‘…मग अमित शाह काय मध्यस्थी करणार आहे?’; बोम्मईंनी डिवचल्यानंतर संजय राऊतांचा संताप

मुंबई तक

10 Dec 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:24 AM)

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महाराष्ट्रातील राष्ट्रवादी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसच्या खासदारांनी अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी ट्विट करत वादाला चिथावणी दिली. बोम्मईंच्या ट्विटनंतर माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी केंद्री गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सवाल केलाय. माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महाराष्ट्रातील राष्ट्रवादी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसच्या खासदारांनी अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी ट्विट करत वादाला चिथावणी दिली. बोम्मईंच्या ट्विटनंतर माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी केंद्री गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सवाल केलाय.

हे वाचलं का?

माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, “कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका अशी दिसतेय की, आमचं ते आमचं आणि तुमचं ते आमच्या बापाचं. पण, आमचे मुख्यमंत्री काय करताहेत हा आमच्या पुढचा प्रश्न आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलताहेत आणि काय सांगताहेत, याच्याशी महाराष्ट्राला काहीही पडलेलं नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे सध्या इकडचे प्रमुख आहेत. ते बोम्मईंना कशाप्रकारे उत्तर देताहेत किंवा ते या लढाईत उतरले आहेत की नाही. कुठे आहेत?”, असा सवाल उपस्थित करत संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलंय.

“गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नावर तोंड उघडलेलं नाही. काल सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेनेचे आमचे खासदार शिंदे गटाचे नाही. अमित शाहांना जाऊन भेटले. लोकसभेत सुद्धा राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचे खासदार होते. हे जे पळपुटे खासदार आहेत, ते गप्प बसले. त्यांनी सीमा प्रश्नावर तोंडही उघडलं नाही. भूमिका घेतली नाही, याची महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद राहिल. बोम्मई म्हणतात, एक इंच जमीन देणार नाही. मी अमित शाहांचं ऐकणार नाही, मग अमित शाह मध्यस्थी कसली करणार आहेत? मग नक्की काय मध्यस्थी करणार आहे?”, असं म्हणत संजय राऊतांनी केंद्रीय गृहमंत्र्यांनी महाराष्ट्रातील खासदारांना दिलेल्या आश्वासनावर प्रश्न उपस्थित केला आहे.

‘अमित शाहांची भेट घेतल्यानं काही फरक पडणार नाही’; बसवराज बोम्मईंच्या ‘ट्विट’ने वाद वाढणार!

“पदोपदी महाराष्ट्राची अवहेलना करावी. महाराष्ट्राचा अपमान करावा, यासाठी हे षडयंत्र आहे. अशावेळी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जोरदारपणे उठून उभं राहायचं असतं. हे गप्प बसलेले आहेत”, अशा शब्दात राऊतांनी एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलंय.

शिंदे गटाला ढाल-तलवार नाही, तर कुलूप निशाणी द्यायला पाहिजे -संजय राऊत

“मुख्यमंत्र्यांनी या विषयावर भूमिका घ्यावी. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मग ते कोणत्याही पक्षाचे असो, त्यांनी कठोर आणि ठाम भूमिका घेतलेली आहे. हे एकमेव मुख्यमंत्री आहेत, ज्यांनी या प्रश्नावर तोंड उघडलेलं नाही. त्यांच्या तोंडाला कुलूप लावलेलं आहे. त्यांची निशाणी ढाल-तलवार नाही, तर कुलूप पाहिजे. त्यांच्या गटाला कुलूप निशाणी द्यायला पाहिजे. त्यांची चावी दिल्लीत आहे. ते जेव्हा उघडतील, तेव्हा ते बोलतील. पण, बोलण्याची हिंमत नाही. ती हिंमत शिवसेनेत आहे”, अशी टीका संजय राऊतांनी एकनाथ शिंदे आणि बाळासाहेबांची शिवसेना गटावर केली.

    follow whatsapp