बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंचं भाषण, भाजपवर तुफान टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन भाषण करत शिवसैनिकांमध्ये जोश भरण्याचा प्रयत्न केला. मात्र आपल्या या भाषणात त्यांनी भाजपवर तुफान टीका केली. पाहा उद्धव ठाकरे यांचं नेमकं भाषण काय होतं.

ADVERTISEMENT

पाहा उद्धव ठाकरे यांचं भाषण जसंच्या तसं

‘आज मी आपल्यासमोर खूप दिवसांनी आलो आहे. जे विरोधक माझ्या तब्येतीची काळजी घेत आहे त्या काळजीवाहू विरोधकांना मी भगव्याचं तेज दाखवणार आहे. जसं काळजीवाहू सरकार असतं तसं हे काळजीवाहू विरोधक आहेत. ते स्वत:च स्वत:च्या काळजीने त्यांचा अंत होणार आहे. त्यामुळे त्यांची चिंता करण्याची गरज नाही.

हे वाचलं का?

हे काळजीवाहू विरोधक कोणे ऐकेकाळी आपले मित्र होते. हे नाही म्हटलं तरी आपलं दु:ख आहे. त्याचं कारण आपण त्यांना पोसलं. हो पोसलंच.. मी मागे एकदा बोललो होतो.. की, 25 वर्ष आपली युतीत सडली. तीच भूमिका आणि तेच माझं मत आजही कायम आहे. मी त्या मतावर ठाम आहे.

आपण यांच्यापासून का दुरावलो की, त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी आपल्याला एक दिशा दाखवली की.. हिंदुत्वासाठी आपल्याला सत्ता पाहिजे होती.

ADVERTISEMENT

आजचं यांचं जे पोकळ हिंदुत्व आहे ते सत्तेसाठी अंगिकारलेलं एक ढोंग आहे. होय तसेच आहे. जसं वाघाचं कातडं पांघरलेलं गाढव म्हणा शेळी म्हणा.. तसं यांनी हिंदुत्वाचं कातडं पांघरलं आहे. हे आता आपल्या लक्षात आलं आहे.

ADVERTISEMENT

25 वर्ष यांना पोसल्यानंतर लक्षात आलं. अनेकदा आपल्यावर टीका होते की, आपण हिंदुत्व सोडलं. पण आपण हिंदुत्व सोडलेलं नाही. मी पुन्हा एकदा सांगतो. हिंदुत्व आम्ही सोडू शकत नाही आणि सोडणारही नाही. आम्ही भाजपला सोडलं हिंदुत्व सोडलेलं नाही.

भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. म्हणजे त्यांनी वाटेल ते करावं. आता सुद्धा आपल्यावर टीका करताना म्हणतात की, तुम्ही आमच्यासोबत युतीत लढलात. हा लोकशाहीचा अपमान आहे. ही लोकशाही नव्हे.

मध्यंतरी त्यांचे अमित शाह पुण्यात येऊन गेले आणि आपल्यावर टीका करुन गेले. हिंमत असेल तर एकट्याने लढा वैगरे.. मी दसऱ्याच्या मेळाव्यात ते देखील आव्हान स्वीकारलं आहे.

आम्ही एकट्याने लढू, वीरासारखे लढू.. पण राजकारणात जसे भिडता तसे थेट भिडा.. पण आव्हान द्यायचं आणि मग ईडीची पिडा लावायची. इन्कम टॅक्सची पिडा लावायची. हे शौर्य नाहीए.

आपण आता पुढे चाललो आहोत. पण भाजप आपल्याशी कसे वागले तर वापरायचं आणि फेकून द्यायचं. त्यांची ती नितीच आहे. ते दिवस आठवा… जेव्हा यांचे डिपॉझिट जप्त व्हायचे. तेव्हा त्यांनी प्रादेशिक पक्षांशी युती केली.

म्हणजे आपल्याशी केली, अकाली दलाशी केली. ममता बॅनर्जींशी केली होती. हे सगळे पक्ष सोबत घेऊन अटलबिहारींनी सरकार चालवलेलं. आपण एकदिलाने त्यांना साथ दिली होती.

म्हणे आम्ही लोकशाहीचा अपमान केला. आम्ही काय केलं? तुम्ही जे आम्हाला वचन दिलं होतं ते तुम्हीच मोडलं आणि आम्हाला गुलामासारखं वागवण्याचं जे स्वप्न होतं ते आम्ही मोडून टाकलं आणि केली काँग्रेसशी युती, केली राष्ट्रवादीशी युती. आम्ही जे केलं ते सूर्य उगवल्यानंतर केलं.

सूर्य उगवण्याच्या आधी शपथ घेतली नव्हती. आम्ही शिवछत्रपतींच्या साक्षीने शिवतिर्थावर शपथ घेतली. चोरूनमारुन शपथ नाही घेतली. आम्ही जे काही करतो ते उघडपणाने करतो. तुम्ही दिलेलं वचन मोडलं म्हणून आम्ही नवा घरोबा केला. पण तुम्ही तर अनेक ठिकाणी सरकार पाडून, आमदार फोडून जे काही सरकार आणलं त्याला तुम्ही लोकशाही म्हणता?

‘आम्ही सूर्य उगवण्याच्या आधी किंवा चोरूनमारून शपथ घेतली नाही’, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

सुरुवातीच्या काळात काय झालं की, जेव्हा बाबरी पाडली तेव्हा हे सगळे जण पळाले होते. पण बाबरी पाडल्यानंतर गर्व से कहो हम हिंदू है असं बाळासाहेब म्हणाले होते. त्यांच्या या भूमिकेमुळे शिवसेनेची आणि शिवसेनाप्रमुखांची लाट उसळली होती देशभर.

तेव्हा जर शिवसेनाप्रमुख आणि आपण महाराष्ट्राच्या बाहेर सीमोल्लंघन केलं असतं तर न जाणो आज शिवसेनेचा पंतप्रधान दिल्लीत दिसला असता. एवढी प्रचंड लाट होती तेव्हा. ही लाट आपण पुन्हा आणू शकलो पाहिजे. पण त्यावेळी जे घडलं ते आता घडू द्यायचं नाही.

तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी काय विचार केला की, ठीक आहे रे.. हे हिंदुत्ववादी आहेत ना, भगवा फडकवणार ना.. चला तुम्ही देश सांभाळा.. मी महाराष्ट्र सांभाळतो.. आणि तिकडेच आपलं घोडं आडलं. कारण आपण विश्वास टाकला आणि त्यांनी विश्वासघात केला. त्यांनी दिल्ली तर आपल्या मदतीने जिंकलीच पण आता आपल्या घरामध्ये घुसून आपल्याला नामशेष करायच्या मागे लागल्यानंतर मग आपण उलटं फिरून पंजा मारायचा. तो मारावाच लागला.. आणि तो आपण मारला कारण त्यांनी आपली फसगत केली. असं म्हणत संबंध भाषणात मुख्यमंत्र्यांनी भाजपवर टीका केली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT