CJP Protest : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून दिल्लीत आंदोलन छेडणारे 'सीजेपी'चे (CJP) प्रमुख नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांची सात दिवसांनंतर तिहार तुरुंगातून सुटका झाली आहे. दिल्ली पोलिसांच्या कारवाईनंतर त्यांना स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट समोर हजर करण्यात आले होते. सुटकेच्या बदल्यात या नेत्यांनी प्रशासनाला एक लेखी हमीपत्र दिले आहे. या हमीपत्रामुळे आता सीजेपीचे आंदोलन नेमक्या कोणत्या दिशेने जाणार आणि जंतर-मंतर येथील आंदोलनाचा टप्पा पूर्णपणे संपला आहे का, अशा विविध चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले आहे.
ADVERTISEMENT
हमीपत्रात तीन महत्त्वाचे मुद्दे
प्रशासनाला दिलेल्या या लेखी हमीपत्रात तीन महत्त्वाचे मुद्दे नमूद करण्यात आले आहेत. पहिल्या मुद्द्यानुसार, त्यांच्या आंदोलनामुळे कुठल्याही परिस्थितीत शांततेचा भंग होणार नाही, याची ग्वाही देण्यात आली आहे. दुसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यानुसार, दिल्लीतील जंतर-मंतर हे आंदोलन स्थळ म्हणून अधिसूचित (Notify) नसताना, तिथे आंदोलनाचे कोणतेही आवाहन केले जाणार नाही, असे लेखी देण्यात आले आहे. तसेच तिसऱ्या मुद्द्यात, भविष्यातील सर्व आंदोलने ही संविधानाच्या चौकटीत राहूनच केली जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. जंतर-मंतर हे आंदोलन स्थळ म्हणून 'डीनोटिफाय' झाल्यानंतरही तिथे जाऊन आंदोलन करण्याचा आणि सरकारला थेट आव्हान देण्याचा पवित्रा सीजेपीने घेतला होता. मात्र, आता या लेखी हमीपत्रामुळे जंतर-मंतरवरील आंदोलनाचा पर्याय सीजेपीसाठी कायदेशीरदृष्ट्या बंद झाला आहे.
हे ही वाचा : Maharashtra El Nino : दुष्काळासह आणखी एक संकट, महाराष्ट्राची चिंता वाढली?
आंदोलकांमध्ये भीतीचे वातावरण
धर्मेंद्र प्रधान यांच्याविरोधातील 2 जुलैच्या आंदोलनादरम्यान आंदोलकांना अटक न होणे आणि एफआयआर रद्द होणे, यामुळे आंदोलकांचा मोठा पाठिंबा मिळाला होता. मात्र, यावेळी ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनादरम्यान थेट विमानानातून ताबा घेणे, दहशतवाद्यांना ठेवल्या जाणाऱ्या तिहार तुरुंगातील सेल्समध्ये ठेवणे आणि कडक कारवाईचा बडगा उचलणे, यामुळे आंदोलकांमध्ये आणि नेत्यांमध्ये एका प्रकारे भीतीचे वातावरण निर्माण झाले. याशिवाय, पेपरफुटीच्या विषयाच्या तुलनेत निवडणूक आयोगाचा विषय सर्वसामान्यांना कमी रिलेटेबल वाटल्याने या वेळी आंदोलकांची उपस्थितीही काहीशी कमी दिसून आली. या कायदेशीर कारवाईमुळे आणि मानसिक दबावामुळेच अखेर सीजेपीला बचावात्मक पवित्रा घ्यावा लागल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
हे ही वाचा : हिंगोली : RPF कर्मचाऱ्याने महिलेशी गैरवर्तन केल्याचा आरोप, प्रवाशांनी रुळावर बसून ट्रेन रोखली
1 नोव्हेंबरला भव्य रॅली
सध्या तरी सीजेपीने दिवाळीपर्यंत कोणतेही आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला असून पुढील 15 दिवस हा विषय शांत राहण्याची शक्यता आहे. परंतु, सीजेपीचे आंदोलन थंड पडले असले तरी विरोधी पक्षांनी हा मुद्दा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 1 नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावर विरोधकांची भव्य रॅली आयोजित करण्यात आली असून, तिथून नवीन रणनीती आखली जाऊ शकते. दिवाळीनंतर सीजेपी पुन्हा त्याच आक्रमकतेने मैदानात उतरते की कायदेशीर चौकटीत राहून आंदोलन पुढे नेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT












