आम्हाला लसीची काय गरज आहे? मुंबईपासून हाकेच्या अंतरावर पालघरमध्ये लसीकरणाला थंड प्रतिसाद
कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना सरकारी यंत्रणा लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रातही राज्य सरकार लोकांनी लवकरात लवकर लस घ्यावी यासाठी प्रयत्न करत आहे. परंतू मुंबई पासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या पालघरमधील आदिवासी पाड्यांवर लोकांना लसीकरणाबद्दल फारशी माहितीच नसल्याचं कळून आलं. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघरमधील आदिवासी भागात लोकांच्या लसीकरणाबद्दल […]
ADVERTISEMENT
कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना सरकारी यंत्रणा लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रातही राज्य सरकार लोकांनी लवकरात लवकर लस घ्यावी यासाठी प्रयत्न करत आहे. परंतू मुंबई पासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या पालघरमधील आदिवासी पाड्यांवर लोकांना लसीकरणाबद्दल फारशी माहितीच नसल्याचं कळून आलं. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघरमधील आदिवासी भागात लोकांच्या लसीकरणाबद्दल प्रतिक्रीया जाणून घेण्याचा प्रयत्न मुंबई तक ने केला. यावेळी काही धक्कादायक बाबी समोर आल्या.
ADVERTISEMENT
युद्ध सुरु असताना सैनिकांनी घरात बसून कसं चालेल? गरोदरपणातही महिला डॉक्टर करतेय कोरोना रुग्णांची सेवा
“मला लसीची काय गरज आहे? मी दररोज उन्हातान्हात काम करते आहे. दररोज जड वस्तू मी उचलते. मला नाही वाटत मला लस घेण्याची गरज आहे. जी लोकं घरात राहतात आणि बाहेर पडत नाहीत त्यांनाच कोरोनाची लागण होतेय…अशांनाच लस घेण्याची गरज आहे. आम्ही रोज बाहेर जाऊन काम करतोय आम्हाला लस घेण्याची गरज नाही”, अशी प्रतिक्रीया मनोर भागात राहणाऱ्या सुनीता या महिलेने दिली. महत्वाची गोष्ट म्हणजे लसीकरणाविषयी असं मत असणारी सुनीता ही एकमेव महिला नव्हती, मनोर गावात बहुतांश लोकांचं लसीकरणाबद्दल हेच मत पहायला मिळालं.
हे वाचलं का?
महाराष्ट्रात गेल्या 10 दिवसात 18 ते 44 वयोगटातील फक्त ‘एवढ्याच’ लोकांना मिळाली लस
मस्करपाडा नावाच्या गावात राहणाऱ्या मनोज या युवकाशी आम्ही लसीकरणाबद्दल विचारलं असता त्यानेही लसीकरणाबद्दल संभ्रम असलेलं मत व्यक्त केलं. “लघ घ्यायची की नाही हे मी अद्याप ठरवलेलं नाही. मी तरी अजून लस घेतलेली नाही. जर सरकारी अधिकारी लस द्यायला घरीच आले तर मग मी विचार करेन, पण सध्या मला लसीची गरज आहे असं वाटत नाही.” लसीकरणावरुन सरकार लोकांना घाबरवत असल्याचं मत मनोजच्या आईने व्यक्त केलं. “आमच्याकडे खायला काहीही नाहीये, सगळं काही बंद आहे. घरात तीन बाळं आहेत. लसीकरण हे आमच्यासारख्या गरीबांना घाबरवण्याचा एक कट आहे. आम्हाला लसीची गरजच काय?” अशा शब्दांमध्ये मनोजच्या आईने आपली काहीशी संतप्त प्रतिक्रीया दिली.
