Money Heist मधील बेला चाओ गाण्याचा नेमका इतिहास काय?
मुंबई: नेटफ्लिक्सवर मनी हाइस्ट (Money Heist) या सर्वाधिक लोकप्रिय सीरीजचा पाचवा सीझन नुकताच प्रदर्शित झाला आहे. मनी हाइस्टचं थीम साँग तुम्ही आतापर्यंत अनेकदा ऐकलं असेल. पण या थीम साँगचा एक रंजक इतिहास आहे. ‘बेला चाओ’ (Bela Ciao) गाण्याचा रंजक इतिहास आणि त्या पार्श्वभूमीवर आंदोलनं, क्रांतीची बिजं रोवणाऱ्या गाण्यांचा इतिहास आपण जाणून घेऊयात. या गाण्याच्या ओळीने […]
ADVERTISEMENT

मुंबई: नेटफ्लिक्सवर मनी हाइस्ट (Money Heist) या सर्वाधिक लोकप्रिय सीरीजचा पाचवा सीझन नुकताच प्रदर्शित झाला आहे. मनी हाइस्टचं थीम साँग तुम्ही आतापर्यंत अनेकदा ऐकलं असेल. पण या थीम साँगचा एक रंजक इतिहास आहे. ‘बेला चाओ’ (Bela Ciao) गाण्याचा रंजक इतिहास आणि त्या पार्श्वभूमीवर आंदोलनं, क्रांतीची बिजं रोवणाऱ्या गाण्यांचा इतिहास आपण जाणून घेऊयात.
या गाण्याच्या ओळीने तरुण पिढीला अक्षरश: वेड लावलं आहे. खरं तर हे फक्त एका वेबसीरीज पुरता हे गाणं मर्यादित नसून चळवळीचं गाणं म्हणून, क्रांतीचं गाणं म्हणून, आंदोलनाची घोषणा म्हणून हे गाणं जवळजवळ जगभरात प्रसिद्ध आहे. सुमारे 100 वर्षांचा या गाण्याला इतिहास आहे.
आंदोलन म्हटलं की, आंदोलनाच्या घोषणा आल्या, गाणी आली. अनेक आंदोलनं बघितली की, तर आपल्याला दिसून येईल की, त्यात गाण्यांचा वाटा फार मोठा असतो. अशाच आंदोलनातून एक गाणं जन्माला आलं ते म्हणजे बेला चाओ. खरं म्हणजे या गाण्याबाबत दोन गोष्टी आहे. एक म्हणजे या गाण्याचा इतिहास आणि त्याच्या दंतकथा देखील आहे.
हे गाणं मूळ इटलीतून जन्माला आलं. इटलीमध्ये फेसिझमविरुद्ध जी चळवळ सुरु झाली तिथे सुद्धा आंदोलनात हे गाणं खूप गाजलं होतं. मनी हाईस्टच्यानिमित्ताने या गाण्याची आता पुन्हा एकदा जोरदार चर्चा होऊ लागली आहे. असं म्हटलं जातं की, इटलीमध्ये महिला कामगारांचं जे शोषण होत होतं. त्याविरोधात व्यक्त होणाऱ्या भावना.. हेच गाणं म्हणजे बेला चाओ.
‘बेला चाओ’ या शब्दाचा मूळ अर्थ ‘गुड बाय ब्युटीफूल’ किंवा जोडीदाराला केलेला गुड बाय असा होतो. पण वेगवेगळ्या प्रसंगात हे गाणं वापरलं गेलं आहे. उत्तर इटलीमध्ये प्रो व्हॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. इथे भात शेतीवर मोठ्या प्रमाणात महिला कामगार काम करतात. या महिलांना मॉन्डिनो असं म्हटलं जायचं इटलीमध्ये.
खरं तर त्यावेळी हे काम खूप कष्टाचं होतं आणि तेव्हा महिलांचं खूप शोषण केलं जायचं. तिथले जे मुकादम असायचे ते या महिलांकडून भरपूर वेळ काम करुन घ्यायचे. त्यांच्याकडून काम करताना काही चूक झाली तर त्यांना त्याची शिक्षा केली जायची.
दरम्यान, शेतीचं काम करताना या महिला काही गाणी गुणगुणायचे. त्यातलंच एक गाणं म्हणजे बेला चाओ. ‘हे ही दिवस संपतील’ अशा आशयाने त्या हे गाणं गायच्या. ‘मॉन्डिना व्हर्जन’ हे या गाणंच मूळ व्हर्जन समजलं जातं. म्हणजे या गाण्याची तिथून सुरुवात झाली असं म्हटलं जातं.
जसं आपल्याकडे पूर्वी जात्यावर काम करताना बायका गाणी म्हणताना आपली सुख-दु:ख व्यक्त करायच्या. तसंच साधारणपणे बेला चाओ हे भात शेती करणाऱ्या महिलांचं गाणं होतं. या गाण्यातून त्या शोषणाविरुद्ध आपलं दु:ख व्यक्त करायच्या.
यानंतर हे गाणं प्रामुख्याने दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात समोर आलं होतं. इटलीमध्ये जी फेसिस्ट सत्ता होती त्यांच्याविरोधात जनता रस्त्यावर उतरली होती. त्यावेळी तरुणांचा या आंदोलनात विशेष सहभाग होता. त्याकाळी हे गाणं खूपच गाजलं होतं. त्या आंदोलनाचा गाभा बनलं होतं. त्यामुळे स्फूर्ती देणारं गाणं बेला चाओ म्हणून अवघ्या जगात गाजलं होतं. पण इटलीमध्येच या गाण्याचा दुसरा टप्पा बघितला गेला. पुढे रेकॉर्डिंगमध्ये दोन्ही गाण्याची व्हर्जन उपलब्ध झाली. पण जगभरातील वेगवेगळ्या आंदोलनांना या गाण्याने प्रेरणा देण्याचं काम केलं. हे गाणं अनेकांनी आंदोलनांमध्ये वापरलं.
ग्रीसमध्ये 2015 साली डाव्या पक्षांचं सीरीज्या पार्टीने सत्तेचा जो इतिहास रचला तेव्हा त्यांचे लाखो समर्थक रस्त्यावर उतरले होते. तेव्हा बेला चाओ हे गाणं म्हणतच त्यांनी आपल्या विजयाचा जल्लोष केला होता. त्यानंतर फ्रान्समध्ये झालेल्या येलो वेस्ट मूव्हमेंटमध्येही हे गाणं ऐकायला मिळालं होतं. त्यानंतर भारताबाबत बोलायचं झालं तर CAA आणि NRC विरुद्ध आंदोलनं झाली तिथेही अनेक तरुण आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून आले. त्यातही या गाण्याचं भारतीय व्हर्जन करुन वापरण्यात आलं.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या बंगालच्या निवडणुकांमध्ये बेला चाओच्या धर्तीवर एक गाणं प्रसिद्ध झालं होतं. खरं तर भारतामध्ये आंदोलनांच्या गाण्यांचा खूप इंटरेस्टिंग इतिहास आहे. वेगवेगळ्या चळवळी, आंदोलनासाठी वेगवेगळी गाणी राहिली आहेत.
आपण जसं म्हणतो की, वर्गवादाविरुद्धचा संघर्ष त्याच्या ज्या चळवळी झाल्या त्यामध्ये आपण बघितलं , सांगा आम्हाला बिर्ला, बाटा, टाटा कुठे आहे हो.. सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठे आहे हो… अशी गाणी किंवा स्त्री मुक्तीची जी गाणी आहेत आपल्याकडे ‘मै पानी को जाऊ की नको ऐसा खत में लिखो..’ ते गाणं असेल. याशिवाय दलित चळवळीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अनेक गाणी असतील. अशी अनेक गाणी आहेत.
उजव्या चळवळीबाबत बोलायचं झालं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये ज्याला पदं म्हटली जातात त्यात सुद्धा आपल्याला गाण्यांचा मोठा सहभाग दिसतो. या अशा गाण्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये किंवा आंदोलकांमध्ये एक प्रकारे स्फुल्लिंग चेतवलं जातं. म्हणजेच चळवळी वेगवेगळ्या असल्या तरी त्यात गाण्यांचा वाटा मोठा आहे.
‘टूल किट’ प्रकरणी चर्चेत असलेली निकिता जेकब कोण आहे?
बेला चाओ हे गाणं इटलीमध्ये जन्माला आलं असलं तरी जगभरातील अनेक चळवळींचं हे गाणं आवाज बनलं. शोषणाविरुद्धचा आवाज बनलं. म्हणून कदाचित आजही त्या गाण्याला जे युनिव्हर्सल अपील आहे त्यामुळेच तरुणांना हे गाणं भुरळ पाडतं आहे.
2017 साली मनी हाईस्टचा पहिला सीझन आला होता. त्यामध्ये जे प्रोफेसर नावाचं जे मुख्य पात्र आहे ते आपल्या वडिलांबद्दल माहिती देताना सांगतं की, त्याचे वडील इटलीमध्ये कसे फॅसिस्टविरोधात लढले होते. तो इतिहास सांगताना या गाण्याचा तिथे संदर्भ येतो त्यानंतर हे गाणं लौकिक अर्थाने लोकांमध्ये प्रसिद्ध झालं.