Bacchu Kadu : ५० खोक्यांवर CM शिंदेंनी ५ दिवसांत बोलावं, अन्यथा १२ आमदार संपर्कात!

मुंबई तक

26 Oct 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:41 AM)

अमरावती : भाजपचे समर्थक आमदार रवी राणा आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे समर्थक आमदार बच्चू कडू यांच्यातला संघर्ष तीव्र होण्याची चिन्हं आहेत. शिवाय या संघर्षात आता बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच ओढलं आहे.   ५० आमदारांना खरंच ५० खोके दिले का? हे आता शिंदे-फडणवीस यांनीच १ तारखेपर्यंत स्पष्ट करावं, अन्यथा […]

Mumbaitak
follow google news

अमरावती : भाजपचे समर्थक आमदार रवी राणा आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे समर्थक आमदार बच्चू कडू यांच्यातला संघर्ष तीव्र होण्याची चिन्हं आहेत. शिवाय या संघर्षात आता बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच ओढलं आहे.  

हे वाचलं का?

५० आमदारांना खरंच ५० खोके दिले का? हे आता शिंदे-फडणवीस यांनीच १ तारखेपर्यंत स्पष्ट करावं, अन्यथा १२ आमदार आमच्या संपर्कात असून आम्ही वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहोत असा इशारा बच्चू कडू यांनी दिला. ते आज नागपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

बच्चू कडू यांनी काय म्हटलं आहे?

सत्तेवर लाथ मारणारा माझ्या सारखा स्वाभिमानी माणूस असले आरोप सहन करणार नाही. त्यामुळे मी रवी राणा यांच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. १ तारखेपर्यंत आरोप सिद्ध करावेत नाहीतर माफी मागावी, त्यांना जशाच तसे उत्तर देऊ असा जोरदार पलटवार बच्चू कडू यांनी केला.

१२ आमदार वेगळा निर्णय घेणार?

रवी राणांच्या आरोपांमुळे केवळ माझ्या एकट्यावर नाही तर मुख्यमंत्र्यांसहीत ५० आमदारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. आजपर्यंत विरोधक आरोप करत होते तोपर्यंत आम्ही दुर्लक्ष करत होतो. पण आता आपल्याच गटातील आमदार जर आरोप करत असेल तर ते गंभीर आहे. साधं गणपतीच्या वर्गणीला गेलो तरी लोकं ५० खोक्यांवरुन बोलत आहेत.

त्यामुळे राणांच्या आरोपांनंतर ५० आमदार नाराज झाले आहेत. ७ ते ८ आमदारांनी मला फोन करुन त्यांची भूमिका मांडली आहे. त्यामुळे आता वेळ आली आहे की शिंदे-फडणवीस यांनी माध्यमांसमोर या आरोपांबाबत स्पष्टीकरण द्यावं, अन्यथा हे १२ आमदार १ तारखेला वेगळा निर्णय जाहीर करणार आहोत.

बच्चू कडू – रवी राणा वाद :

रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या दरम्यान मागील काही काळापासून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. हा वाद आता शिगेला पोहचला आहे. बच्चू कडू यांनी नाव न घेता रवी राणा यांच्यावर आरोप केले होते. जेव्हा मी निवडणूकचा अर्ज भरला तेव्हा आम्ही रक्तदान करून अर्ज भरतो. पण आधी खिसे कापणारे आणि नंतर किराणा वाटणारे काही कमी नाहीत, असा आरोप त्यांनी केला होता.

तसंच जे इथं भाषण करतात सभागृहात काहीच करत नाहीत. ५० वर्षात अनेक आमदार गेले सभागृहात, पण किती जणांनी अपंग अनाथांसाठी आवाज उठवला? असा सवाल कडू यांनी केला होता. ताकाला जाऊन भांडं लपवायच हे आमचं काम नाही. कोणी कोणता झेंडा घेतला याचा संबंध नाही, आमचा झेंडा, अजेंडा हा सेवेचा झेंडा आहे, असे त्यांनी सांगितले होते.

या आरोपांवर बोलताना रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केले. बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीला धोका दिला आणि गुवाहाटीमध्ये जाऊन करोडोंचा व्यवहार केला, असा आरोप त्यांनी केला होता. शिंदे गटातील आमदारांवर बंडखोरीसाठी भाजपकडून ५० कोटी रुपये घेतल्याचे आरोप सातत्याने महाविकास आघाडीतील आमदार आणि नेत्यांकडून झाले आहेत. मात्र पहिल्यांदाच भाजप समर्थक आमदारकडून हे आरोप झाल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

    follow whatsapp