ADVERTISEMENT
आदिवासी बांधवांच्या लसीकरणाबद्दल प्रतिक्रीया जाणून घ्यायला गेलेल्या मुंबई तक च्या प्रतिनिधीलाही काही लोकांनी सरकारी अधिकारी समजलं. परंतू आम्ही प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आहोत हे समजावून सांगितल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी आमच्याशी संवाद साधला. “मार्च २०२० पासून एकदाही सरकारी अधिकारी असो किंवा हॉस्पिटलमधले अधिकारी असो आमच्या भागात आलेले नाहीत. कोणीही इथे येऊन आम्हाला मास्क दिले नाही की कोरोना काळात स्वतःची कशी काळजी घ्यायची याची आम्हाला माहिती दिली नाही. त्यामुळे येथील लोकांना लसीबद्दल काहीच माहिती नाहीये”,अशी माहिती एका स्थानिक युवकाने दिली.
ADVERTISEMENT
गावातील काही समजदार आणि शिक्षीत तरुण कोरोनाबद्दल लोकांना जनजागृती करण्यासाठी मदत करतात. परंतू त्यांना सरकारी यंत्रणांची मदत मिळत नसल्यामुळे त्यांच्या कामातही अनेक मर्यादा येताना दिसत असल्याचं पहायला मिळालं. काही दिवसांपूर्वी एका घरात एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली. यानंतरही त्या घरात किंवा आजुबाजूच्या भागात सॅनिटायजेशन झालं नाही. कोणालाही या परिस्थितीचं पडलेलं नाही, आम्हाला मदत करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. बातम्यांमध्ये जनजागृती करणारे व्हिडीओ पाहून आम्ही इथे लोकांना माहिती देत असतो अशी माहिती एका तरुणाने दिली.
मस्करपाडा गावात अंदाजे दीडशे लोकांची वस्ती आहे…एका स्थानिक NGO ने दिलेल्या माहितीनुसार या १५० लोकांपैकी फक्त १६ लोकांनी आतापर्यंत लस घेतली आहे. ५१ वर्षीय दामोदर कासाट यांना मधुमेहाचा त्रास असूनही त्यांनी स्वतः लस घेतली आणि आपल्या परिवारातील ५ सदस्यांना लस घ्यायला लावली. परंतू गावकऱ्यांना लसीचं महत्व समजावून देण्यात आपण अपयशी ठरल्याचं दामोदर यांनी मुंबई तक शी बोलताना सांगितलं. “कोणीही माझं ऐकत नाही. ते सर्वजण घाबरलेले आहेत. मी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत आणि मी व्यवस्थित आहे. मी माझ्या पद्धतीने लोकांना लस घेण्यासाठी आग्रह करतो आहे.”
पालघरचे जिल्हाधिकारी माणिक गुर्साळ यांच्याशी मुंबई तक ने लसीकरणाबद्दल असलेल्या उदासीनतेबद्दल संपर्क साधला. यावेळी बोलत असताना जिल्हाधिकाऱ्यांनीही पालघरमध्ये अनेक आदिवासी पाड्यांमध्ये चुकीच्या समजूतींमुळे लोकं लस घेण्यासाठी पुढे येत नसल्याचं मान्य केलं. “बहुतांश लोकं ही चुकीच्या समजूती आणि अंधश्रद्धेमुळे लस घेण्यासाठी पुढे येत नाहीयेत. जगात आता काय सुरु आहे याची माहिती त्यांना मिळते आहे. सुरुवातीला आम्ही सर्वे करण्यासाठी पाड्यांवर जाऊन लोकांचं तापमान चेक करत होतो…परंतू त्यावेळी अनेकांना आम्ही त्यांच्या डोक्यावर बंदूक ठेवतोय असं वाटलं. यानंतर आम्हाला त्यांची समजून काढून हातावरुन तापमानाची माहिती घ्यावी लागली. लसीकरणाबद्दल लोकांमध्ये अजुनही जागृती झालेली नाही आणि हीच इथली सर्वात मोठी समस्या असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
त्यामुळे एकीकडे लस घेण्यासाठी सरकारी यंत्रणा जिवाचं रान करत असताना या लसीचे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत हे लोकांपर्यंत पोहचवण्यात काहीशा अयशस्वी ठरत आहेत. म्हणून पालघरमध्ये आदिवासी बांधवांचा लसीकरणाला फारसा प्रतिसाद मिळत नाहीये. त्यामुळे या समस्येवर आता सरकार काय उपाय काढतं याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT