Lok Sabha 2024 : विशाल पाटील लिफाफा चिन्हावर लढणार!
Maharashtra Lok Sabha Election Live Updates : लोकसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्रात प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे... निवडणुकीच्या बातम्यांसह महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे अपडेट्स वाचा...
ADVERTISEMENT
Lok Sabha Election Maharashtra Live News : उन्हाच्या वाढत्या पाऱ्याबरोबरच महाराष्ट्रातील राजकीय वातावरणही प्रचंड तापलं आहे. पंतप्रधान मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधींपासून अनेक नेते राज्यभर प्रचारसभा घेताना दिसत आहेत. त्यामुळे राजकीय रणधुमाळी जोरात सुरू आहे.
ADVERTISEMENT
आरोप-प्रत्यारोप आणि दावे-प्रतिदावे करत विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न करताना दिसत आहेत. दुसरीकडे उमदेवारही रात्रीचा दिवस करत प्रचारात दंग झाले आहेत.
लोकसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्रात दररोज घडामोडी घडत आहेत. नवीन राजकीय समीकरणे जुळताना दिसत आहेत.... त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर मुद्दे आणि घटनांबद्दलच्या बातम्या जाणून घेण्यासाठी वाचत रहा लाईव्ह अपडेट्स...
ADVERTISEMENT
- 04:18 PM • 22 Apr 2024
विशाल पाटलांना लिफाफा चिन्ह!
विशाल पाटलांनी अपक्ष अर्ज मागे घेतला नाही. त्यांची उमेदवारी कायम राहणार आहे. तर त्यांना लिफाफा हे चिन्ह मिळालं आहे.
- 03:10 PM • 22 Apr 2024
विशाल पाटील सांगलीतून अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम!
विशाल पाटील सांगलीतून अपक्ष निवडणूक लढणार आहेत. त्यांनी अर्ज माघारी घेतलेला नाही. यामुळे आता सांगलीत मविआची डोकेदुखी कायम असल्याचं दिसत आहे. - 02:08 PM • 22 Apr 2024
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध!
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे. जाहीरनाम्यात सगळ्यांना समान लेखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
- 01:37 PM • 22 Apr 2024
Lok Sabha Live News : खरगेंनी मोदींना मागितली भेटीसाठी वेळ; कारण...
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे. पंतप्रधान मोदींना खरगे काँग्रेसच्या जाहीरनाम्याची प्रत देणार आहेत. त्याचबरोबर काँग्रेसच्या जाहीरनाम्याबद्दल मतदारांची दिशाभूल करू नका, अशी विनंत मल्लिकार्जून खरगे हे मोदींना करणार आहेत.
पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले?
भाषणात मोदी म्हणाले की, "यावेळचा काँग्रेसचा जाहीरनामा बघा. काँग्रेसने जाहीरनाम्यात जे सांगितलं आहे, ते चिंताजनक आहे. गंभीर आहे. आणि हा माओवाद आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांनी म्हटलं आहे की, जर काँग्रेसचे सरकार आले, तर प्रत्येकांच्या संपत्तीचे सर्वेक्षण केले जाईल. आपल्या बहिणींकडे किती सोने आहे, ते तपासलं जाईल. त्याचा हिशोब केला जाईल."
"आदिवासी कुटुंबाकडे चांदी असते, त्याचा हिशोब केला जाईल. सरकारी नोकरदारांकडे किती संपत्ती आहे, त्याची चौकशी केली जाईल. इतकंच नाही, पुढे काय म्हटलं आहे की, बहिणींकडचे जे सोने आहे आणि इतर जी संपत्ती, ती सगळ्यांना समान पद्धतीने वाटली जाईल."
"माता भगिनींच्या आयुष्यात सोने दाखवण्यासाठी नसते. ते स्वाभिमानाशी जोडलेले आहे. तिचे मंगळसूत्र फक्त सोन्याच्या किंमतीचा मुद्दा नाहीये. तिच्या जीवनाच्या स्वप्नाशी जोडलेला मुद्दा आहे. तुम्ही ते हिसकावून घेणार असल्याचे सांगत आहात, जाहीरनाम्यात."
"सोने घेऊन टाकू आणि सगळ्यांना वाटून टाकू. आणि पूर्वी जेव्हा त्यांचे सरकार होते, तेव्हा त्यांनी म्हटले होते की, देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे. याचा अर्थ ही संपत्ती एकत्रित करून कुणाला वाटणार? ज्यांना जास्त मुलं आहेत, त्यांना वाटणार. घुसखोरांना वाटणार. तुमच्या मेहनतीचा पैसा घुसखोरांना दिला जाणार, हे तुम्हाला हे मान्य आहे का?", असा सवाल मोदींनी उपस्थितांना केला होता.
