मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे-भाजप एकत्र येणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई महापालिका निवडणुकीची चर्चा सुरू होते, तेव्हा वारंवार हा प्रश्न उपस्थित केला जातो, की मनसे आणि भाजपची युती होणार का? यावर अनेकदा दोन्ही बाजूनी असं सांगण्यात आलंय, की भाजप-मनसे एकत्र येणार नाही, तरीही काही कालावधीनंतर या शक्यतांना उधाण येतं. पण खरंच मनसे आणि भाजप एकत्र येऊ शकते का? किंवा ते एकत्र ने येण्यामागची कारणं काय असतील?

ADVERTISEMENT

तर भाजपचा पारंपरिक साथीदार शिवसेनेनं साथ सोडल्यानं महाराष्ट्रात भाजप एकटी पडली. राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सुरूवात झाली, ती मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून. पण 2020मध्ये मनसेनं हिंदुत्वाची वाटचाल धरली. तेव्हापासूनच भाजप आणि मनसे युतीच्या चर्चांना सुरूवात झाली.

9 जानेवारी 2020 ला देवेंद्र फडणवीसांनी एक वक्तव्य केलेलं. मनसे-भाजपच्या विचारांमध्ये अंतर आहे, पण कार्यपद्धती बदलली, मनं जुळली तर युती होऊ शकते….केवळ फडणवीसच नाही तर अशी अनेक नेत्यांनी वक्तव्य आहेत, जी भाजप-मनसेच्या युतीवरून बुचकळ्यात पाडतात

हे वाचलं का?

परप्रांतीयांबाबतची भूमिका बदलेपर्यंत मनसे-भाजप युती नाही, असं महाराष्ट्र भाजपाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणालेले

ADVERTISEMENT

नुकतीच प्रसाद लाड यांनीही राज ठाकरेंची भेट घेतली, तेव्हा ते ही म्हणाले, की आमच्यासोबत जे लोक येतील, त्यांना आम्ही सोबत घेऊ

ADVERTISEMENT

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनीही राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरून म्हटलेलं….मला असं वाटतं हिंदुत्वाची भूमिका त्यांनी घेतली किंवा तशा प्रकारचे काही वातावरण आलं तर हिंदुत्ववादी विचारांचे पक्ष आणि संघटना एकत्र येण्यास निश्चितपणे चांगलं वातावरण निर्माण होईल

पण या सगळ्या वक्तव्यानंतर नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस म्हणतायत, की मराठी माणसाला न्याय देताना, अमराठी माणसावर अन्याय होता कामा नये, पण ही भूमिका अजूनही मनसेनं स्वीकारलेली नाही. युतीबाबत फडणवीसांनी थेट वक्तव्य केलं नसलं, तरी मनसेनं भूमिका न बदलल्यानं अप्रत्यक्षपणे युती न होण्याचेच हे संकेत दिसतायत.

मराठी अस्मितेचा मुद्दा हाती घेतल्यानंतर मनसेनं उत्तर भारतीयांविरोधात मोर्चा उघडलेला. पण हेच उत्तर भारतीय भाजपची मोठी वोट बँक आहेत. हेच उत्तर प्रदेश केंद्रातल्या सत्तेचं प्रवेशद्वार असतं…हे तेच उत्तर प्रदेश आहे, जिथे पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणारेत. अशा परिस्थितीत उत्तर भारतीयांविरोधातली भूमिका घेणाऱ्या मनसेसोबत भाजपने जाणं कठीणच आहे.

आता भाजप असो किंवा मनसे, दोघांचाही सध्याच्या घडीला मोठा राजकीय शत्रू शिवसेनाच आहे. 2017 मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेच्या हाकेला शिवसेनेनं ओ तर दिली नव्हतीच, उलट त्यांचेच नगरसेवक बळकावले. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ घेतल्याचा वचपाही भाजपला बीएमसी निवडणुकीतून काढायचा आहे.

अशात भाजप आणि मनसेला योग्य रणनिती आखणं अतिशय महत्वाचं असेल. एकत्र येण्यात फायदा आहे, की एकत्र न येताही मत फोडता येतील ह्या 2 पर्यायांवर त्यांना विचार करायचाय.

मनसे-भाजप एकत्र आल्यास काय होईल?

