चिपी विमानतळ उद्घाटन सोहळा का ठरला कोकणातला दिवाळीआधीचा शिमगा?

वाचा सविस्तर राणे आणि उद्धव ठाकरेंचा कसा रंगला सामना?
चिपी विमानतळ उद्घाटन सोहळा का ठरला कोकणातला दिवाळीआधीचा शिमगा?

शनिवारचा दिवस गाजला तो चिपी विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यामुळे. या सोहळ्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला नवं विमानतळ मिळालं. त्याआधी दिसून आली ती श्रेयवादाची लढाई. भाजप आणि शिवसेना यांच्यात श्रेय घेण्यासाठी रस्सीखेच सुरू होती. अशात उत्सुकता होती ती नारायण राणे मंचावर काय बोलणार आणि उद्धव ठाकरे त्यांना काय उत्तर देणार याची. दोघांनीही मंचावर जी भाषणं केली त्यामुळे कोकणात दिवाळीआधीचा शिमगा किंवा दिवाळी आधीचं धुमशान पाहण्यास मिळालं असं म्हटल्यास मुळीच वावगं ठरणार नाही. आपण आता जाणून घेऊ हा विमानतळ उद्घघाटन सोहळा दिवाळीआधीचा शिमगा का ठरला.

चिपी विमानतळ सोहळ्यात दोन नेत्यांचा सामना रंगणार हे सगळ्या महाराष्ट्राला ठाऊक होतं. ते दोन नेते म्हणजे अर्थातच भाजपचे नेते आणि केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. या दोघांमध्ये विस्तवही जात नाही हे महाराष्ट्राला माहित आहे. ज्यावेळी नारायण राणे शिवसेनेत अस्वस्थ झाले होते त्यावेळी त्यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. शिवसेना सोडण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही कारण त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाली.

मात्र त्यानंतर त्यांनी कधीही बाळासाहेब ठाकरेंवर टीका केली नाही. बाळासाहेब ठाकरे यांना त्यांनी कायमच आपले आदर्श आहेत असंच म्हटलं. त्यांचा सगळा रोष होता तो उद्धव ठाकरेंवर. नारायण राणे काँग्रेसमध्ये गेल्यानंतरही तो रोष त्यांच्या मनात कायम राहिला. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्यावर आणि भाजपमध्ये गेल्यानंतर मंत्रिपद मिळाल्यानंतरही तो कायम राहिला. अर्थातच हा रोष शिवसेना विरूद्ध नारायण राणे असाही दिसून आला. त्याची झलक आपण जन आशीर्वाद यात्रेत पाहिली. त्यावेळी नारायण राणेंनी केलेली वक्तव्यं, त्यानंतर त्यांना झालेली अटक आणि सुटका. त्यानंतर झालेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी.. हे सगळं महाराष्ट्राने जवळून पाहिलं.

आता शनिवारी हे दोन दिग्गज एकाच मंचावर येणार त्यामुळे दोन दिग्गज काय बोलणार ते महाराष्ट्राला काहिसं अपेक्षित होतं. दोघांनीही एकमेकांचा खरपूस समाचार घेतला. प्रोटोकॉलप्रमाणे नारायण राणे हे आधी बोलले आणि मुख्यमंत्री सर्वात शेवटी. नारायण राणे यांनी जी उदाहरणं आपल्या भाषणातून दिली त्याला उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या परिने उत्तर दिलं. दोन्ही भाषणं कोकणातल्या धुमशानाची आठवण करून देणारी ठरली यात शंकाच नाही.

काय म्हणाले नारायण राणे?

आजच्या कार्यक्रमाचा मला खूप आनंद होतो आहे. मात्र इच्छा नसतानाही मला राजकारण या कार्यक्रमात आणावं लागतं आहे असं म्हणून नाराय़ण राणे यांनी प्रहार करण्यास सुरूवात केली. चिपी विमानतळ व्हावं ही माझी इच्छा होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्याला बाळासाहेब ठाकरेंनी पाठवलं. त्या जिल्ह्याचा काहीही विकास झाला नव्हता. तो विकास करण्यापासून आता विमानतळाच्या निर्मितीसाठी आपण झटलो आहोत असं नारायण राणे यांनी सांगितलं. त्यानंतर ते म्हणाले मी उद्धव ठाकरेंना एक विनंती करू इच्छितो. त्यांनी हे फोटो बघावे, आम्हाला विमानतळ नको हे म्हणणाऱ्या आंदोलकांचे फोटो आहेत. 2009 मध्ये हे आंदोलन कुणी केलं होतं बघा.

.

