"राजेश खन्ना स्टाइलचे कपडे अन् अर्धवट उडालेल्या फटाक्यांची दारू; दादांशिवाय दिवाळी सुनी-सुनी"

Rajendra Pawar emotional post : अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबीयांची पहिली दिवाळी सुनी-सुनी वाटू लागलीये. याच पार्श्वभूमीवर राजेंद्र पवार यांनी भावनिक पोस्ट शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

ADVERTISEMENT

Rajendra Pawar emotional post
Rajendra Pawar emotional post
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

"राजेश खन्ना स्टाइलचे कपडे"

point

"अर्धवट उडालेल्या फटाक्यांची दारू; दादांशिवाय दिवाळी सुनी-सुनी"

point

राजेंद्र पवार यांनी भावनिक पोस्ट शेअर करत दिला जुन्या आठवणींना उजाळा

Rajendra Pawar emotional post : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर यंदा पवार कुटुंबियांची सुनी सुनी बनलीये. जानेवारी महिन्यात अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली, तर पवार कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला. अजित पवार यांच्या निधनानंतर येणारा हा पहिलाच दिवाळीचा सण असल्याने यंदा पवार कुटुंबीय दिवाळी साजरी करणार नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं होतं. यंदा आमच्याकडे दिवाळी नाही, आम्ही दिवाळी साजरी करणार नाही, असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. त्यामुळे यंदा पवार कुटुंबीयांच्या दिवाळी पाडव्याच्या परंपरेतही खंड पडणार आहे.

हेही वाचा : सोलापुरात भाजप-काँग्रेस नेत्यांमध्ये मध्यरात्री राडा; आमदार देवेंद्र कोठे आणि चेतन नरोटे आमनेसामने VIDEO

पवार कुटुंबीयांची दिवाळी ही दरवर्षी राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय असते. बारामती येथील गोविंदबागेत दरवर्षी दिवाळी पाडवा साजरा केला जातो. या निमित्ताने राज्याच्या विविध भागांतून कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते आणि समर्थक शरद पवार यांची भेट घेण्यासाठी गोविंदबागेत येत असतात. राजकीय घडामोडींच्या दृष्टीनेही या दिवाळी पाडव्याला विशेष महत्त्व असतं. मात्र, यंदा अजित पवार यांच्या निधनामुळे ही परंपरा नेहमीप्रमाणे साजरी होणार नाही. अजित पवार यांच्याशिवाय येणारी ही पहिली दिवाळी असल्याने पवार कुटुंबीयांसाठी हा सण भावनिकदृष्ट्या कठीण ठरणार आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर येणाऱ्या पहिल्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडूनही भावनिक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. अजित पवार यांचे बंधू राजेंद्र पवार यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसोबत त्यांनी एक जुना व्हिडीओदेखील शेअर केला आहे. या पोस्टमधून त्यांनी पवार कुटुंबातील जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. लहानपणी आमराईत घालवलेले दिवस, त्यावेळचं कौटुंबिक वातावरण आणि एकत्रितपणे साजरे केलेले क्षण यांचा संदर्भ त्यांच्या पोस्टमध्ये आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर बदललेल्या कौटुंबिक परिस्थितीची जाणीवही या पोस्टमधून व्यक्त होत असल्याचं दिसून येतं.

हेही वाचा : पुणे मेट्रो : '4 हजारात दिवाळी होते, चार हजाराचं तिकीट कसं काढायचं?'

राजेंद्र पवार यांची पोस्ट जशीच्या तशी 

अजित गेल्यानंतर आज पहिल्यांदाच दिवाळी सुनी-सुनी वाटतेय. लहानपणापासूनच्या एकत्रित दिवाळ्या खूप जिव्हाळ्याच्या होत्या. तासेब(अनंतराव) फटाके आणत,सर्वांना समान वाटून देत. फटाके दिवसभर पुरवून वापरण्यासाठी अंधाऱ्या कोठडीतील घडवंचीवरील पोत्याच्या भकश्यात कोणाला सापडू नये म्हणून आपण लपवून ठेवत होतो. त्यावेळी नवीन असलेले पॅराशूट उडाले की ते पकडायला काट्या-कुट्यातून धावत होतो, अर्धवट उडालेल्या फटाक्यांची दारू एकत्र करून दुसर्‍या दिवशी पेटवत होतो. आजीच्या धाकाने आपले घरदार सुतासारखे सरळ चालत होते, आता तू असतास तर वेगळा धाक व प्रेम राहिले असते. दिवाळीला ND पाटील(आत्यामुळे मामा) आले की घर गप्पांनी भरून जाई. ते वेगळ्या पक्षाचे, स्वतःच्या वैयक्तिक तत्त्वांचे पण त्यांचे प्रत्येक वयातील व्यक्तीशी जमायचे.पक्ष व आपले तत्व हे वेगळे ठेवून नाती जपायची असतात हे शिकलो.

त्याकाळी एवढ्या पाहुण्यांना टोपलीचा एकच संडास;मग चिल्या-पिल्यांना पत्र्यामागे ओळीने बसावे लागे, अशावेळी पुढे मागे सरकावे लागे या अनुभवामुळे भविष्यात कोणाशीही जमवून घेणे आपल्याला सोपे गेले. घरामागच्या आडावर अर्धी आमराई पाणी भरायची,पहाटेपासून कावडीचे कुई-कुई आवाज चालायचे. यावेळी पायरीवर बसून विटकर घासून किंवा राखेची राखुंडी दाताला लावत असताना आपल्याकडे असलेल्या गोष्टींमध्ये समाजाचाही वाटा असतो ही शिकवण मागच्या पिढीने आपल्याला दिली.घरट्यातून पडलेली पक्ष्यांची पिलं सापडली की आपण फिरस्त्या शेळीचे दूध काढून त्यांना पाजत होतो. 

तुझ्या कपड्याच्या वेगळ्या आवडी-निवडीमुळे राजेश खन्ना स्टाइलचे कपडे फक्त तुलाच होते. दिवाळ्या येत-जात राहणार पण लहानपणी टोचलेल्या काट्यांच्या आठवणींची कुरूपं मात्र आता बोचून एकटेपणा देत राहणार. मी शेती करत बारामतीत राहिलो तशीच माझी मुलं पण इथंच राहिली. तुम्ही भावंडं मुंबईला गेलात, तुमची मुलं तिथंच जन्मली,वाढली,परदेशी शिकली.या साऱ्या पुढील पिढ्यांना आपली लहानपणाची आपुलकीची दिवाळी कशी समजणार? आपल्या नात्यातील घट्ट विण व आपले ऋणांनुबंधाचे हळवे धागे कसे समजणार? प्रत्येक प्रसंगात आठवण काढणे एवढेच मागे राहिले आहे..