कामगार ते खासदार… कसे होते गिरीश बापट?, शरद पवारांनी सांगितले किस्से
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी कामगार गिरीश बापट ते खासदार गिरीश बापट यांच्याबद्दलच्या अनेक आठवणी आणि किस्से सांगितले.
ADVERTISEMENT
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं दीर्घ आजाराने काही दिवसांपूर्वी निधन झालं. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे दिवंगत खासदार गिरीश बापट यांची श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते. यावेळी शरद पवारांनी कामगार गिरीश बापट ते खासदार गिरीश बापट यांच्याबद्दलच्या अनेक आठवणी आणि किस्से सांगितले.
ADVERTISEMENT
शरद पवारांनी सांगितल्या आठवणी
माझ्यामध्ये व गिरीश बापट यांच्यामध्ये वयाचे व सार्वजनिक कालखंडाचे अंतर होते. मी ज्या महाविद्यालयातून शिकलो ते बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची कधी काळी बैठक असायची. त्या बैठकीमध्ये गिरीश बापट आर्वजून उपस्थित असायचे. ते देखील याच कॉलेजचे माजी विद्यार्थी होते. पुण्यामध्ये टेल्को महत्त्वाची कंपनी होती. त्यामध्ये गिरीश बापट काम करायचे. अतिशय उत्तम चालणारी कंपनी परंतु एक काळ असा आला की, त्या ठिकाणी संप झाला.
संपाच्या नेतृत्वाने टोक्याला जाण्याचे काम केले. चाळीस दिवसांपेक्षा अधिक काळ टेल्कोमध्ये संप होता. वाटाघाटी केल्या. पण नेतृत्व चमत्कारिक होते. त्यामुळे मार्ग काही निघेना. त्या लोकांनी शनिवार वाड्याला जाऊन निर्दशने करण्याचा निर्णय घेतला आणि रात्री मुक्कामाला राहण्याची भूमिका घेतली. पोलिस दल एकत्र केले रातोरात अटक केली. काहींना सावंतवाडीला पाठवले तर काहींना रत्नागिरीला पाठवले, काहींना आणखी काही ठिकाणी पाठवलं. कामगारांच्या लक्षात आले की चुकीच्या नेतृत्वाखाली आपण वागलो की त्याचे दुष्परिणाम होतात व योग्य सल्ला आणि चौकटीच्या बाहेर कधी कामगार चळवळीत जायचं नाही अशी भूमिका मानणारे थोडे कामगारामधील सहकारी होते त्यामध्ये गिरीश बापट होते.
हे वाचलं का?
शरद पवार-गिरीश बापट मैत्री
पुणे शहरात माझा संपर्क कमी असायचा. ग्रामीण भागात संपर्क अधिक असायचा. महानगरपालिकेत कस काम चाललं आहे याची मी माहिती घेत असे. ज्या महानगरपालिकेत एक तरुण वर्ग एकजूट झाला. नागरी प्रश्नांसाठी पक्ष कुठलाही असो पुण्याच्या भवितव्यासाठी आपण एकत्रित भूमिका घेतली पाहिजे अशा प्रकारचे चित्र त्यांनी या ठिकाणी मांडले. त्यामध्ये गिरीश बापट होते, अंकुश काकडे होते आणि बाकीचे त्यांचे सहकारी होते. राजकारणाच्या पलीकडे त्यांनी आपली मैत्री जपली.
