य नियुक्त करण्याचा निर्णय घेतल्याने कोल्हापुरात सत्तासंघर्ष पेटला आहे. या निर्णयाविरोधातील मोर्चावर शरद पवार लक्ष ठेवून असल्याचा व्हिडिओ सुप्रिया सुळे यांनी शेअर केला आहे.

ADVERTISEMENT

gokul dairy election satej patil sharad pawar supriya sule kolhapur protest
शरद पवार
Google CTA

पुणे: कोल्हापूरच्या राजकारणात सध्या गोकुळ दूध उत्पादक सहकारी संघाच्या निवडणुकीनंतरचा सत्तासंघर्ष चर्चेचा विषय ठरला आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. मात्र, निवडणुकीच्या निकालानंतर शासनाने गोकुळमध्ये पाच सदस्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या निर्णयाविरोधात कोल्हापुरातील दसरा चौकात नागरिकांनी एकत्र येत आपला विरोध नोंदवला. आता या संपूर्ण प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उडी घेतली असून, त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

सुप्रिया सुळे यांचं सरकारवर टीकास्त्र

सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ट्वीट करत गोकुळच्या सत्तासंघर्षावर भाष्य केलं आहे. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व मिळवलं असतानाही ही संस्था कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घ्यायची, हा हट्ट अनाकलनीय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शासनाने सदस्य नेमण्याच्या निर्णयावरही त्यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आहे.

हे ही वाचा>> "सांगलीचा माणूस गोकुळमध्ये तज्ज्ञ संचालक, कोल्हापुरातला एकही व्यक्ती पात्र वाटला नाही का?"

या निर्णयाविरोधात कोल्हापूरच्या जनतेने दसरा चौकात एकत्र येऊन विरोध दर्शवला. या आंदोलनातून स्थानिक नागरिक आणि गोकुळचे दूध उत्पादक शेतकरी आपली भूमिका मांडत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी नमूद केलं. तसेच, या संघर्षाला आपला पाठिंबा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

शरद पवार टीव्हीवर पाहत होते मोर्चा

या ट्वीटमधील सर्वाधिक लक्षवेधी बाब म्हणजे शरद पवार यांच्याशी संबंधित व्हिडिओ. कोल्हापुरात सुरू असलेला मोर्चा शरद पवार टीव्हीवर लाइव्ह पाहत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. 'या घडामोडींवर पवार साहेब बारकाईने लक्ष ठेवून असून, ते क्षणाक्षणाची माहिती घेत आहेत.' असं सुप्रिया सुळे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

हे ही वाचा>> 'हसन मुश्रीफ, बंटी पाटलांनी आपापसात बसून निर्णय घ्यावा', गोकुळवरुन मुख्यमंत्री रोखठोक

त्यामुळे गोकुळच्या सत्तासंघर्षाला आता केवळ सहकारी संस्थेच्या निवडणुकीपुरतं मर्यादित न ठेवता त्याला राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे. विशेषतः सतेज पाटील यांच्या पॅनेलने मिळवलेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या चार सदस्य नियुक्तीच्या निर्णयावरून राजकीय वातावरण तापलं आहे.

गोकुळच्या दूध उत्पादकांच्या संघर्षाला पाठिंबा

गोकुळ ही कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सहकारी संस्था आहे. त्यामुळे या संस्थेच्या कारभारावर कोणाचं नियंत्रण असणार, याकडे दूध उत्पादकांसह जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

सुप्रिया सुळे यांनी कोल्हापूरची जनता आणि गोकुळचे दूध उत्पादक शेतकरी आपल्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करत असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या या संघर्षाला आपला पाठिंबा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, शरद पवार यांनी स्वतः टीव्हीवर मोर्चा पाहिल्याचा व्हिडिओ समोर आल्याने या आंदोलनाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. गोकुळच्या सत्तासंघर्षात पुढे कोणती राजकीय भूमिका घेतली जाते आणि शासनाच्या निर्णयावर काय घडामोडी होतात, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.