जळगाव : तुरुंगात कट, 3.17 कोटींचा दरोडा...बडतर्फ PSI चं बिंग फुटलं!

Jalgaon Crime : जळगावच्या भोकर येथील स्टेट बँक ऑफ इंडियावर दरोडा टाकल्याप्रकरणी बडतर्फ PSI शंकर जासक याला अटक करण्यात आली आहे. कारागृहातील ओळखीतून दरोड्याचा कट आखल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

ADVERTISEMENT

Jalgaon Crime
Jalgaon Crime
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

जळगाव : तुरुंगात कट, 3.17 कोटींचा दरोडा...बडतर्फ PSI चं बिंग फुटलं!

point

कारागृहातील ओळखीतून दरोड्याचा कट आखल्याची माहिती तपासातून समोर

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यातील भोकर येथील स्टेट बँक ऑफ इंडियावर टाकण्यात आलेल्या दरोड्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दरोड्याचा मुख्य सूत्रधार बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक शंकर जासक असल्याची प्राथमिक माहिती आहे. कारागृहात झालेली ओळख, त्यातून निर्माण झालेले कथित गुन्हेगारी संबंध आणि कारागृहातच आखलेला बँक दरोड्याचा कट, असा या संपूर्ण घटनेचा घटनाक्रम समोर येत आहे. जामिनावर बाहेर आल्यानंतर आरोपींनी थेट भोकर येथील बँकेला लक्ष्य केल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. विशेष म्हणजे, शंकर जासक याच्यावर यापूर्वीही बँक दरोड्याचा आरोप आहे. 2023 मध्ये जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत त्याने आपल्या साथीदाराच्या मदतीने तब्बल 3 कोटी 17 लाख रुपयांचा दरोडा टाकल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात कारागृहात असताना त्याची ओळख गजानन राजेंद्र पवार याच्याशी झाली. गजानन पवार हा 2024 मध्ये चाळीसगाव परिसरात अनैतिक संबंधातून प्रेयसीच्या पतीच्या खून प्रकरणात कारागृहात होता. काही महिन्यांपूर्वी दोघेही जामिनावर बाहेर आले होते.

हेही वाचा : इंडिया आघाडीच्या महारॅलीची भव्य सुरुवात, राहुल गांधी रामलीला मैदानाकडे रवाना, दिल्लीत काय घडतंय?

सोने आणि रोकड पाच ते सहा बॅगांमध्ये भरून आरोपींनी पळ काढला

कारागृहात झालेल्या याच ओळखीतून शंकर जासक आणि गजानन पवार यांनी एकत्र येत भोकर येथील बँक लुटण्याचा कट आखल्याची माहिती समोर आली आहे. या कटात आणखी दोघांना सहभागी करून घेत चौघांनी दरोड्याची योजना तयार केली. ठरल्याप्रमाणे चारही आरोपी भोकर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत दाखल झाले. छऱ्याच्या पिस्तुलाचा धाक दाखवत त्यांनी बँकेचे व्यवस्थापक आणि रोखपाल यांना धमकावले. कर्मचाऱ्यांच्या डोक्याला पिस्तूल लावून बँकेतील तब्बल 16 लॉकर उघडण्यास भाग पाडले. या लॉकरमधील सोने आणि रोकड पाच ते सहा बॅगांमध्ये भरून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी तब्बल 40 ते 45 मिनिटे बँकेत होते. यावेळी बँकेतील कर्मचाऱ्यांना मोठ्या दहशतीचा सामना करावा लागला. दरोड्याच्या वेळी बँकेत उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शनिवार असल्याने बँकेत ग्राहकांची वर्दळ कमी होती. चार जण अचानक बँकेत आले आणि त्यांनी कर्मचाऱ्यांना हात वर करण्यास सांगितले. एका कर्मचाऱ्याने अलार्मचे बटण दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर दरोडेखोरांनी त्याला लक्ष्य करत मोबाईल बंद करण्याची धमकी दिली. कर्मचाऱ्याचे हात बांधून त्याला एका बाजूला बसवण्यात आले. बँकेतून सुमारे 12 ते 14 लाख रुपयांची रोकड आणि जवळपास 30 कोटी रुपयांचे सोने लुटल्याची माहिती कर्मचाऱ्याने दिली आहे.

हेही वाचा : Govt Jobs : भारत सरकारच्या कंपनीत ड्रायव्हरसह विविध पदांसाठी भरती, महिन्याला 70 हजार रुपयांपर्यंत पगार

दरोड्यानंतर आरोपी धरणगावच्या दिशेने पसार झाले. भोकरमधील ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग सुरू केला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली. पळून जाताना आरोपींनी चावलखेड्याजवळ चार बॅगा रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांकडून आरोपी कोणत्या दिशेने पळाले, याची माहिती घेऊन पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. अखेर चावलखेडा परिसरातील एका शेतात लपून बसलेल्या शंकर जासक आणि गजानन पवार यांना पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. या प्रकरणात मुख्य संशयितांसह एकूण चार जणांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. आरोपींकडून सुमारे 15 लाख रुपयांची रोकड आणि सोन्याने भरलेल्या बॅगा जप्त केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या दरोड्यात नेमकी किती रोकड आणि किती सोने लंपास झाले, याचा तपास अद्याप सुरू आहे. बँक कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रोकड 12 ते 14 लाख रुपये आणि सोन्याची किंमत जवळपास 30 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, या रकमेबाबत अधिकृत तपशील तपासातून स्पष्ट होणे बाकी आहे. या दरोड्यात सहभागी असलेले अन्य दोन आरोपी कोण आहेत, दरोड्याच्या नियोजनात त्यांची नेमकी भूमिका काय होती आणि या कटामागे आणखी काही साथीदार आहेत का, याचा पोलीस शोध घेत आहेत. तसेच बँकेत कर्मचाऱ्यांना धमकावताना गोळीबार झाल्याची माहितीही समोर आली आहे. कारागृहातील ओळखीपासून बँकेवरील दरोड्यापर्यंत पोहोचलेल्या या प्रकरणामुळे जळगाव जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे. पोलीस तपासात आणखी कोणते खुलासे होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.