'माझ्या मृत्यूला व्यवस्था आणि भूमाफिया जबाबदार...' महिला आदिवासी नेत्याच्या मृत्यूने खळबळ
माझ्या मृत्यूला व्यवस्था आणि भूमाफिया जबाबदार असल्याचं सांगत आदिवासी महिला नेत्यानं टोकाचं पाऊल उचललं. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सरकारवर गंभीर आरोप केले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आदिवासी महिला नेत्याचे सरकारवर गंभीर आरोप
फेसबुक लाईव्हमध्ये काय म्हटलं?
Tribal Leader Death : एका महिला आदिवासी नेत्याने आत्महत्या केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सरकारवर गंभीर आरोप केले. माझ्या मृत्यूला व्यवस्था आणि भूमाफिया जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलं. झारखंडमधील त्या एक आदिवासी नेत्या होत्या. निशा भगत असं त्याचं नाव होतं. त्यांनी आत्महत्येपूर्वी फेसबुक लाईव्ह करून हेमंत सोरेन सरकार, जमीन माफिया आणि पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. समाजात महिलांना अपमानित केले जात असल्याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. सरकारवर ताशेरे ओढत त्यांनी म्हटले की, जर प्रशासकीय त्रुटी आणि अन्याय उघड करणे गुन्हा असेल, तर त्याची किंमत त्यांना चुकवावी लागत आहे.
पोलिसांनी कारवाई टाळली
लाईव्ह दरम्यान त्यांनी जमीन व्यवहारातील काही व्यक्ती आणि स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सुरक्षेसाठी वारंवार विनंती करूनही प्रशासनाकडून मदत मिळाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. विशेषतः पिठोरिया पोलीस ठाण्याच्या प्रभारींशी फोनवर बोलताना त्यांनी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक न झाल्याबद्दल आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल तीव्र नाराजी दर्शवली.
हे ही वाचा : मुंबई : मोबाईलमध्ये अल्पवयीन मुलांचे 20 हजारांहून अधिक आक्षेपार्ह फोटो अन् व्हिडीओ, 49 वर्षीय व्यक्तीला अटक
राजकीय पक्षांकडून पाठबळ नाही
आपल्या संघर्षाचा उल्लेख करताना निशा भगत म्हणाल्या की, त्या सातत्याने आपल्या आदिवासी समाजाच्या हक्कासाठी आणि प्रश्नांसाठी लढा देत राहिल्या; परंतु त्यांना राजकीय पक्षांकडून अपेक्षित पाठबळ लाभले नाही. एक कणखर महिला म्हणून ओळख असल्यावरही त्यांना एकटेपणाचा सामना करावा लागला.
हे ही वाचा : सोलापूर : प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या नवऱ्यावर पहारेने वार, मृतदेह फेकला कालव्यात; न्यायालयाचा मोठा निर्णय
कुटुंबाला त्रास
या संपूर्ण घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांना आणि आई-वडिलांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आपल्यामुळे कुटुंबाला ऐकावे लागणाऱ्या गोष्टींमुळे त्या अत्यंत व्यथित झाल्या होत्या. त्यांच्या या दुर्दैवी अंत आणि लाईव्हमधील आरोपांमुळे झारखंडमध्ये खळबळ उडाली आहे.
