प्रफुल पटेलांचं राष्ट्रवादीतील 'वजन' कायम, मर्जीतील नेत्याला लॉटरी लागली; कोण आहेत राजेंद्र जैन?

मुंबई तक

08 Jun 2026 (अपडेटेड: 08 Jun 2026, 12:13 PM)

Rajendra jain profile story : राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेंद्र जैन यांचं नाव राज्यसभेसाठी पुढे करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

Google CTA

Rajendra jain profile story : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेतील रिक्त जागेसाठी कोणाची निवड होणार याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. सुरुवातीला मंत्री छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत होते. राज्यसभेवर जाण्याबाबत भुजबळ आग्रही असल्याची चर्चा होती. मात्र त्यांच्यानंतर त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे, अशी त्यांची इच्छा होती. या प्रस्तावाला भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेतृत्वाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने भुजबळ यांनी या स्पर्धेतून माघार घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली.

हेही वाचा : कुटुंबियांना धमक्या, घर सोडण्याची वेळ, अभिजीत दिपकेंचा तो इशारा कुणाला?

राजेंद्र जैन कोण आहेत?

राजेंद्र जैन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी विधान परिषदेचे सदस्य म्हणून काम केले आहे. राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी प्रफुल पटेल यांचे स्वीय सहाय्यक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर त्यांनी पक्ष संघटनेत स्वतःचे स्थान निर्माण केले. भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून त्यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले होते. पूर्व विदर्भातील संघटनात्मक कामकाजाची जबाबदारीही पक्षाने त्यांच्यावर सोपवली होती. राष्ट्रवादीच्या संघटन विस्तारात आणि पूर्व विदर्भातील पक्षबांधणीत त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. राजकीय क्षेत्राबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी काम केले असून गोंदिया एज्युकेशन सोसायटीचे सचिव म्हणून त्यांनी अनेक वर्षे जबाबदारी पार पाडली आहे.

राष्ट्रवादीचे बैठकीत मोठा निर्णय 

राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा होण्यापूर्वी अनेक महत्त्वाच्या बैठका झाल्या. छगन भुजबळ यांच्या सातपुडा निवासस्थानी झालेल्या बैठकीत दिलीप वळसे पाटील, प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत दिल्लीतील वरिष्ठ नेतृत्वाकडून आलेल्या संदेशावर या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले जाते. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक झाली. याच बैठकीत राजेंद्र जैन यांच्या नावावर अंतिम सहमती झाल्याची माहिती समोर आली. भुजबळ यांच्या अटीला मान्यता न मिळाल्यानंतर जैन यांच्या नावावर पक्षात एकमत झाले.

या निवडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रफुल पटेल यांचे राजकीय महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही काळात पक्षातील काही घडामोडींमुळे प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावे चर्चेत आली होती. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीतील नावांबाबत निर्माण झालेल्या वादानंतर अंतर्गत मतभेदांच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर परिस्थिती सुरळीत करण्यात आली होती. अशा पार्श्वभूमीवर प्रफुल पटेल यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाल्याने पटेल यांचे पक्षातील स्थान आणि प्रभाव कायम असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, छगन भुजबळ नाराज नसल्याचे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले असून, जैन यांच्या निवडीमुळे राष्ट्रवादीच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.