पेढ्यातला गोडवा, कोकणची माती आणि बाळासाहेबांची आठवण; राणे-ठाकरेंमध्ये रंगला शाब्दिक शिमगा
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झालं. आजच्या कार्यक्रमानिमीत्ताने नारायण राणे आणि उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर आल्यामुळे ते नेमकं काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष होतं. अपेक्षेप्रमाणे दोन्ही नेत्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत एकमेकांना चिमटा काढायची संधी सोडली नाही. त्यामुळे प्रदीर्घ कालावधीनंतर कोकणात विमानतळ उद्घाटनाच्या […]
ADVERTISEMENT

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झालं. आजच्या कार्यक्रमानिमीत्ताने नारायण राणे आणि उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर आल्यामुळे ते नेमकं काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष होतं. अपेक्षेप्रमाणे दोन्ही नेत्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत एकमेकांना चिमटा काढायची संधी सोडली नाही.
त्यामुळे प्रदीर्घ कालावधीनंतर कोकणात विमानतळ उद्घाटनाच्या निमित्ताने राणे आणि ठाकरेंमधल्या शाब्दिक शिमग्याची चर्चा सर्वत्र रंगते आहे.
नारायण राणेंनी आपल्या भाषणात बोलत असताना, विमानतळावरुन झालेल्या आंदोलनाची आठवण करुन देत सेनेला टोला लगावला. “मी उद्धव ठाकरेंना एक विनंती करू इच्छितो त्यांनी हे फोटो बघावे.. आम्हाला विमानतळ नको हे म्हणणारे आंदोलक होते. 2009 मध्ये हे आंदोलन कुणी केलं? तुम्हाला माहित आहे. महिन्याला कोण जाऊन कोण काम अडवतं? मी नावं घेतली तर राजकारण होईल. रस्त्याच्या विकासकामात कोण अडसर ठरवत होते? विचारा जरा जाऊन तुम्हाला माहिती आहे. आज ते लोक या मंचावर बसले आहेत.”
चिपी विमानतळाला अद्याप न मिळालेल्या सोयी-सुविधांवरुनही राणेंनी तक्रारीचा पाढा वाचून दाखवत विमानातून खाली उतरलं की लोकांनी रस्त्यावरचे खड्डे पहायचे का असा प्रश्न विचारला. तसेच बाळासाहेबांना खोटं बोलणारी माणसं आवडायची नाही असं म्हणत त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंनाही आपल्या टीकेचं लक्ष्य केलं. तर कार्यक्रमाच्या आधी पेढा देणाऱ्या खासदार विनायक राऊतांनाही नारायण राणेंना या पेढ्याचा गोड गुणधर्म आपल्यात अवलंबवा असं सुनावलं.
विमानतळावर उतरल्यावर लोकांनी रस्त्यावरचे खड्डे बघायचे का?; नारायण राणेंनी ठाकरे सरकारला डिवचलं
दरम्यान उद्धव ठाकरेंनीही आपल्या छोटेखानी भाषणात आपल्यावरील आरोपांचा समाचार घेतला. बाळासाहेबांना खोटं बोलणारी माणसं आवडत नाही हे सत्यच आहे. म्हणूनच त्यांनी खोटं बोलणाऱ्यांना बाहेर केलं असं सांगितलं. विकासकामांमध्ये मी कधीच राजकीय जोडे आणत नाही. या विमानतळाच्या निर्मितीसाठी नारायणराव तुम्ही जे योगदान दिलंत ते मी कधीच नाकारणार नाही, त्यासाठी मी आभारी आहे. तुमच्या मेडीकल कॉलेजसाठी मी तुम्हाला फोन केला तिकडेही मी पक्षीय मतभेद मध्ये आणले नाही. कोकणातही जनता ही कोणाच्याही भीतीखाली राहत नाही, ती मर्द आहे. म्हणून त्यांनी निवडून दिलेले खासदार विनायक राऊत इथे चांगल्या पद्धतीने काम करत आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी शिवसेनेवरील टीकेचा समाचार घेतला.
‘सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवरायांनी बांधलाय मान्य करायला हवं, काही लोक म्हणतील मीच बांधला’
या ठिकाणी विकास करण्याचा संकल्प आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. निळंशार पाणी, कोकणची संस्कृती, अथांग सागर किनारा या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी इथे हेलिकॉप्टर फेरीही सुरू गेली पाहिजे असाही मानस उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवला. कोकणच्या विकासाच्या गरूडझेपेला आज सुरूवात झाली आहे. हे सगळं सुंदर सुरू आहे, नजर लागू नये म्हणून तीट लावतात ना तशीही काही लोकं व्यासपीठावर बसली आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी राणेंना टोला लगावला.
आजचा क्षण हा मला वाटतं आदळआपट करण्याचा नाही तर आनंद व्यक्त करण्याचा आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांचं मी खास अभिनंदन करतो आहे ते इतक्या लांब राहूनही मराठी मातीचा संस्कार विसरले नाहीत. मातीत बाभळही उगवते आणि आंब्याची झाडंही उगवतात. यात मातीचा दोष नाही, माती म्हणणार मी काय करू? कोकण आणि शिवसेनेचं नातं काय आहे ते सगळ्यांना माहित आहे. कोकणासमोर शिवसेना कायमच नतमस्तक झाली आहे असं म्हणत नारायण राणेंच्या आरोपांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं.