‘आपला राजकीय बळी जाणार असं वाटलं अन मी शरद पवारांना फोन केला’; जितेंद्र आव्हाडांची फेसबुक पोस्टची चर्चेत

मुंबई तक

27 Jul 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 10:54 AM)

माजी गृहनिर्माणमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड हे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे खंदे समर्थक मानले जातात. शरद पवारांची बाजू भक्कमपणे मांडताना ते अनेकदा दिसतात. 2019 साली अजित पवार यांनी बंड करून पहाटेची शपथविधी केल्यानंतर यशवंत चव्हाण सेंटर शरद पवारांसोबत आघाडीवर होते. मग ते आमदारांना हॉटेलवर नेण्यापासून ते सगळ्या सुविधा बघण्यापर्यंत. त्याचे फळ म्हणून […]

Mumbaitak
follow google news

माजी गृहनिर्माणमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड हे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे खंदे समर्थक मानले जातात. शरद पवारांची बाजू भक्कमपणे मांडताना ते अनेकदा दिसतात. 2019 साली अजित पवार यांनी बंड करून पहाटेची शपथविधी केल्यानंतर यशवंत चव्हाण सेंटर शरद पवारांसोबत आघाडीवर होते. मग ते आमदारांना हॉटेलवर नेण्यापासून ते सगळ्या सुविधा बघण्यापर्यंत. त्याचे फळ म्हणून महाविकास आघाडीच्या सरकरमध्ये त्यांना गृहनिर्माण खातं देण्यात आलं. आता महाविकास आघाडीचे सरकार गेले आहे. त्यानंतर काही चर्चांना उधाण आले आहे.

हे वाचलं का?

जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांचं नाव घेत लिहिलेली पोस्ट चर्चेत

त्यातच आता शरद पवारांबाबत जितेंद्र आव्हाड यांनी लिहलेल्या फेसबुक पोस्टची जोरदार चर्चा सुरु आहे. आव्हाडांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराला विरोध केल्यानंतर पक्षातून कशापद्धतीने दबाव आणलं गेला आणि त्यादरम्यान शरद पवार कसे खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे होते, हे त्यांनी या पोस्टमध्ये लिहले आहे. तसेच त्या घडामोडी दरम्यान आपण कसे अस्वस्थ होतो आणि पवारांना फोन लावल्यानंतर काय झालं, सगळं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहले आहे.

पवार साहेबांनी मला कधिही एकटे पाडले नाही, या मथळ्याखाली आव्हाडांनी ही पोस्ट केली आहे. दिवसभर समाज माध्यमांवर एक बातमी पसरते आहे कि, जितेंद्र आव्हाडांना शरद पवारांनी एकटे का पाडले. आज जे मी कधीच कोणाला बोललो नाही. सांगितले नाही ते मी इथे लिहीत आहे, असं म्हणत त्यांनी एक मोठी पोस्ट केली आहे. बाबासाहेब पुरंदरे यांना शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केले. पुरस्कार जाहीर केल्यानंतर आपण पुरंदरेंना आपल्या मनात उपस्थित पाच प्रश्न विचारत त्यांनी उत्तरे द्यावी, अशी मागणी केली. ते प्रश्न विचारल्यानंतर पक्षातून अर्थातच माझ्यावर दबाव सुरु झाला. की तुम्ही या प्रकरणातून माघार घ्या आणि माफी मागा. मी स्पष्टपणाने सांगितले कि, माफी तर मागणारच नाही आणि माघार घेणार नाही मी शांत बसेन. पण, जेव्हा प्रचंड दबाव वाढायला लागला तेव्हा मला वाटले की, आपला राजकीय बळी जाणार, असा खुलासा या पोस्टच्या माध्यमाने आव्हाडांनी केला.

पुढे लिहताना आव्हाड म्हणाले, मी माघार घेणार नव्हतो, मी माफी मागणार नव्हतो. आणि म्हणून तातडीने मी पवार साहेबांना फोन लावला. तसा मी मनातून प्रचंड घाबरलेलो होतो. मी पवार साहेबांना वस्तुस्थिती समजावून सांगितली, कि साहेब मी जे काही प्रश्न विचारले आहेत ते मी माझ्या अभ्यासातून विचारले आहेत. तेव्हा साहेबांनी मला सांगितले की, सामाजिक विषयामध्ये मतभिन्नता असू शकते. तेव्हा तू जे काही तुझ्या अभ्यासातून करतो आहेस ते तू कर. हा विषय तू गेले अनेक वर्षे हाताळतो आहेस. त्यामुळे तुला कोणाचे ऐकण्याची गरज नाही. तू तुझ्या मार्गाने पुढे जा, असं सांगत पवार कसे आपल्या पाठीशी उभे होते हे जितेंद्र आव्हाडांनी सांगितले.

पक्षातून दबाव असतांना, पक्षातील दुसऱ्या फळीतील अनेकनेते माझ्या मताच्या विरोधात असतांना ते कायम माझ्या मागे सावलीसारखे उभे राहिले ,हे उभ्या महाराष्ट्राला मी स्पष्टपणाने सांगू इच्छितो, असे आव्हाडांनी सांगितले. सांगलीमध्ये जेव्हा माझ्यावरती हल्ला झाला त्यानंतर पवारांनी स्वतःहून तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांना पत्र लिहून माझ्या सुरक्षेत वाढ करावी, अशी जाहीर मागणी केली. जेंव्हा-जेंव्हा माझ्या सुरक्षिततेविषयी प्रश्न उभे राहिले तेव्हा त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन माझी सुरक्षा वाढविण्यासाठी आग्रह धरला, असं देखील आव्हाड म्हणाले.

आजपर्यंतच्या माझ्या राजकीय लढाईत मी गेले 35 वर्षे त्यांच्याबरोबर आहे. अन अनेकांनी माझ्या विरोधात कुरघोड्या केल्या, माझ्या विरुद्ध षड्यंत्र रचली, अनेक कटकारस्थाने रचली गेली. ते सगळे एकाच कारणाने यशस्वी होऊ शकले नाही, ते एकमेव कारण होते शरद पवार, असं थेट आव्हाडांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितलं. त्यामुळे पवारांनी आपल्याला कधीच एकटे पाडले नाही, त्यामुळे आफवा पसरवू नका, असे पोस्टच्या शेवटी आव्हाडांनी लिहीलं आहे.

    follow whatsapp