- 01:13 PM • 22 Apr 2024
आम्हाला भारत सरकार हवं मोदी सरकार नको- उद्धव ठाकरे
'थापाडे, खोटारड्यांची लंका जाळायला आलोय. शिवसैनिक गद्दारांना साथ देणार नाहीत. आम्ही छातीवर वार झेलणारे आहोत. आणीबाणीनंतर देशात प्रचंड लाट उसळी आहे. मोदी आता तर गल्लीबोळात प्रचार करतायेत. भाजपचा सावतंत्र्य लढ्याशी काडीमात्र संबंध नव्हता. मुनगंटीवारांच्या मानगुटीवर बसा आणि देशाची माफी मागा. शेतकरी आत्महत्या करत आहेत त्यावरही मोदींनी बोलावं. 10 वर्षात शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं का? राज्यात उद्योग आलेच नाहीत सर्व उद्योग गुजरातमध्ये गेले. आम्हाला भारत सरकार हवं मोदी सरकार नको.' अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी अमरावतीतील सभेत निशाणा साधला.
- 11:48 AM • 22 Apr 2024
'तुरुंगात जायला लागू नये म्हणून शिंदे रडले', संजय राऊतांचा गौप्यस्फोट!
'एकनाथ शिंदे यांना तुरुंगात टाकण्याची भाजपची योजना होती. जेलमध्ये जाण्याची वेळ येऊ नये म्हणून शिंदे कुठे-कुठे जाऊन रडले,' त्यांनाच विचारा असा मोठा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आज प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.
- 11:33 AM • 22 Apr 2024
कुणाला किती मुलं हा प्रचाराचा मुद्दा आहे का? संजय राऊतांचा मोदींवर निशाणा
प्रचार सभेमध्ये बोलताना पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं होतं की, काँग्रेसने सर्व पैसा जास्त मुलं असणाऱ्यांना दिला. यावरुन संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधलाय. कुणाला किती मुलं हा प्रचाराचा मुद्दा आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे.
- 09:48 AM • 22 Apr 2024
Lok Sabha live News : महायुतीत ठाणे, पालघरचा पेच; काँग्रेसकडून उमेदवाराचा शोध
लोकसभा निवडणुकीचे दुसऱ्या टप्प्यातील मतदान काही दिवसांवर येऊन ठेपलेले असताना महायुतीतील जागा वाटपाचा पेच अजूनही सुटलेला नाही. औरंगाबाद लोकसभा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा या मतदारसंघाचा तिढा सुटला असला, तरी महायुतीत ठाणे, पालघर, नाशिकचा पेच सुटलेला नाही.
दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेसला मुंबईत दोन जागा मिळाल्या आहेत. सध्या काँग्रेसकडून उमेदवाराचा शोध सुरू आहे. उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई या दोन जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. या मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपची स्थिती सारखी असून, दोन्ही पक्षांना उमेदवार निश्चित करता आलेला नाही.
- 09:41 AM • 22 Apr 2024
Sangli Lok Sabha Live : विशाल पाटलांची थोरात करणार मनधरणी?
Maharashtra Lok Sabha live : सांगलीमध्ये महाविकास आघाडीत बंड झाले आहे. काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी एक अपक्ष आणि एक काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेला आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून, काँग्रेसने विशाल पाटील यांना अर्ज मागे घेण्यासंदर्भात इशारा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विशाल पाटील यांनी माघार घ्यावी, अन्यथा कारवाई करणार, असा इशारा काँग्रेसकडून देण्यात आल्याचे समजते. यासंदर्भात काँग्रेसचे नाना पटोले असे म्हणाले आहेत की, "विशाल पाटील यांना समजावण्याचा प्रयत्न सुरू आहे. मविआ म्हणून सर्व गोष्टी पुढे व्हाव्यात, असा आमचा प्रयत्न आहे. त्यात आम्हाला नक्कीच यश मिळेल."
दुसरीकडे महत्त्वाची घडामोड म्हणजे विशाल पाटील यांची काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याकडून मनधरणी केली जाणार आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे विशाल पाटील यांनी माघार घ्यावी, हे समजावण्यासाठी सांगलीला जाणार असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे मविआतील तिन्ही पक्षाचे लक्ष सध्या सांगलीकडे लागले आहे.
महाविकास आघाडीत सांगली या मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला होता. पण, जागावाटपाआधीच ठाकरेंनी उमदेवार जाहीर करून टाकला. तर विशाल पाटील हे माघार न घेण्याच्या मनस्थितीत आहेत. उमेदवारी अर्ज भरतानाच त्यांनी संकेत दिले होते. त्यामुळे सांगलीत बंड शमणार की नाही, हे आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT