मलिक-देशमुखांना मतदान नाकारलं, सरळ सोप्प्या भाषेत समजून घ्या सहावा उमेदवार राज्यसभेवर कसा निवडून जाणार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: महाराष्ट्रात तब्बल 24 वर्षानंतर राज्यसभेसाठी मतदान पार पडणार आहे. त्यामुळे प्रत्येक आमदाराचं मत हे अत्यंत मोलाचं ठरणार आहे. अशातच सत्र न्यायालयाने ईडीच्या ताब्यात असलेल्या अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करता येणार नसल्याचा निर्णय सुनावला आहे. कोर्टाचा हा निर्णय महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे. या निर्णयामुळे राज्यसभा निवडणुकीचं चित्र पुन्हा एकदा बदललं आहे.

ADVERTISEMENT

खरं म्हणजे राज्यसभा निवडणुकीची प्रक्रिया ही विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीसारखी सरळ सोप्पी नाहीए. ही प्रक्रिया काहीशी क्लिष्ट आहे. त्यातच या घडीला महाविकास आघाडीची दोन मतं कमी झाली आहे. अशावेळी राज्यसभेवर सहावा उमेदवार नेमका कसा निवडून जाणार हे आता आम्ही आपल्याला अगदी सरळ आणि सोप्प्या भाषेत सांगणार आहोत.

राज्यसभा निवडणुकीची प्रक्रिया सरळ आणि सोप्प्या भाषेत

हे वाचलं का?

महाराष्ट्र विधानसभेत एकूण 288 आमदार निवडून जातात. त्यामुळे राज्यसभेसाठी विधानसभेचे आमदारच मतदान करु शकतात. सध्याच्या स्थितीत विधानसभेत 287 आमदारच आहेत. कारण शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झालं असून त्यांची जागी रिक्त आहे. तर नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची मतदानाची याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. अशावेळी आता राज्यसभा निवडणुकीसाठी फक्त 285 आमदारच मतदान करणार आहेत.

निवडून येण्यासाठी कोणाला किती मतांची गरज?

ADVERTISEMENT

एखाद्या उमेदवाराला निवडून जायचं असेल तर त्याला 41 मतं आवश्यक आहेत. तर पहिले पाच उमेदवार ज्यांना 41 चा कोटा मिळालेला आहे त्यांना 41 मतं मिळाल्यानंतर ते निवडून गेले असं घोषित करण्यात येईल.

ADVERTISEMENT

तर त्यापेक्षा त्यांना जी जास्त मतं मिळतील त्यामधील दुसऱ्या क्रमांकाची मतं ही तशीच्या तशी ज्या उमेदवाराला त्यांनी दुसऱ्या पसंतीचं मत दिलं आहे त्यांच्याकडे ती मतं वळतील. अशा पद्धतीने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी मतदान होईल. त्यामुळे आता सहाव्या जागेसाठी कोणाला जास्त मतं पडतात हे सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे.

समजा, एखाद्या उमेदवाराला 42 मतं मिळाली असतील आणि कोटा 41 चा असेल तर पुढची 0.28 ही मतं देखील पुढे ट्रान्सफर होतात. त्यामुळे आपला कोटा पार करुन दुसऱ्या क्रमांकाच्या पसंतीच्या उमेदवाराला मतं कशी मिळतील याची रणनिती सर्वच पक्षांना आता आखावी लागणार आहे.

MIM च्या मतांना देखील प्रचंड महत्त्व

असं असताना जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची दोन मतं कमी होतात तेव्हा गणित थोडंसं बदललं असल्याने आता महाविकास आघाडीला नव्याने पुन्हा आखणी करावी लागणार आहे. या सगळ्यात जी गोळाबेरीज पाहायला मिळत आहेत ते पाहता आता MIM च्या मतांना देखील प्रचंड महत्त्व प्राप्त झालं आहे.

राज्यसभा निवडणुकीचा निकाल कधी?

उद्या (10 जून) सकाळी 9 वाजेपासूनच मतदानाला सुरुवात होईल. 4 वाजता हे मतदान संपणार आहे. त्यानंतर ताबडतोब मतमोजणीला सुरुवात होईल. यावेळी एकूण 285 आमदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील. त्यामुळे उद्या मतदान पार पडताच या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

राज्यसभेची महाराष्ट्रातील निवडणूक ही तब्बल 24 वर्षांनी होणार आहे. कारण गेल्या 24 वर्षांपासून राज्यसभेची निवडणूक ही बिनविरोध होत आली आहे. पण यंदा ही निवडणूक मतदानाने पार पडणार आहे. 24 वर्षांपूर्वी राज्यसभा निवडणुकीसाठी जे मतदान पार पडलं होतं ते मतदान सीक्रेट बॅलेट पद्धतीने झालं होतं. आता होणारं मतदान ओपन बॅलेट पद्धतीने होणार आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान कसं होतं? आमदारांना कोणत्या गोष्टी कराव्या लागतात?

काय आहे राज्यसभा निवडणुकीची नियमावली?

  • मतदानासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदाराला (आमदार) पेन दिला जातो. त्याचाच वापर आमदाराला मतदान करताना करावा लागतो. हा पेन मतपत्रिकेसोबतच दिला जातो. इतर कोणतंही पेन, पेन्सिल किंवा बॉलपेन अथवा चिन्हांकित करण्याचं कोणतंही साधन यांचा वापर आमदाराने केला तर ती मतपत्रिका अवैध ठरवली जाते.

  • आमदारांना दिल्या जाणाऱ्या मतपत्रिकेवर उमेदवाराचं नाव आणि त्याच्या पुढे पसंतीक्रम असा रकाना असतो. आमदाराला प्रथम पसंतीक्रम म्हणून निवडलेल्या उमेदवाराच्या नावासमोर पसंतीक्रम या स्तंभात १ हा अंक लिहून मतदान करायचं असतं. १ असा अंक फक्त एकाच उमेदवाराच्या नावासमोर लिहायचा असतो.

  • एकापेक्षा जास्त उमेदवार राज्यसभा निवडणूक लढवत असले, तरीही १ हा पसंतीक्रम फक्त एकाच नावासमोर लिहायचा असतो.

  • निवडून येणाऱ्या उमेदवाराच्या संख्येव्यतिरिक्त निवडणूक लढवणारे अनेक उमेदवार असतील आणि पसंतीक्रम ठरवायचा असेल म्हणजे समजा पाच उमेदवार निवडणूक लढवत असती आणि केवळ दोन उमेदवारांना निवडून द्यायचं असेल तर आमदारांना पसंतीक्रमानुसार एक ते पाच या उमेदवारांच्या नावांपुढे दर्शवलेल्या अंकासाठी पसंतीनुसार चिन्हांकन करायचं असतं. (ज्याला पहिली पसंती आहे, त्याला १ क्रमांक अशा पद्धतीने).

  • आमदार पसंतीच्या उमेदवारांच्या नावासमोर पंसंतीक्रमाचा चिन्हक्रम या रकान्यात २, ३ , ४ असे अंक लिहून उर्वरित उमेदवारांना पसंतीक्रमानुसार मत देऊ शकतात.

  • आमदारांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करताना कोणत्याही उमेदवाराच्या नावासमोर केवळ एकच अंक दर्शवला आहे याची खात्री करून घ्यायची असते आणि एकापेक्षा अधिक उमेदवारांच्या नावासमोर तोच अंक दर्शवलेला नाही याचीही खात्री करायची असते.

  • पसंतीक्रम हा केवळ अंकांमध्येच म्हणजेच १, २, ३ असाच लिहायचा असतो. हा पसंतीक्रम शब्दांमध्ये म्हणजे एक, दोन, तीन असा लिहायचा नसतो.

  • पसंतीक्रम १, २, ३ या भारतीय संख्याप्रमाणे किंवा I II III या प्रमाणे रोमन स्वरूपात लिहिता येऊ शकतात.

  • मतपत्रिकेवर नाव किंवा इतर कोणतेही शब्द लिहायचे नसतात. त्याचबरोबर स्वाक्षरी किंवा नावाची अद्याक्षरंही लिहायची नसतात. अंगठ्याचा ठसा उमटवण्यासही मज्जाव असतो. तसं केल्यास ती मतपत्रिका अवैध ठरवली जाते.

  • आमदाराला पसंतीक्रम दर्शवण्यासाठी कोणतंही चिन्हं किंवा X यासारखे चिन्ह दर्शवणं अयोग्य असतं. अशी मतपत्रिकाही बाद ठरवण्यात येईल.

  • मतपत्रिका वैध ठरण्यासाठी कोणत्याही एका उमेदवाराच्या नावासमोर १ हा अंक लिहून पसंतीक्रम दर्शवायचा असतो. नंतरचे पसंतीक्रम म्हणजेच २ किंवा ३ हे लिहिणं आमदारासाठी वैकल्पिक असतं. म्हणजेच पहिला क्रमाक लिहिल्यानंतर दुसरा किंवा त्यानंतरचा पसंतीक्रम दर्शवलाच पाहिजे अशी सक्ती नसते.

यामुळे आता राज्यसभा निवडणुकीत नेमकं कोण बाजी मारणार हे आपल्याला उद्याच समजू शकणार आहे. ज्यासाठी आता अवघे काही तासच उरले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT