Narendra Giri’s Suicide Note : आनंद गिरी यांच्यावर गंभीर आरोप, वाचा आणखी काय उल्लेख?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची चौकशी प्रयागराज पोलीस करत आहेत. त्यांच्या या संशयास्पद मृत्यूनंतर एक सुसाईड नोट समोर आली आहे. या सुसाईड नोटचा उल्लेख प्रयागराज पोलिसांनीही केला आहे.

काय म्हटलं आहे कथित सुसाईड नोटमध्ये?

‘मी महंत नरेंद्र गिरी खरं तर मला 13 सप्टेंबर 2021 लाच आत्महत्या करायची होती. मात्र माझी हिंमत झाली नाही. आज मला हरिद्वारमधून असं समजलं आहे की आनंद गिरी कॉम्प्युटर किंवा मोबाईलचा वापर करून एखाद्या महिलेसोबत किंवा मुलीसोबत माझे फोटो व्हायरल करू शकतो. मी त्या महिलेसोबत किंवा मुलीसोबत कसं गैरवर्तन करतो आहे ते तो फोटो व्हायरल करून सांगू शकतो. त्यामुळे मला याबाबत आधीच सफाई देणं आवश्यक वाटतं आहे. मी ज्या पदावर आहे ते एक सर्वोच्च सन्मान असलेलं पद आहे. सत्य काय आहे ते लोकांना नंतर कळेलच. मात्र बदनामीच्या भीतीने मी आता माझं आयुष्य संपवतो आहे. माझ्या या निर्णयाची जबाबदारी आनंद गिरी, आद्या प्रसाद तिवारी आणि त्यांचा मुलगा संदीप तिवारी यांची असणार आहे’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

20 सप्टेंबरला प्रयागराजमध्ये असलेल्या बाघंबरी मठामध्ये महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या मृत्यूबाबत प्रयागराजचे एडीजी (कायदा सुव्यवस्था ) यांनी सांगितलं की आनंद गिरी यांच्या विरोधात आम्ही कलम 306 आत्महत्येला प्रवृत्त करणं या अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आनंद गिरी यांचं नाव नरेंद्र गिरी यांच्या सुसाईड नोटमध्ये आढळलं. आनंद गिरी यांना सोमवारी ताब्यात घेण्यात आलं आणि आज अटक करण्यात आली.

ADVERTISEMENT

आद्या तिवारी आणि त्यांचा मुलगा संदीप तिवारी यांनाही अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासहीत काही दिग्गज नेत्यांनी आज नरेंद्र गिरी यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. नरेंद्र गिरी यांचा मृत्यू ही आत्महत्या आहे असं पोलीस प्रशासनाचं म्हणणं आहे. तर अनेक साधू, संत आणि भक्त हे हा एक कट आहे असं सांगत आहेत. या प्रकरणी आता पोलीस कसून तपास करत आहेत.

ADVERTISEMENT

अखिल भारतीय अखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी हे त्यांच्या चार भावंडांपैकी दुसरे होते. प्रयागराज येथील छतौना हे त्यांचं मूळ गाव. नरेंद्र गिरी यांचं मूळ नाव नरेंद्र सिंह होतं. त्यांचे वडील भानु सिंह हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते. नरेंद्र गिरी यांचे दोन भाऊ शिक्षक आहेत तर एक भाऊ होम गार्ड आहे.

नरेंद्र गिरी निरंजनी आखाड्याशी जोडले गेले. 1986 मध्ये ते या आखाड्याचे पदाधिकारी झाले. त्यानंतर त्यांनी या आखाड्याचा विस्तार मोठ्या प्रमाणावर केला. त्यानंतर त्यांना या आखाड्याचं सचिव पदही देण्यात आलं. हे पद मिळाल्यानंतर नरेंद्र गिरी यांनी मठाची संपत्तीही वाढवली. 1998 मध्ये त्यांना या आखाड्याचं अध्यक्षपद देण्यात आलं. 2010 मध्ये नरेंद्र गिरी यांना अखिल भारतीय आखाडा परिषदेचं अध्यक्षपद मिळालं. तेव्हापासून ते अध्यक्षपदी होते. नकली साधू जसे की आसाराम बापू, रामपाल, राधे माँ, राम रहिम यांच्यावर बहिष्कार घालण्याचा महत्त्वाचा निर्णय त्यांनी घेतला होता. तसंच देशातल्या बनावट साधूंची एक यादीही त्यांनी जारी केली होती. हा त्यांच्या कारकिर्दीतला सर्वात महत्त्वाचा निर्णय होता.

Akhadas: आखाडा म्हणजे काय?, काय आहे त्याची परंपरा.. कसे निवडले जातात याचे अध्यक्ष?

आनंद गिरी आणि वाद

नरेंद्र गिरी यांचे मुख्य शिष्य असलेले आनंद गिरी हे कायमच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. आनंद गिरी यांना ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये छेडछाड प्रकरणात तुरुंगातही जावं लागलं होतं. जेलमधून सुटल्यार जमिनीच्या वादातही त्यांचं नाव समोर आलं होतं. त्यांच्यावर हे आरोप झाल्यानंतर नरेंद्र गिरी यांनी आनंद गिरी यांच्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर आनंद गिरी यांनी नरेंद्र गिरी यांच्यावर मठाची जमीन विकल्याचा आरोप केला होता. त्यामुळे या दोघांमधला वाद वाढत गेला. यानंतर आनंद गिरी यांनी एक व्हीडिओ पोस्ट करून सगळ्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मठात जाऊन पाय धरून नरेंद्र गिरी यांची माफीही मागितली होती. नरेंद्र गिरी यांनी आपल्या शिष्याला माफ केलं पण त्यांना आखाड्यात सहभागी करून घेतलं नाही.

20 सप्टेंबरला नरेंद्र गिरी यांचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. त्यांची कथित बारा पानांची सुसाईड नोटही पोलिसांना मिळाली. यामध्ये आनंद गिरी आद्या तिवारी आणि संदीप तिवारी यांची नावं आहेत. माझ्या मृतदेहाला आनंद गिरी यांनी हातही लावू नये असंही सुसाईड नोटमध्ये नरेंद्र गिरी यांनी लिहिलं आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे. तसंच आद्या आणि संदीप तिवारी हे दोघेही चांगल्या वर्तनाचे नाहीत असाही उल्लेख केला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT