सचिन वाझे अडचणीत आलेलं ख्वाजा युनूस प्रकरण नेमकं आहे तरी काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: मुंबई पोलिसातील अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनं एकच खळबळ उडाली आहे. पण सचिन वाझे वादात सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांचं अशा वादग्रस्त प्रकरणात नाव आलं आहे.

एनआयएपुढे चौकशीसाठी हजर राहण्यासाठी जाताना त्यांनी आपल्या व्हॉट्सअपवर एक स्टेट्स पोस्ट केलं होतं. त्या पोस्टमध्ये त्यांनी जवळपास १७ वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणाची सल बोलून दाखवली होती. तसंच एक धक्कादायक विधानही त्यांनी या पोस्टमध्ये केलं होतं.

या स्टेट्स पोस्टमध्ये वाझे म्हणाले होते, ‘३ मार्च २००४ ला मला सीआयडी अधिकाऱ्यांनी अटक केली. एका चुकीच्या केसमध्ये मला अडकवण्यात आलं. ती केस अजूनही अनिर्णित आहे. आता पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होते आहे.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘माझे सहकारी अधिकारी मला खोट्या प्रकरणात अडकवू पाहात आहेत. मात्र तेव्हाच्या आणि आत्ताच्या परिस्थितीत प्रचंड फरक आहे. तेव्हा माझ्याकडे १७ वर्षे होती. केसमधून बाहेर येईन अशी आशा होती, आयुष्य आणि नोकरीची वर्षेही होती. आता माझ्याकडे पुढची १७ वर्षे काहीही नाही. तसंच माझ्यातली सहनशक्तीही आता संपत चालली आहे. मी या विचारात आहे की जगाला गुडबाय म्हणण्याची वेळ आली आहे.’

सचिन वाझेंची कारकीर्द: एन्काउंटर स्पेशालिस्ट ते शिवसेना प्रवेश

ADVERTISEMENT

‘सचिन वाझे यांनी या पोस्टमध्ये एकीकडे आपल्याविरोधातल्या प्रकरणात १७ वर्ष झाली तरी काहीच ठोस निकाल लागला नसल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे आता माझ्या हातात १७ वर्ष नाहीत, त्यामुळे जगाला गुडबाय म्हणण्याची वेळ आली आहे.’ असं धक्कादायक विधान केलं आहे.

ADVERTISEMENT

या व्हिडिओमध्ये आपण १७ वर्षांपूर्वीचं ते नेमकं प्रकरण काय होते, आणि वाझेंवर काय आरोप होते, त्याची सद्यस्थिती काय हा सगळा घटनाक्रम बघणार आहोत.

मुंबईत कधीकाळी अंडरवर्ल्डचा अक्षरशः दबदबा होता. अंडरवर्ल्डचे लोकच मुंबई चालवतात, असं म्हटलं जायचं. त्यामुळे या अंडरवर्ल्डचं करायचं काय? हा सवाल सर्वसामान्य मुंबईकरांना सतावत होता. तसंच सरकारवरही या प्रकारावरून खूप टीका व्हायची. त्यामुळं मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्डचा कणा मोडण्यासाठी एन्काऊंटरचं हत्यार उगारलं होतं.

एकीकडे मुंबई पोलीस एन्काउंटरमध्ये अंडरवर्ल्डचा खात्मा करत होते. तर, २१व्या शतकाच्या सुरवातीला म्हणजे 2000 च्या सुरवातीला मुंबई नव्याच दहशतवादाच्या सावटाखाली आली.

सचिन वाझेंना ‘या’ गंभीर कलमांखाली अटक, पाहा कोणकोणती आहेत ही कलमं

सचिन वाझेंना ख्वाजा युनूस प्रकरण चांगलंच भोवलं होतं!

2 डिसेंबर 2002 ला घाटकोपरमध्ये एका बसमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये दोन लोकांचा मृत्यू झाला. तर 39 जण जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी 8 लोकांना अटक केली. यापैकी एका आरोपीचं नाव होतं ख्वाजा युनूस. तो मूळचा परभणीचा होता.

25 डिसेंबर 2002 ला त्याला प्रिवेंशन ऑफ टेरेरिज्म अॅक्ट म्हणजेच POTA अंतर्गत अटक करण्यात आली. यावेळी पोलिसांनी त्याच्यावर असा आरोप केला होता की, घाटकोपर बॉम्बस्फोटात त्याचा सक्रीय सहभाग होता.

दरम्यान, 6 जानेवारी 2003 मध्ये घाटकोपर पोलिस ठाण्यात युनूस आणि इतर तीन आरोपींची चौकशी करण्यात आली. त्यानंतर 7 जानेवारीला पोलिसांकडून असं सांगण्यात आलं की, युनूस बेपत्ता झालाय. फरार झालाय.

वाझेंची अटक आणि POLICE लिहिलेल्या Innova कारचा नेमका संबंध काय?

युनूसला चौकशी संदर्भात औरंगाबादला घेऊन जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि त्याचाच फायदा घेऊन तो आमच्या ताब्यातून पळून गेला. अशी माहिती पोलिसांनी दिली होती.

पण दुसऱ्या बाजूला युनूसच्या सोबत असणाऱ्या सहआरोपींनी कोर्टात असं म्हटलं की, ‘युनूसला पोलीस कस्टडीत बेदम मारहाण करण्यात आली होती. त्याच्या तोंडातून प्रचंड रक्त वाहत होतं आणि त्यानंतर तो आम्हाला काही दिसला नाही.’

तसंच ख्वाजाच्या नातेवाईकांनी देखील पोलिसांवर आरोप केला होता की, ख्वाजा युनूस याचा पोलीस कोठडीतच मृत्यू झाला. पण त्याच्या हत्येचा गुन्हा लपविण्यासाठी पोलिसांनी तो फरार झाल्याचा बनाव रचला.

याचप्रकरणी युनूसच्या कुटुंबीयांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. त्यानंतर कोर्टाने या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र सीआयडीकडे सोपवला. यावेळी चौकशीत असं समोर आलं की, पोलिसांच्या ताब्यात असतानाच युनूसचा मृत्यू झाला. त्यामुळे सचिन वाझे आणि तीन इतर पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्यावर हत्या आणि पुरावे लपवण्याचा आरोप करण्यात आला.

2004 मध्ये सचिन वाझे यांच्यासह चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. दुसरीकडे 2007 मध्ये वाझेंनी आपल्या पोलीस खात्यातील नोकरीचा राजीनामादेखील दिला. मात्र, या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याने त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नाही.

असं असलं तरी राजीनामा दिल्यानंतर काही दिवसांतच २००८ च्या दसरा मेळाव्यात वाझे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश केला असला तरी ते पक्षात मात्र फारसे सक्रीय झाले नाहीत. या सगळ्या काळात युनूस प्रकरणी केस कोर्टात सुरुच होती.

दुसरीकडे घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणी युनूस याच्याशिवाय सातही आरोपीची निर्दोष सुटका करण्यात आली होती. तर 2020 साली सचिन वाझे यांच्यासह राजेंद्र तिवारी आणि सुनील देसाई हे देखील पुन्हा पोलीस दलात रुजू झाले.

पोलीस दलात पुन्हा दाखल झाल्यानंतर वाझे हे तात्काळ अॅक्शन मोडमध्ये दिसून आले होते. रिपब्लिकन टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अटक करण्यासाठी सचिन वाझे आणि त्यांची टीमच गेली होती. यावरुन अर्णब गोस्वामी यांनी वाझेंसारखा एन्काउंटर स्पेशालिस्ट अधिकारी मला अटक करण्यासाठी का पाठवलाय? असा सवालदेखील केला होता.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT