मुंबई : सप्तपदी झाली, थाटात विवाह झाला.., पण वधू-वर थेट रुग्णालयात पोहोचले; काय घडलं?

Mumbai News : भांडुपमध्ये लग्नाचे जेवण केल्यानंतर नवरा-नवरीसह 30 हून अधिक जणांची प्रकृती बिघडली. मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात सात मुलांसह 27 जणांवर उपचार सुरू आहेत.

ADVERTISEMENT

Mumbai News
Mumbai News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

मुंबई : सप्तपदी झाली, थाटात विवाह झाला..,

point

पण वधू-वर थेट रुग्णालयात पोहोचले; काय घडलं?

Mumbai News : मुंबईतील भांडुप परिसरात लग्नाच्या जेवणानंतर नवरा-नवरीसह 30 हून अधिक जणांची प्रकृती बिघडल्याची घटना समोर आली आहे. जेवण केल्यानंतर उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने वऱ्हाडी मंडळींना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. लग्नसोहळ्यातील आनंदाचे वातावरण काही तासांतच चिंतेत आणि गोंधळात बदलले. या घटनेत मुलुंड येथील अग्रवाल रुग्णालयात एकूण 27 जणांना दाखल करण्यात आले आहे. यामध्ये सात लहान मुलांचाही समावेश आहे. सप्तपदी घेतल्यानंतर आयुष्यभर एकमेकांची साथ देण्याची शपथ घेतलेल्या नवरा-नवरीला पहिल्या रात्रीपूर्वीच रुग्णालयात दाखल व्हावे लागल्याने या घटनेची चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा : इंडिया आघाडीच्या महारॅलीची भव्य सुरुवात, राहुल गांधी रामलीला मैदानाकडे रवाना, दिल्लीत काय घडतंय?

27 जणांना दाखल केले रुग्णालयात 

भांडुप परिसरात लग्नसोहळा पार पडल्यानंतर उपस्थितांनी जेवण केले. मात्र, जेवण केल्यानंतर काही वेळातच अनेकांना पोटदुखी, उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला काही जणांची प्रकृती बिघडली, मात्र त्यानंतर रुग्णांची संख्या वाढत गेली. परिस्थिती लक्षात घेऊन वधू आणि वर पक्षातील मंडळींना तातडीने जवळच्या रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले. मुलुंड येथील महापालिकेच्या अग्रवाल रुग्णालयात रात्री सुमारे 11 वाजून 40 मिनिटांनी एकापाठोपाठ एक रुग्ण दाखल होऊ लागले. त्यामुळे रुग्णालयात एकच धावपळ उडाली. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण 27 रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. यामध्ये 11 महिला, नऊ पुरुष आणि सात लहान मुलांचा समावेश आहे. सर्व रुग्णांना तातडीने प्राथमिक उपचार आणि औषधे देण्यात आली आहेत.

हेही वाचा : जळगाव : तुरुंगात कट, 3.17 कोटींचा दरोडा...बडतर्फ PSI चं बिंग फुटलं!

तुकाराम मुंढे यांच्याकडेही कुटुंबीयांनी दाद मागितली

दरम्यान, या घटनेनंतर लग्नासाठी जेवणाची व्यवस्था करणाऱ्या केटरिंग सेवेकडे कुटुंबीयांनी बोट दाखवले आहे. जेवणाचा दर्जा निकृष्ट होता आणि शिळे अन्न दिल्यामुळेच अनेकांची प्रकृती बिघडल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांना त्रास सहन करावा लागल्याने कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित केटरर्सविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडेही कुटुंबीयांनी दाद मागितली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा केटरिंग व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. मात्र, जेवणाच्या दर्जाबाबत करण्यात आलेले आरोप आणि त्यामागील नेमके कारण याबाबत अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही.

या घटनेत सध्या अग्रवाल रुग्णालयात दाखल असलेल्या सर्व 27 रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. उलट्या आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होण्याचा त्रास पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत रुग्णांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. लग्नसोहळ्यात काही तासांपूर्वीच ढोल-ताशांच्या गजरात आणि आनंदाच्या वातावरणात नव्या आयुष्याची सुरुवात करणाऱ्या नवरा-नवरीला रुग्णालयातील खाटेवर उपचार घ्यावे लागले. लग्नासाठी जमलेल्या पाहुण्यांनाही अचानक रुग्णालयात धाव घ्यावी लागली. ज्या रात्री नवदाम्पत्याच्या नव्या आयुष्याची सुरुवात होणार होती, त्याच रात्री त्यांच्यासह अनेकांना रुग्णालयात दाखल व्हावे लागल्याने भांडुपमधील या घटनेने लग्नसमारंभातील जेवणाच्या व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.