पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. मात्र ती कोव्हिड व्हॅक्सिन नव्हती तर मोदी व्हॅक्सिन होती असा टोला ममता बॅनर्जी यांनी लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावे महाविद्यालयं आहेत, स्टेडियम आहेत, व्हॅक्सिनही आहेत..कारण व्हॅक्सिन घेतल्यावर जे प्रमाणपत्र मिळतं त्यावर मोदींचा फोटो आहे. काही दिवस थांबा एखाद्या दिवशी ते देशाचंही नाव बदलतील असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचं घोडामैदान जवळ आलं आहे. अशात भाजपने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदींसह भाजपचे प्रमुख नेते आणि ममता बॅनर्जी यांच्यात आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय टोलेबाजी पाहण्यास मिळते आहे.
ADVERTISEMENT
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ मार्च रोजी लस घेतली. त्यानंतर आता ते पश्चिम बंगालच्या प्रचारात व्यस्त आहेत. रविवारी म्हणजेच ७ मार्चला त्यांच्या उपस्थितीत अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रॅलीदरम्यान संबंधित करत असताना उपस्थितांना तृणमूल काँग्रेस गेल्या १० वर्षांपासून भ्रष्टाचार आणि खंडणीचा खेळ खेळत असल्याचं आपल्या वक्तव्यात सांगितलं होतं. “तृणमूल काँग्रेस अनुभवी खेळाडू आहे. कोणता खेळ यांनी खेळलेला नाही? तुम्ही बंगालच्या गरीबांना लुटलं आहे. केंद्राने वादळाचा फटका बसलेल्यांनी पाठवलेली मदतही लुटण्यात आली. बंगालमध्ये ऑलिम्पिक खेळाच्या दर्जाचा भ्रष्टाचार सुरू आहे. मात्र यावेळी भाजपचं सरकार येणार आणि हा खेळ थांबेल आणि विकास होईल” असंही मोदींनी म्हटलं आहे. तसंच पश्चिम बंगालमध्ये परिवर्तन होईलच असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला. या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर आता ममता बॅनर्जी यांनी मोदींवर टीका केली आहे.
ADVERTISEMENT
