डोंबिवलीत मनसेला खिंडार, सेना-भाजपाकडून मनसे नेत्यांची पळवापळवी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कल्याण डोंबिवली निवडणुकांचे वेध लागताच डोंबिवलीमध्य़े फोडाफोडीच्या राजकारणाला जोरदार सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षातल्या दमदार नेत्यांना गळाला लावण्याचे प्रकार सुरु झाले असून या घोडेबाजारात मनसेला मोठं खिंडार पडलं असून मनसेचा एक नेता शिवसेनेने तर दुसरा नेता भाजपने पळवला आहे.

मनसे पक्षस्थापनेपासून राज ठाकरेंसोबत असणारे राजेश कदम आता शिवसेनेत तर महापालिकेत विरोधी पक्षनेते असलेले मंदार हळबे भाजपमध्ये दाखल झाल्याने मनसेला चांगलाच धक्का बसला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राजेश कदम कल्याण डोंबिंवली भागात मनसेचा मुख्य चेहरा होते. मनसेने रेल्वे भरतीच्या वेळी जे आंदोलन केले होते त्यात राजेश कदम यांची मुख्य भूमिका होती आणि या प्रकरणाता त्यांना जेलची हवा देखील खावी लागली होती. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचा चुरशीच्या निवडणुकीत जो विजय झाला होता त्यात राजेश कदम यांचा मोलाचा वाटा होता. याच राजेश कदम यांचा शिवसेना पक्षप्रवेश सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर पार पडला.

मंदार हळबे हे मनसेच्या डोंबिवलीचा प्रमुख चेहरा होते. डोंबिवलीच्या महानगरपालिकेत त्यांनी विरोधी पक्ष नेता म्हणून काम केले होते. 2019 विधानसभा निवडणुकीत त्यांनी आमदारकीची निवडणुक लढवली होती आणि भाजपाच्या रवींद्र चव्हाण यांच्याकडून मंदार हळबेंना निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. आता याच हळबे यांचा मुंबईत चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत भाजप पक्षप्रवेश झाला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

यानंतर आता मनसेनं मनोज घरात यांची शहराध्यक्षपदी निवड जाहीर केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मनोज घरात यांना नियुक्तीचं पत्र देण्यात आलं. विशेष म्हणजे राजेश कदम हे शिवसेनेत गेल्यानंतर ज्यावेळी मनसेचे कार्यकर्ते आमदार राजू पाटील यांना भेटण्यासाठी जमले होते, त्यावेळी मंदार हळबे हेदेखील तिथे आले होते. मात्र उद्या आपण भाजपात जाणार असल्याची पुसटशीही कल्पना त्यांनी कुणाला येऊ दिली नाही.

आपल्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये शिवसेनेला कडवी टक्कर देणाऱ्या मनसेची अवस्था सध्या बिकट आहे. त्यातच महानगरपालिका निवडणुका तोंडावर आल्या असताना मनसेची उरली-सुरली ताकदही संपवून टाकण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. सत्ताधाऱ्यांना आव्हान देऊ शकण्याची धमक असलेले दोन खंदे शिलेदारच गळाल्यामुळे मनसेसमोर मोठं आव्हान तयार झालं आहे.

भाजप आणि मनसे यांच्यात युती होणार अशी चर्चा गेले कित्येक दिवस रंगली आहे. मध्यंतरी प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे भाजप मनसे युतीच्या आशा पल्लवित झाल्या होत्या पण आता ऐन निवडणुकीच्या आधी बसलेल्या या धक्क्यांमुळे मनसे बॅकफूटवर गेली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT