बीड : वाघाचा थरार, शेतकऱ्याचा बळी.. मुलाच्या डोळ्यांसमोर मृतदेहाचे लचके तोडले
Beed ashti tiger attack : बीडच्या आष्टी तालुक्यात चारा आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला झाला. मुलाच्या डोळ्यांसमोर वाघाने मृतदेहाचे लचके तोडले. वनविभागाच्या कारभारावर ग्रामस्थांचा संताप.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बीड : वाघाचा थरार, शेतकऱ्याचा बळी.
मुलाच्या डोळ्यांसमोर मृतदेहाचे लचके तोडले
Beed ashti tiger attack , बीड : जनावरांसाठी चारा आणण्यासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून त्याला ठार केले. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील देवळाली येथे ही घटना घडली. देविदास ऊर्फ महादेव टकले असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास लोखंडवाडी सोनेपठार शिवारात ही घटना घडली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, वडिलांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या मुलाला वाघ आपल्या वडिलांच्या मृतदेहाचे लचके तोडत असल्याचे दिसले. मुलगा आणि ग्रामस्थांनी आरडाओरडा केल्यानंतर वाघाने मृतदेह सोडून जंगलाच्या दिशेने पळ काढला. मात्र, तोपर्यंत टकले कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता.
जमिनीवर रक्ताचे डाग आणि फरफटत नेल्याच्या खुणा आढळल्या
देविदास टकले हे जनावरांसाठी गवत कापण्यासाठी शेतात गेले होते. त्यांनी गवताचा एक भारा तयार केला होता. त्यांचा मुलगा तो भारा घरी घेऊन गेला. त्यानंतर दुसरा भारा आणण्यासाठी तो पुन्हा शेतात आला. मात्र, यावेळी त्याला वडील दिसले नाहीत. त्यामुळे त्याने परिसरात शोध सुरू केला. काही अंतरावर त्याला रक्ताचे डाग, वडिलांचे कपडे आणि चप्पल दिसली. जमिनीवर रक्ताचे डाग आणि फरफटत नेल्याच्या खुणा आढळल्या. या खुणांचा माग काढत मुलगा आणि ग्रामस्थ पुढे गेले असता, वाघ वडिलांच्या मृतदेहावर ताव मारत असल्याचे त्यांना दिसले. मुलाने आरडाओरडा केल्यानंतर वाघ जंगलाच्या दिशेने निघून गेला. या घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. परिसरात यापूर्वीही वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांच्या घटना घडल्या असून गेल्या तीन वर्षांत चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे.
हेही वाचा : आमदार निवासस्थानात धक्कादायक प्रकार, काँग्रेस आमदाराच्या खोलीत तरुण अन् तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत
घटनास्थळी आढळलेल्या पायांच्या ठशांवरून हा हल्ला वाघाने केल्याचे निश्चित
या घटनेबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघाच्या हल्ल्यातच शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले आहे. शवविच्छेदन आणि वन्यजीव तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर तसेच घटनास्थळी आढळलेल्या पायांच्या ठशांवरून हा हल्ला वाघाने केल्याचे निश्चित झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. देवळाली परिसरात वाघाचे ठसे आढळल्यानंतर वनविभागाने यापूर्वी गस्त घालून नागरिकांना वनक्षेत्रात न जाण्याचे आवाहन केले होते. आता घटनास्थळी कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले असून परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे. दरम्यान, स्थानिक आमदार सुरेश धस यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. यापूर्वी राजेंद्र कोल्हार यांचाही याच रामलिंग नावाच्या वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा दावा त्यांनी केला. सवताडा रामेश्वर येथील देवाचा घोडा या जनावरालाही याच वाघाने ठार केल्याचे त्यांनी सांगितले. या वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचेही धस यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, टकले यांच्या कुटुंबाला शासनाकडून तातडीने मदत मिळावी आणि कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वाघाला पकडण्यासाठी तातडीने पिंजरा लावण्यात यावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. आमदार सुरेश धस यांनीही परिसरातील नागरिकांना काही दिवस एकट्याने शेतात न जाण्याचे आवाहन केले आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला असून शेतकरी चारा मिळवण्यासाठी वनक्षेत्राच्या आसपास जात आहेत. त्यामुळे चारा छावण्या लवकर सुरू करण्याची गरज असल्याचे धस यांनी सांगितले. या महिन्याच्या अखेरपर्यंत चारा छावण्या सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. एकीकडे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि दुसरीकडे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांची भीती यामुळे आष्टी तालुक्यातील देवळाली, लोखंडवाडी आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