सातत्यानं पदरात पराभव येणाऱ्या मनसेला उभारी मिळण्याची शक्यता

शिवसेनेचा मराठी मतदार खेचण्याचा फायदा

मनसे-भाजप एकत्र का येणार नाहीत?

हिंदुत्व सोडलं तर विचारधारांमध्ये कमालीचा फरक

युतीत न राहून शिवसेनेची मत फोडता येणार

जागावाटपावरून वाद होण्याची शक्यता

2019 च्या लोकसभा निवडणुकीत न उतरताही राज ठाकरेंनी मोदी-शाहांविरोधात कडाडून प्रचार केला. लाव रे तो व्हीडिओ या त्यांच्या कॅम्पेनअंतर्गत जमेल तितकी भाजपची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता भाजपसोबत मनसे गेल्यास मनसेच्या विचारधारेवरच प्रश्नचिन्हं उपस्थित राहू शकतं.

दुसरीकडे मोदी-शाहांविरोधात इतका प्रचार करूनही सभेची गर्दी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मतांमध्ये परावर्तीत तर झाली नाही. त्यामुळे राज ठाकरेंचा निवडणुकीत किती करिष्मा असेल, यावर भाजपला शंका असू शकते. आणि म्हणूनच युतीत न राहता, बाहेर राहूनही अप्रत्यक्षपणे ते एकमेकांना मदत करूच शकतात.

यावर आमच्या इंडिया टूडेच्या प्रतिनिधींचीही आम्ही मतं जाणून घेतली,

“मनसेकडे मराठी मतदार आजही आशेनं पाहतो, त्यामुळे या मतदारांचा भाजपला नक्कीच फायदा होईल. आणि मुंबई महापालिकेत ही ट्रायल घेऊन भविष्यातही युती ठेवायची की नाही, याचा निर्णय भाजपला घेता येईल”

पंकज उपाध्याय, पत्रकार, इंडिया टूडे

“निवडणुकीआधी युती होणं मुश्किल वाटतं, पण कदाचित निवडणूक झाल्यानंतर युती होण्याची शक्यता जास्त आहे.”

मुस्तफा शेख, पत्रकार, इंडिया टूडे

राज्यात कधीही झाला नाही, तसा प्रयोग 2019च्या विधानसभा निवडणुकी नंतर झाला. कुणी स्वप्नातही कल्पना केली नसेल, ती शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेली. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीनंतर भाजपला संख्याबळ कमी पडलं, आणि तेव्हा मनसेच्या साथीनं बहुमत गाठणं शक्य होत असेल, तर तो ही पर्याय भाजपसमोर खुला असेलच. कारण सर्वात श्रीमंत मुंबई महापालिकेची सत्ता मनसेही सोडवणार नाही.

मुंबईत भाजप-मनसेची किती ताकद?
2012 मध्ये मनसेचे 28 नगरसेवक निवडून आलेले, पण 2017 ते 7 वर घसरले. तर 2012 मध्ये भाजपचे 31 नगरसेवक होते, तेच 2017 ला 82 वर पोहोचले. 2017 मध्ये शिवसेनेला 84 जागा मिळालेल्या. पण राज्यात सत्तेत एकत्र असल्यानं भाजपनं बीएमसीत शिवसेनेच्या सत्तास्थापनेत आडकाठी आणली नाही.

पण आता सगळीच समीकरणं बदलली आहेत. नाही म्हटलं तरी मनसे अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावतेय. त्यामुळे भाजप-मनसेची युती होते की नाही, याकडे राजकीय वर्तुळाचे डोळे लागून आहेत.

जीभ भाजल्यावर ताक सुद्धा फुंकून पितात. मुंबई महापालिका निवडणूक शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची, तर भाजपसाठी बदल्याची आहे. शिवसेनेचा पराभव हेच भाजप आणि मनसे दोघांचंही लक्ष्य आहे… देवेंद्र फडणवीसांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत तरी मनसेसोबत न जाण्याचेच संकेत दिलेत. पण राजकारणात कुणीच कुणाचा शत्रू नसतो, त्यामुळे भाजप-मनसे एकत्र येतात की नाही, हे पाहायला 2022ची वाट पाहावी लागेल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT