Crime : अखेर पुण्यातील ‘कुख्यात’ गुन्हेगाराच्या हत्येचं गूढ उकललं
-निलेश पाटील, नवी मुंबई तळेगाव-दाभाडे येथील कुख्यात गुन्हेगार संजय कारले याच्या हत्येचं गुढ अखेर उकललं आहे. जवळपास ४५ दिवसांनंतर या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. मोहसीन मुलाणी आणि अंकित कांबळे अशी आरोपींची नावं आहेत. पैशांच्या देवाण-घेवाण आणि सोन्याच्या व्यवहारांतून ही हत्या झाल्याचं नवी मुंबईचे गुन्हे शाखा उपायुक्त अमित काळे यांनी […]
ADVERTISEMENT

-निलेश पाटील, नवी मुंबई
तळेगाव-दाभाडे येथील कुख्यात गुन्हेगार संजय कारले याच्या हत्येचं गुढ अखेर उकललं आहे. जवळपास ४५ दिवसांनंतर या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. मोहसीन मुलाणी आणि अंकित कांबळे अशी आरोपींची नावं आहेत. पैशांच्या देवाण-घेवाण आणि सोन्याच्या व्यवहारांतून ही हत्या झाल्याचं नवी मुंबईचे गुन्हे शाखा उपायुक्त अमित काळे यांनी सांगितलं. (Sanjay Karle murder case)
अमित काळे यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, १८ नोव्हेंबर २०२२ रोजी मुंबई-गोवा हायवेवर कर्नाळा अभयारण्याजवळ पनवेल तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका बंद ऑडी कारमध्ये मावळमधील तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील आरोपी संजय मारुती कारले ( रा. अनिकेत अपार्टमेंट, यशवंत नगर, तळेगाव दाभाडे) याचा मृतदेह आढळून आला होता.
याबाबत तपास सुरु केल्यानंतर ही पुण्यावरुन गाडी आल्याचं स्पष्ट झालं. मयत आणि संशयित आरोपी यांच्यात पैशांवरुन वाद झाले होते. कमी किमतीमध्ये जास्त सोनं देतो असं सांगून साडे पाच लाख रुपये संशयित आरोपींकडून कारले याने घेतले होते. त्यानंतर भेटायला आल्यावर आणखी दोन लाख रुपयांची मागणी केली. पण कोणतही सोनं न दाखवता आणखी कसले पैसे मागतोस, यावरुन यांच्यामध्ये वाद झाला.
संजय कारलेचा फसवणूक करण्याचा उद्देश लक्षात येताच संशयित आरोपींनी स्वतःजवळील पिस्तुलमधून पाच गोळ्या झाडून ही हत्या केल्याचं उघड झालं होतं. संशयित आरोपीही सरईत गुन्हेगार असल्याचं यावेळी काळे यांनी सांगितलं. दरम्यान, खून करुन दोन्हीही संशयित आरोपी पनवेलवरुन सातारा, तिथून बंगळुरु, जोधपूर, कोलकता आणि तिकडून नेपाळला पळून गेले होते.
मात्र आज संशयित आरोपी मोहसीन मुलाणी आणि अंकित कांबळे पुण्यात येताच पोलिसांनी या दोघांच्या मुसक्या आवळल्या. मृत संजय कारले आणि दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचं यावेळी अमित काळे यांनी सांगितलं. संजय कारलेवर तळेगाव – दाभाडे पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 656/2018 भादवि कलम 420, 354, 506 व मोका अन्वय गुन्हा दाखल आहे.या दाखल गुन्ह्यात नमूद आरोपी हा सहा महिन्यांपूर्वी वैद्यकीय रजेवर मुक्त झाला होता आणि त्यानंतर त्याला कायमस्वरूपी जामीन मिळाला होता.