पक्षाच्या ध्येयधोरणांशी त्यांनी कधी तडजोड केली नाही. महानगरपालिकेत काही वर्षे काढल्यानंतर गिरीश बापट विधानसभेत आले. नंतर मंत्री झाले. केंद्र पातळीवर ते खाते माझ्याकडे होते. ते काम स्वीकारल्यानंतर काही प्रश्नांसंबंधी मला मार्गदर्शन करा, अशी विचारणा त्यांनी मला केली. त्यामध्ये पक्ष कुठला, सरकार कोणते याचा विचार न करता सर्वसामान्य लोकांसाठी प्रशासनाची जी जबाबदारी आपल्यावर आहे त्या जबाबदारीशी व सामान्य माणसाशी बांधिलकी ही आपण जतन केली पाहिजे. त्यासाठी ज्यांच्याकडून काही माहिती मिळेल, उपयुक्तता असेल त्यांच्याशी आपण सुसंवाद ठेवायचा. कधी कमीपणा ठेवता कामा नये हे सूत्र त्यांनी त्या काळात घेतलेले मी पाहिले आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> उद्धव ठाकरेंना उच्च न्यायालयाचा दणका; मविआ सरकारचा निर्णय रद्द, शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय ठरवला योग्य
नंतरच्या काळात गिरीश बापट संसदेत आले. पब्लिक अकाऊंट्स कमिटीचे चेअरमन पद त्यांच्याकडे होते. अत्यंत महत्त्वाची कमिटी होती. याचा अर्थ केंद्र सरकारच्या कोणत्याही खात्याला, कोणत्याही विषयाचे समन्स करण्याचा अधिकार या कमिटीला असतो. ते काम त्यांच्याकडे होते. त्यामध्ये त्यांनी बारकाईने लक्ष घातले होते. कधी कधी आम्हा लोकांशी ते चर्चा सुद्धा करत असतं. या कमिटीचे काम करत असताना त्यांनी संसदेच्या कर्मचाऱ्यांशी चांगले संबंध ठेवले.
ADVERTISEMENT
माझ्याकडे त्यांचे येणं असे. त्यावेळी पुण्यातील, पुणे जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील काही प्रश्नांसंबंधी चर्चा करत आणि त्यातून कसा मार्ग काढायचा याबाबत विचार व्यक्त करत असतं. पुण्याच्या प्रश्नासंबंधी त्यांना अतीव अशा प्रकारची आस्था होती. माझ्या राजकीय कारकीर्दीला ५६ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामध्ये अनेक व्यक्तींचा सहवास लाभला. त्यामध्ये गिरीश बापट यांचे वेगळे स्थान व कर्तृत्व होते. विनम्रता, बडेजावपणा नाही, कामाच्या संबंधी, कर्तृत्वाच्या संबंधी, संसदीय जबाबदारी पार पाडण्याच्या संबंधी आपण कुठे कमी आहोत असे चित्र कधी गिरीश बापट यांनी भासू दिले नाही.
आजारपणात बापटांना पवारांनी काय सांगितलं?
पुण्याच्या महानगरपालिकेत सुसंस्कृत भूमिका घेण्याची तयारी काही भिन्न राजकीय विचाराच्या सहकाऱ्यांनी घेतली व ती जतन केली. पुण्यामध्ये अशा प्रकारचे चित्र निर्माण झाले तर ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरायला काही वेळ होणार नाही. ते काम करण्यासंबंधीची कामगिरी गिरीश बापट यांनी अखंडपणाने केली. आज ते आपल्यातून गेले. मी त्यांना आजारी असताना भेटायला गेलो तेव्हा ते मला आत्मविश्वासाने सांगत होते की मी यावर मात करणार. मी ही त्यांना सांगितले की तुम्हाला जो त्रास आहे तो मलाही आहे.
2004 मध्ये मला डॉक्टरांनी सांगितले होते की तुमच्याकडे साधरणतः सहा महिने आहेत. तुम्हाला काही गोष्टी करून ठेवायच्या असतील तर करून ठेवा. तेव्हा मी त्या डॉक्टरांना वय विचारले ते डॉक्टर तरुण होते. त्यांना मी म्हटले की तुम्हाला मी पोसायला येईल तुम्ही काही चिंता करू नका. 2004 नंतर आज 2023 आले मी आहे अजून जागेवर. या प्रकारचा विश्वास मी मु्द्दाम गिरीश बापट यांना दिला होता. भक्कमपणाने तोंड देऊन मी यातून गेलो आहे. त्यांनी मला सांगितले की मीही याच्याशी संघर्ष करणार भक्कमपणे तोंड देणार. दुर्दैवाने त्यांना या संघर्षात यश आले नाही. आज आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एकत्रित आलो. त्यांनी दाखवलेले कर्तृत्व, त्यांनी घेतलेली भूमिका, त्यांनी दाखवलेले पुणे आणि महाराष्ट्राच्या हितासंबंधी सातत्याने घेतलेला दृष्टीकोन हा आपल्या सर्वांच्या लक्षात राहील. त्यांच्याबद्दल सद्भावना व्यक्त करतो.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT