हिंगोली : RPF कर्मचाऱ्याने महिलेशी गैरवर्तन केल्याचा आरोप, प्रवाशांनी रुळावर बसून ट्रेन रोखली

हिंगोली रेल्वे स्थानकावर किशोरवयीन मुलाला मारहाण आणि महिलांशी गैरवर्तन केल्याचा आरोप करत प्रवाशांनी रेल्वे रुळांवर ठिय्या दिला. पोलिसांनी चौकशीचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

ADVERTISEMENT

RPF personnel
RPF personnel
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

हिंगोली : RPF कर्मचाऱ्याने महिलेशी गैरवर्तन केल्याचा आरोप

point

प्रवाशांनी रुळावर बसून ट्रेन रोखली

महाराष्ट्रातील हिंगोली रेल्वे स्थानकावर गुरुवारी (22 ऑक्टोबर) प्रवाशांनी आंदोलन करत जोधपूर-हैदराबाद मार्गावरील भगत की कोठी-काचीगुडा एक्स्प्रेस दोन तासांहून अधिक काळ रोखून धरली. रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) कर्मचाऱ्यांनी एका किशोरवयीन मुलाला मारहाण केल्याचा आणि त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्या महिलांशी गैरवर्तन केल्याचा आरोप प्रवाशांनी केला. मात्र, आरपीएफने हे आरोप फेटाळले आहेत. तिकीट नसताना प्रवास करणारे काही प्रवासी व्हिडीओ चित्रीकरण करत असल्याने कर्मचाऱ्यांनी त्यांना आक्षेप घेतल्याचे आरपीएफकडून सांगण्यात आले. या घटनेमुळे रेल्वे स्थानकावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ही घटना गुरुवारी पहाटे भगत की कोठी-काचीगुडा एक्स्प्रेस (गाडी क्रमांक १७६०६) वाशिम स्थानक ओलांडल्यानंतर घडल्याचा आरोप आहे. 

हेही वाचा : महिलेचा आवाज.., 'जरांगेंना शिंदेंमार्फत 500 कोटी पोहोचले'; ऑडिओ क्लीपने राज्यात खळबळ

वाशिमपासून हिंगोली सुमारे 40 किलोमीटर अंतरावर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी असलेला प्रवाशांचा हा समूह नागपूर येथे दसरा मेळाव्याला उपस्थित राहून परतत होता. या प्रवाशांनी अकोला येथून नांदेडला जाण्यासाठी गाडीत प्रवेश केला होता. यावेळी त्यांच्यासोबत असलेला एक किशोरवयीन मुलगा चुकून आरक्षित डब्यात गेला. त्यानंतर काही प्रवासी आणि आरपीएफ कर्मचाऱ्यांनी त्याला मारहाण केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. मुलासोबत असलेल्या महिलांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना धक्काबुक्की करण्यात आली आणि त्यांच्याशी गैरवर्तन करण्यात आल्याचेही प्रवाशांनी सांगितले. समूहातील इतर काही जणांनाही मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला.

हेही वाचा : 'ऑडिओ क्लिपमध्ये अतुल भातखळकर, श्वेता शालिनी यांच्यासारखा आवाज', उदय सामंतांचा भाजपवर थेट आरोप अन्...

गाडी हिंगोली रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर संतप्त प्रवाशांनी खाली उतरून इंजिनसमोरील रुळांवर ठिय्या दिला. रेल्वे कर्मचाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करत त्यांनी गाडी पुढे जाण्यापासून रोखली. या आंदोलनामुळे एक्स्प्रेस दोन तासांहून अधिक काळ थांबून राहिल्याची माहिती हिंगोली रेल्वे स्थानकावरील एका अधिकाऱ्याने दिली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हिंगोली शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या तक्रारीची चौकशी करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर प्रवाशांनी आंदोलन मागे घेतले आणि रेल्वेचा पुढील प्रवास सुरू झाला.

दरम्यान, आरपीएफचे निरीक्षक एस. पी. पासवान यांनी कर्मचाऱ्यांवरील आरोप फेटाळले. बी-2 या गर्दीच्या डब्यातील परिस्थिती नियंत्रणात आणताना आरपीएफ कर्मचाऱ्यांनी तिकीट नसलेल्या काही प्रवाशांना व्हिडीओ चित्रीकरण करण्यास आक्षेप घेतल्याचे त्यांनी सांगितले. चित्रीकरण केलेले व्हिडीओ हटवण्यास सांगितल्यानंतर संबंधित किशोरवयीन मुलगा घाबरल्याचे पासवान यांनी स्पष्ट केले. मुलाची अवस्था लक्षात आल्यानंतर आरपीएफच्या एका शिपायाने रेल्वे गार्ड आणि हिंगोली स्थानकाच्या स्टेशन मास्तरांशी संपर्क साधून डॉक्टरांची व्यवस्था करण्याची विनंती केली, असेही त्यांनी सांगितले. या संपूर्ण घटनेची चौकशी सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.