भाजप आमदाराच्या भावाची गोळ्या झाडून हत्या, काँग्रेस पदाधिकाऱ्यावर गंभीर आरोप
Crime News : उत्तर प्रदेशातील कन्नौजमध्ये दिवाळीच्या रात्री वकील अनुज कुमार चतुर्वेदी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. काँग्रेसचे जिल्हा महासचिव अमूल दीक्षित यांच्यावर हत्येचा आरोप असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भाजप आमदाराच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
काँग्रेस पदाधिकाऱ्यावर गंभीर आरोप
Crime News : उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यात दिवाळीच्या रात्री गोळ्या झाडून एका वकिलाची हत्या करण्यात आली. अनुज कुमार चतुर्वेदी असं मृत वकिलाचं नाव असून ते भाजप आमदार अर्चना पांडे यांचे नातेवाईक होते. या हत्येप्रकरणी काँग्रेसचे जिल्हा महासचिव अमूल दीक्षित यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. निवडणुकीतील जुन्या वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक आरोप आहे. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून दिवाळीच्या आनंदावर शोककळा पसरली आहे. आरोपी घटनेनंतर फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यातील हवामानात मोठा बदल, बहुतांश जिल्ह्यांना कोरड्या हवामानाचा अंदाज
अनुज कुमार चतुर्वेदी यांच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्याचा आरोप
मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या रात्री सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास छिबरामऊ कोतवाली पोलीस ठाण्यासमोरील गल्लीत ही घटना घडली. अनुज कुमार चतुर्वेदी यांच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्याचा आरोप आहे. या गोळीबारात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच भाजप आमदार अर्चना पांडे घटनास्थळी दाखल झाल्या. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. पोलीस अधीक्षक विनोद कुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पाच पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हत्येमागे निवडणुकीतील जुना वाद आणि जमिनीचा वाद असल्याचा प्राथमिक अंदाज
या हत्येमागे निवडणुकीतील जुना वाद आणि जमिनीचा वाद असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, या कारणांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. मृत अनुज चतुर्वेदी यांचे भाऊ धीरज चतुर्वेदी यांनी या घटनेबाबत माहिती दिली. आरोपी अमोल दीक्षित आणि त्यांच्या लहान भावामध्ये यापूर्वी वाद झाला होता. या वादातून आरोपीने त्यांच्या लहान भावाला मारहाण करत कानशिलात लगावली होती. या प्रकाराला विरोध करण्यासाठी अनुज चतुर्वेदी पुढे गेले होते. त्यावेळी आरोपीने पिस्तूल काढून गोळीबार केला, असा आरोप धीरज चतुर्वेदी यांनी केला आहे. आरोपीने एकूण चार गोळ्या झाडल्याचेही त्यांनी सांगितले.
या घटनेनंतर कन्नौज जिल्ह्यातील छिबरामऊ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस अधीक्षक विनोद कुमार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस यंत्रणा तपास करत आहे. फरार आरोपी अमूल दीक्षित याला पकडण्यासाठी पोलिसांची पाच पथके वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेत आहेत. घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्याचे कामही पोलिसांकडून सुरू आहे. दिवाळीच्या रात्री पोलीस ठाण्याजवळच एका वकिलाची गोळ्या झाडून हत्या झाल्याने या घटनेची परिसरात चर्चा सुरू आहे. निवडणुकीतील वाद आणि जमिनीच्या व्यवहारातून ही हत्या झाली का, याचा तपास पोलीस करत आहेत.
