BCCI आणि ICC चे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी आज वानखेडे मैदानावर उभं राहून जोरदार शाब्दीक फटकेबाजी केली. टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध सामना हरल्यानंतर मोहम्मद शमीला ट्रोल करणाऱ्यांना पवारांनी कानपिचक्या देत खेळाडूंना नाउमेद करु नका असा सल्ला दिला आहे.
ADVERTISEMENT
वानखेडे मैदानावर आज माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्या नावे स्टँडचं अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमाला सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर, शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिलीप वेंगसरकर यांनी हजेरी लावली होती.
यावेळी भाषणात शरद पवारांनी जुन्या काळातले क्रिकेटचे किस्से सांगितले. पाकिस्तानविरुद्ध सामना गमावल्यानंतर भारतीय खेळाडूंबद्दल उमटलेल्या प्रतिक्रियांचाही पवारांनी समाचार घेतला. “आपल्या देशातील क्रिकेटप्रेमींना मला एक विनंती करायची आहे. परवा आपण पाकिस्तानसोबत एक सामना हरलो. हा सामना गमावल्यानंतर विशेषकरुन काही खेळाडूंविरुद्ध आलेल्या प्रतिक्रिया या अशोभनीय होत्या. खेळ म्हणला की हारजीत आलीच”, अशा शब्दांमध्ये पवारांनी मोहम्मद शमी आणि भारतीय संघाला ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं.
माझी एकच विनंती आहे की खेळाडूंना नाउमेद करु नका. पाकिस्तानविरुद्ध सामना गमावल्यानंतर आपली पुढची मॅच न्यूझीलंडविरुद्ध आहे. मला खात्री आहे की ही मॅच आपणच जिंकू आणि यानंतर तुम्हाला चित्र बदललेलं दिसेल असा विश्वासही शरद पवारांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
BLOG : याला कारण एकच…आम्हाला पराभव सहन होत नाही !
पाकिस्तानविरुद्ध सामन्यात भारतीय संघाला मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. १० विकेट राखून पाकिस्तानने बाजी मारत भारताला धक्का दिला. वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासातला भारताविरुद्ध पाकिस्तानचा हा पहिलाच विजय होता. या सामन्यात सुमार कामगिरी करणाऱ्या भारतीय गोलंदाजांवर सोशल मीडियावर टीका झाली. मोहम्मद शमीला काही नेटकऱ्यांनी पाकिस्तानकडूनच खेळायचं होतं तर निळ्या रंगाची जर्सी घालून का आलास असा प्रश्न विचारला होता. यानंतर सर्व माजी खेळाडूंसह अनेक क्रिकेटप्रेमींनी शमीला आपला भक्कम पाठींबा दिला होता.
ADVERTISEMENT
