vikhe pattern : अहिल्यानगर जिल्ह्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘विखे पॅटर्न’ची चर्चा जोर धरताना दिसत आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काही दिवसांतच विधान परिषदेची आमदारकी मिळाल्याचा उल्लेख करत प्राजक्त तनपुरे यांनी राहुरीतील एका कार्यक्रमात विखे पाटील यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. पक्षप्रवेश शनिवारी झाला, रविवारी उमेदवारी जाहीर झाली आणि गुरुवारी आमदार झालो, असे सांगत त्यांनी या संपूर्ण प्रक्रियेत विखे पाटील यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे नमूद केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर ‘विखे पॅटर्न’ नेमका काय आहे, याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : जैन मुनींसाठी पांढरी पट्टी, वाद विकोपाला; दोन्ही पक्ष समोरासमोर, पाहा व्हिडीओ
निलेश लंके यांच्या वक्तव्यामुळे 'ती' चर्चा सुरुच
याच पार्श्वभूमीवर खासदार निलेश लंके यांच्या राजकीय स्थितीबाबतही विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. निलेश लंके यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत केलेल्या सूचक विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या भूमिकेवर स्पष्टीकरण दिले असले तरी आगामी निवडणुकांच्या दृष्टीने त्यांच्या राजकीय रणनीतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्येही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे.
हेही वाचा : सोलापूर विधानपरिषद : राजेंद्र राऊत खिंडीत अडकले? आता ते नेते काट्याने काटा काढणार?
विखे पॅटर्न आहे तरी काय?
सुजय विखे यांच्या लोकसभा पराभवानंतर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये निलेश लंके यांना साथ देणारे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक नेते यांना आपल्या बाजूला वळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. महायुतीची सत्ता, विकासकामे आणि स्थानिक पातळीवरील राजकीय संपर्क यांच्या माध्यमातून हे प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे. प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश आणि त्यानंतर त्यांना मिळालेली विधान परिषदेची संधी ही त्याच राजकीय प्रक्रियेचा भाग म्हणून पाहिली जात आहे. तसेच पाथर्डीतील प्रतापराव ढाकणे यांच्याबाबतही भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि विविध भागांतील स्थानिक कार्यकर्त्यांना सोबत घेण्याच्या प्रयत्नांनाच ‘विखे पॅटर्न’ असे नाव दिले जात असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत निलेश लंके यांना विविध भागांतून मिळालेल्या पाठिंब्याचे समीकरण आता बदलत असल्याची चर्चा आहे. बाळासाहेब थोरात यांचा पराभव, काँग्रेस संघटनात्मक ताकदीत झालेली घट आणि पराजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश या घडामोडींचा परिणाम जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर होताना दिसत आहे. कर्जत-जामखेड वगळता लोकसभा मतदारसंघातील बहुतांश भागांमध्ये महायुती किंवा तिच्या सहयोगी पक्षांचे वर्चस्व असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘विखे पॅटर्न’ किती प्रभावी ठरतो, निलेश लंके यांच्यासमोरील आव्हाने कशी बदलतात आणि शरद पवार जिल्ह्याच्या राजकारणात कोणता नवा राजकीय ट्विस्ट आणतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT










