धोपेश्वर रिफायनरीसाठी स्थानिकांना पाहिजे ते पॅकेज देऊ : उदय सामंत यांचे मोठे आश्वासन

मुंबई तक

• 09:55 AM • 24 Sep 2022

रत्नागिरी : धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पासाठी स्थानिकांना पाहिजे ते पॅकेज देऊ, त्यांच्या शंका आणि गैरसमज आम्ही नक्की दूर करू, असे म्हणत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्थानिकांना मोठे आश्वासन दिले. रत्नागिरीतील निर्यात आणि एक जिल्हा एक उत्पादन, व्यवसाय करण्यास सुलभता, गुंतवणूक प्रोत्साहन परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. सामंत पुढे म्हणाले, रत्नागिरीमध्ये कोणताही प्रकल्प आला तरी त्याला […]

Mumbaitak
follow google news

रत्नागिरी : धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पासाठी स्थानिकांना पाहिजे ते पॅकेज देऊ, त्यांच्या शंका आणि गैरसमज आम्ही नक्की दूर करू, असे म्हणत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्थानिकांना मोठे आश्वासन दिले. रत्नागिरीतील निर्यात आणि एक जिल्हा एक उत्पादन, व्यवसाय करण्यास सुलभता, गुंतवणूक प्रोत्साहन परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

हे वाचलं का?

सामंत पुढे म्हणाले, रत्नागिरीमध्ये कोणताही प्रकल्प आला तरी त्याला विरोध होणारचं अशी एक भावना उद्योजकांमध्ये निर्माण झाली आहे. पण आता ती भावना आपल्याला पुसण्याची गरज आहे. जमिनीचे अधिग्रहणही झाले आहे. स्थानिक आमदारांचा विरोध नाही. मग रिफायनरीला विरोध करणारे लोक कोण आहेत हे शोधलं पाहिजे. रिफायनरी प्रकल्प आला तर जिल्ह्यातील घराघरात रोजगार मिळेल असेही सामंत म्हणाले.

काय आहे नेमका रिफायनरीचा वाद?

स्थानिकांच्या विरोधाच्या मुद्द्यावरुन सुरुवातीला शिवसेनेने जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध दर्शविला. त्यानंतर स्थानिक जनतेच्याच विरोधाचा मुद्दा पुढे करुन शिवसेनेने नाणार रिफायनरी प्रकल्पालाही विरोध दर्शविला होता. कालांतराने हा प्रकल्प रद्द होवून तो राजापूर तालुक्यातील बारसू-सोलगाव या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र सध्या बारसू-सोलगाव या ठिकाणीही प्रकल्पाबाबत दोन मतप्रवाह दिसून येत आहेत.

काही स्थानिक समर्थनात आहेत तर काही विरोधात आहेत. सद्यस्थितीत बारसू-धोपेश्वर-गोवळ भागातील स्थानिक शेतकरी व जमीन मालकांनी 3 हजार एकर जागेची संमत्तीपत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा केली आहेत. तर तालुक्यातील 55 संघटनांसह सुमारे 125 गावांचे प्रकल्प समर्थनाचे ठराव शासनाकडे सादर करण्यात आलेले आहेत. राजापूर नगर परिषदेनेही रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनाचा ठराव शासनाला पाठवण्यात आला आहे.

रिफायनरीवरुन स्थानिक आमदार-खासदार आमने-सामने

बारसू-सोलगाव रिफायनरी प्रकल्पावरुन सध्या शिवसेनेमधीलच स्थानिक आमदार-खासदार आमने-सामने उभे आहेत. रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत आणि राजापूरचे आमदार राजन साळवी या दोन नेत्यांमध्ये रिफायनरी प्रकल्पावरुन सातत्याने वादाची ठिणगी पडलेली पाहायला मिळते. आमदार राजन साळवी हे समर्थनाच्या भूमिकेवर ठाम आहेत, तर खासदार विनायक राऊत यांचा विरोधाचा सूर कायम आहे.

कोकण रिफायनरीला काँग्रेसचाही विरोध?

कोकण रिफायनरीमुळे निसर्ग, प्राणी, जलचर यांना हानी होत असेल, तर काँग्रेस त्याचे समर्थन करणार नाही, अशी भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली आहे. त्यामुळे आता कोकणातील रिफायनरीला काँग्रेसचा देखील विरोध आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नाना पटोलेंनी नुकतीच रिफायनरी विरोधक आणि समर्थक अशी दोघांची भेट घेतली होती.

    follow whatsapp