Mumbai Weather: मुंबईकरांनो 26 जुलै आहे, थोडं सांभाळून.. हवामान खात्याने दिलाय 'हा' अलर्ट
Mumbai Weather Today: भारतीय हवामान खात्याने आज (26 जुलै) मुंबई, ठाणे, नवी मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट आणि पालघरसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. कोकण किनारपट्टीवर सक्रिय मान्सूनमुळे पावसाचा जोर कायम राहील.
ADVERTISEMENT

मुंबई: भारतीय हवामान खात्याच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, आज 2(6 जुलै 2025) रोजी मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये सतत जोरदार पाऊस बरसत राहील. या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे, तसा इशाराच हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. हवामान खात्याने पालघर जिल्ह्यासाठी रेड आणि मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
मुंबईसाठी आज 'हा' अलर्ट
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज सकाळपासून आकाश प्रामुख्याने ढगाळ वातावरणासह पावसाने हजेरी लावली आहे. सकाळी आणि संध्याकाळी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे, तर दुपारी काही भागांत जोरदार पाऊस पडू शकतो.
सलग बरसणाऱ्या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रवासाचे नियोजन करताना सावधगिरी बाळगावी. मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडी आणि रेल्वे सेवा प्रभावित होऊ शकतात. त्यामुळे चाकरमान्यांनी पावसाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडावे. तसेच भरतीच्या वेळी समुद्रकिनारी जाणे टाळावे.
ठाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस
ठाणे जिल्ह्यात आज सकाळी काही भागांत हलक्या सरींसह ढगाळ वातावरण आहे. दुपारी आणि संध्याकाळी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. ठाणे शहर आणि आसपासच्या भागात सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचू शकतं.
नवी मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट
नवी मुंबईत सकाळी आणि संध्याकाळी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. वाशी, नेरूळ आणि बेलापूरसारख्या भागात काही काळ जोरदार पाऊस पडू शकतो. येथे देखील हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
पालघरमध्ये तुफान पावसाला सुरूवात, हवामान खात्याकडून रेड अलर्ट
पालघर जिल्ह्यात आज पावसाचा सर्वाधिक जोर राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला असून, वसई, डहाणू, तलासरी आणि जव्हार परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पालघरमधील किनारपट्टी भागात पावसाचा जोर अधिक असेल त्यामुळे तेथील नागरिकांनी सतर्क राहावं. तसंच पर्यटकांनी आणि मच्छिमारांनी समुद्र किनारी किंवा समुद्रात न जाणारा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.
भरती-ओहोटी: मुंबई आणि पालघरमध्ये आज भरतीच्या वेळी समुद्रकिनारी जाणे टाळावे, कारण उंच लाटांचा धोका आहे.