अकोला : रानात चरायला गेलेल्या म्हशीला शोधायला गेलेल्या मायलेकींचा नदीत बुडून मृत्यू

बार्शीटाकळी तालुक्यातील दगडपारवा धरणाच्या पायथ्याशी घडला धक्कादायक प्रकार
अकोला : रानात चरायला गेलेल्या म्हशीला शोधायला गेलेल्या मायलेकींचा नदीत बुडून मृत्यू
म्हैस परतली परंतू घोगरे मायलेकींचा जीव गेल्यामुळे परिसरात शोककळा

अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. नदीपात्र पार करुन जात असताना दोन अल्पवयीन मुलींसह आईचा बुडून मृत्यू झाला आहे.

सरिता घोगरे (वय ४२) असं मृत महिलेचं नाव असून तिच्या वैशाली (वय १४) आणि अंजली (वय १६) या दोन मुलींचाही या घटनेत मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल संध्याकाळी रानात चरायला सोडलेली म्हैस परत न आल्यामुळे मायलेकी तिला शोधण्यासाठी धरणाच्या परिसरात गेल्या होत्या.

यावेळी एका मुलीचा पाय घसरुन ती नदीपात्रात पडली असता तिला वाचवायला गेलेल्या दुसऱ्या मुलीचा आणि आईचाही तोल गेल्यामुळे त्या वाहून गेल्या. स्थानिकांना या घटनेची माहिती कळताच त्यांनी संध्याकाळपासून प्रशासनाच्या मदतीने शोधकार्य सुरु केलं. अखेरीस सोमवारी सकाळी या तिघींचे मृतदेह सापडले आहेत.

महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या म्हशीला शोधण्यासाठी या मायलेकी बाहेर पडल्या होत्या ती म्हैस कालांतराने घरी आली परंतू घोगरे परिवारावर काळाने घातलेल्या घाल्यामुळे परिसरात सध्या शोकाकुल वातावरण आहे.

Related Stories

No stories found.