भीमाशंकर वृक्षतोडीवर देवेंद्र फडणवीस रोखठोक, टोरंट प्रकल्पाचं समर्थन करत काय म्हणाले?
Devendra Fadnavis on Bhimashankar tree felling : भीमाशंकरच्या जंगलातील वृक्षतोडीवरून सुरू असलेल्या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोरंट प्रकल्पाचं समर्थन केलं आहे. तीन हजार मेगावॅट वीज, वृक्षलागवड आणि पर्यावरणीय परिणामांबाबत त्यांनी आपली भूमिका मांडली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भीमाशंकर वृक्षतोडीवर देवेंद्र फडणवीस रोखठोक
टोरंट प्रकल्पाचं समर्थन करत काय म्हणाले?
Devendra Fadnavis on Bhimashankar tree felling : भीमाशंकरच्या जंगलातील वृक्षतोडीचा मुद्दा सध्या चर्चेत आला असून प्रस्तावित टोरंट प्रकल्पाला राजकीय पक्षांसह विविध सामाजिक संघटनांनी विरोध केला आहे. या प्रकल्पामुळे पाणी, पर्यावरण आणि स्थानिक नागरिकांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पाची बाजू मांडत विरोधकांवर टीका केली. पंप स्टोरेज म्हणजेच जलविद्युत प्रकल्पातून मिळणारी ऊर्जा ही स्वच्छ आणि प्रदूषण न करणारी असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात सौरऊर्जेची मोठी क्षमता निर्माण झाली असली, तरी संध्याकाळी पाच वाजल्यानंतर सौरऊर्जा उपलब्ध होत नाही. त्यानंतरच्या चार तासांच्या सर्वाधिक वीज मागणीच्या काळात कोळशावर आधारित वीजनिर्मिती केल्यास मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. त्यामुळे स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी महाराष्ट्र पंप स्टोरेज प्रकल्पांचं केंद्र बनत असल्याचं फडणवीस म्हणाले. ते नवी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.
हेही वाचा : सुनेत्रा पवार राज्याच्या अर्थमंत्री होणार? राष्ट्रवादीची बैठक अन् फडणवीसांच्या भेटीगाठी; काय घडतंय?
प्रकल्पामुळे तेवढ्या पाण्याची बचत होणार - देवेंद्र फडणवीस
प्रस्तावित टोरंट प्रकल्पातून तीन हजार मेगावॅट वीज निर्माण होणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. या प्रकल्पासाठी ज्या जागेचा वापर केला जाणार आहे, त्या ठिकाणी पाण्याचा साठा करण्यासाठी जलाशय तयार केला जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या जागेच्या बदल्यात कंपनीने वनविभागाला जवळपास तिप्पट जमीन दिली असल्याचंही त्यांनी सांगितलं. वनविभाग कंपनीच्या खर्चातून संबंधित ठिकाणी 30 हजार आणि प्रकल्पाच्या जागेवर 60 हजार, अशी एकूण 90 हजार झाडं लावणार असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं. तीन हजार मेगावॅट वीजनिर्मितीसाठी औष्णिक वीज प्रकल्पाचा पर्याय स्वीकारल्यास त्यातून होणारं प्रदूषण कमी करण्यासाठी पूर्ण वाढलेली 28 कोटी झाडं लावावी लागतील, असा दावा त्यांनी केला. याशिवाय, औष्णिक वीजनिर्मितीतून होणारं उत्सर्जन रस्त्यावरील 40 लाख गाड्यांच्या उत्सर्जनाइतकं असल्याचं त्यांनी सांगितलं. कोळशावर आधारित वीजनिर्मितीसाठी वर्षाला 19 अब्ज घनफूट पाणी लागेल, जे जवळपास चार लाख लोकांना पुरू शकेल. या प्रकल्पामुळे तेवढ्या पाण्याची बचत होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यातील हवामानाचा लपंडाव, निम्म्याहून अधिक जिल्ह्यांत कोरडे हवामान
कोणाची उपजीविका धोक्यात येत असेल तर त्याचाही विचार केला जाईल - देवेंद्र फडणवीस
हा प्रकल्प भीमाशंकरच्या जंगलापासून 16 किलोमीटर आणि भीमाशंकर मंदिरापासून 20 किलोमीटर दूर असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. या प्रकल्पातील गुंतवणूक आणि रोजगार महाराष्ट्रातच उपलब्ध होणार असून निर्माण होणाऱ्या ऊर्जेवर राज्याचा पहिला अधिकार असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, स्थानिक नागरिकांच्या उपजीविकेचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर, कोणाची उपजीविका धोक्यात येत असेल तर त्याचाही विचार केला जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. वनविभाग आणि केंद्रीय पर्यावरण व वन विभागाने 18 महिने सुनावणी घेतल्यानंतर आणि आवश्यक पर्यावरणीय उपाययोजना निश्चित केल्यानंतर या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याचं फडणवीस म्हणाले. स्थानिक ग्रामस्थांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. समाजातील कोणताही घटक वंचित राहू नये, यासाठी प्रयत्न केले जातील, असं सांगतानाच केवळ राजकारणासाठी खोटा नरेटिव्ह पसरवून महाराष्ट्रात स्वच्छ ऊर्जेचे प्रकल्प रोखण्याचा प्रयत्न योग्य नसल्याची टीका त्यांनी केली.
