भाजपची तक्रार, CM शिंदेंना धक्का! BMC ची कंत्राटदाराला नोटीस, प्रकरण काय?
मुंबई महापालिका प्रशासनाने रस्त्याचं कंत्राट दिलेल्या कंत्राटदाराला नोटीस पाठवली आहे. भाजपच्या तक्रारीनंतर काम काढून घेण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. हा कंत्राटदार शिंदे यांच्या जवळचा असल्याचे म्हटले जात आहे.
ADVERTISEMENT

Eknath Shinde-BJP, Mumbai Politics : भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी जरी सत्तेत एकत्र असले तरी विविध मुद्यांवरुन एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न तिनही पक्षांकडून केला जात आहे. त्यातच आता भाजपच्या लोकप्रतिनिधींमुळे शिंदेंच्या मर्जीतल्या कंत्राटदाराला बीएमसीने नोटीस पाठवल्याने भाजप शिंदेंवर कुरघोडी करतंय का असा प्रश्न निर्माण झाला आहे? त्यामुळे बीएमसीमध्ये नेमकं घडतंय काय आणि एका नोटीसीमुळे भाजप आणि शिंदेंच्या राजकारणावर कसा फरक पडेल हेच समजावून घेऊयात…
मुंबईला खड्डेमुक्त करण्याचा निर्धार करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. दोन वर्षांमध्ये मुंबईला खड्डेमुक्त करु असं ते म्हणाले होते. यासाठी नोव्हेंबर 2022 मध्ये निविदा मागवण्यात आल्या होत्या. शहर भागासाठी एक, पूर्व उपनगरांसाठी एक तर पश्चिम उपनगरासाठी तीन अशा एकूण पाच निविदा मागवण्यात आल्या होत्या. एकूण 6 हजार कोटींच्या कामांसाठी या निविदा मागवण्यात आल्या होत्या. यासाठी नामांकित कंत्राटदारांना काम देण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते. असं असलं तरी प्रत्यक्षात कामं सुरु झाली नव्हती.
शिंदेंच्या जवळच्या कंत्राटदाराला नोटीस का?
जानेवारीमध्ये रस्त्यांच्या कामांचे कार्यादेश निघाल्यानंतरही शहर विभागातील कामे अद्याप सुरु न झाल्याने बीएमसीने कंत्राटदाराला अंतिम नोटीस बजावली आहे. सर्व डिपॉझिट जप्त करुन काम काढून घेण्याचा इशारा मुंबई महापालिकेने दिला आहे. हा कंत्राटदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचा असून भाजपच्या नगरसेवकांनी वारंवार केलेल्या तक्रारीमुळे ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती आहे. याबाबतची बातमी दैनिक लोकसत्ता यांनी दिली आहे.
हेही वाचा >> ‘2 महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश द्यावे लागतील..’, कोर्टाने नार्वेकरांना झापलं!
या आधी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सिमेंटच्या रस्त्यांवरुन रान उठवलं होतं. सिमेंटच्या रस्त्यांच्या कंत्राटामध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंना केला होता. त्याचबरोबर ही कामं पावसाळ्याआधी सुरु होणार नाहीत असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले होते.










