धाराशिव : ऐन दिवाळीत येडशीत अग्नितांडव; एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
Dharashiv Yedshi Fire : दिवाळीची रात्र काळ बनून आली! किराणा दुकानासह वरच्या मजल्यावरील घर आगीत जळून खाक; आई-वडील, पती-पत्नी आणि दोन चिमुकल्या मुलींचा दुर्दैवी अंत, गावावर शोककळा
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
धाराशिवमध्ये ऐन दिवाळीत येडशीत अग्नितांडव
एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
Dharashiv Yedshi Fire : धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथे दिवाळीच्या सणादरम्यान काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली आहे. मध्यरात्री अडीचच्या सुमारास किराणा दुकानाला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले असून, दिवाळीच्या आनंदावर दुःखाचे सावट पसरले आहे. मृतांमध्ये उत्तम त्रिंबक करंडे, चंद्रकला उत्तम करंडे, गोविंद उत्तम करंडे, ज्योती गोविंद करंडे, गायत्री गोविंद करंडे आणि सिद्धी गोविंद करंडे यांचा समावेश आहे.
मध्यरात्री अडीचच्या सुमारास अग्नितांडव
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, येडशी येथील गोविंद भाऊ करंडे आणि उत्तम करंडे यांच्या किराणा दुकानाला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. दुकानाच्या वरच्या मजल्यावर करंडे कुटुंब वास्तव्यास होते. रात्रीच्या वेळी आग लागल्याने काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. दुकानातील साहित्य आणि वरच्या मजल्यावरील घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
हेही वाचा : "राजेश खन्ना स्टाइलचे कपडे अन् अर्धवट उडालेल्या फटाक्यांची दारू; दादांशिवाय दिवाळी सुनी-सुनी"
या दुर्घटनेत घरात अडकलेल्या एकूण सात जणांपैकी सहा जणांचा मृत्यू झाला असून दोन जणाचा होरपळून तर चार जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या कुटुंबातील कृष्णा ही व्यक्ती दुर्घटनेतून बचावली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. धाराशिव, कळंब आणि तुळजापूर येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग आटोक्यात आणण्यासाठी आणि घरातील व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, या दुर्घटनेत सहा जणांना जीव गमवावा लागला.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घरात लावलेल्या पणतीमुळे आग लागल्याची शक्यता प्राथमिक स्तरावर व्यक्त केली जात आहे. पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. या हृदयद्रावक घटनेची माहिती मिळताच आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि आमदार कैलास पाटील यांनी पहाटे घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून दुर्घटनेची माहिती घेतली.
येडशी बाजारपेठ बंद; अंत्यसंस्कारासाठी गावात शोककळा
करंडे कुटुंबातील सहा जणांच्या मृत्यूमुळे येडशी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर दुःख व्यक्त करण्यासाठी गावातील व्यापाऱ्यांनी संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व सहा जणांवर सोमवार, 9 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी दोन वाजता येडशी येथील सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दिवाळीच्या सणात एका हसत्या-खेळत्या कुटुंबाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण येडशीसह परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