नारायण राणे/ट्विटर हॅण्डल

अर्थातच नारायण राणे यांचा अंगुलीनिर्देश हा शिवसेनेकडे होता. शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी त्यावेळी आंदोलन केलं आणि आता या कामाचं श्रेय घेऊ पाहात आहेत असं नारायण राणेंनी सुनावलं. विनायक राऊत मला पेढा द्यायला आले तेव्हा मी अर्धा पेढा घेतला मी त्यांना म्हणालो या पेढ्याचा गुणधर्म गोड आहे तो आत्मसात करा आणि बोलायचं तेव्हा हसत बोला. 1990 ला बाळासाहेब ठाकरेंनी मला सिंधुदुर्गात पाठवलं. त्यानंतर मी या जिल्ह्याचा विकास केला. उद्धवजी तुम्हाला मी हे सांगू इच्छितो की बाळासाहेब ठाकरेंच्या प्रेरणेतून मी विकासाचं काम केलं आहे. कोणतंही राजकारण करू नये असं मला वाटत होतं, सिंधुदुर्गाच्या चिपी विमानतळावरून विमान उडताना पाहावं आणि आनंद साजरा करावा असंच मला वाटत होतं. मंचावर येण्यापूर्वी मुख्यमंत्रीसाहेब माझ्या कानात काहीतरी बोलले मात्र मला ते ऐकू गेलं नाही एक शब्द कानावर पडला... असो..सिंधुदुर्गाला आर्थिक समृद्धी यावी असा माझा मानस होता

तुम्ही समजता तशी परिस्थिती आज नाही. तेव्हा काही गोष्टी होत्या. सन्मानीय आदित्य ठाकरेंनी इथला अभ्यास करावा, 481 पानांचा रिपोर्ट वाचावा. धरणाला एक रूपया अद्याप दिलेला नाही. काय विकास झाला? या एअरपोर्टलाही पाणी नाही. सबस्टेशन नाही, 34 कोटी नाही. चिपी विमानतळावर उतरल्यावर लोकांनी रस्त्यावरचे खड्डे बघायचे का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला. हा देसाई कंपनीचा प्रायव्हेट लिमिटेड कार्यक्रम आहे का? असा प्रश्नही नारायण राणेंनी विचारला. मला खोटं बोललेलं आवडत नाही असं बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे. मी जे काही केलं त्याचं श्रेय मला नको, कारण जनतेला हे ठाऊक आहे की नेमकी कुणी कामं केली आहेत.

उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंना काय उत्तर दिलं?

आता नारायण राणे यांनी इतकं सगळं बोलून दाखवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना आपल्या खास शैलीत उत्तर दिलं नसतं तरच नवल. उद्धव ठाकरे बोलायला उभे राहिले तेव्हा त्यांनी भाषणाच्या सुरूवातीलाच नारायण राणेंना टोला लगावला. 'आजचा क्षण हा मला वाटतं आदळआपट करण्याचा नाही तर आनंद व्यक्त करण्याचा आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांचं मी खास अभिनंदन करतो आहे ते इतक्या लांब राहूनही मराठी मातीचा संस्कार विसरले नाहीत.' 'मातीत बाभळही उगवते आणि आंब्याची झाडंही उगवतात. यात मातीचा दोष नाही, माती म्हणणार मी काय करू? कोकण आणि शिवसेनेचं नातं काय आहे ते सगळ्यांना माहित आहे. कोकणासमोर शिवसेना कायमच नतमस्तक झाली आहे' असं म्हणत नारायण राणेंच्या आरोपांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं.

पर्यटन म्हटलं की आपल्यासमोर गोवा राज्य येतं. कोकणचा विकास करू, कॅलफोर्निया करू अशा घोषणा अनेकांनी केल्या होत्या. मात्र हे साध्य झालं ते आमच्या सरकारच्या काळात हे विसरू नये. ज्योतिरादित्य शिंदे यांनी स्वतःहून बैठक बोलले. शिर्डीचा विमानतळ, चिपीचा विमानतळ, जळगाव, अमरावती याबद्दल ते प्रचंड तळमळीने बोलत होते. पोटातून तळमळीने बोलणं वेगळं असतं. मळमळीने बोलणं आणखी वेगळं असतं असंही म्हणत त्यांन पुन्हा एकदा नारायण राणे यांना लगावला.

एक काळ होता की मी एरियल फोटोग्राफी करत असे. त्यावेळी मी गड किल्ल्यांचे फोटो काढले होते. आता मला कुणीतरी ही माहिती द्या... सिंधुदुर्गचा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे हे मान्य करू, कुणीतरी म्हणेल की मीच बांधला. असं म्हणत त्यांनी नारायण राणेंना जोरदा टोला लगावला.

कोकणच्या विकासाच्या गरूडझेपेला आज सुरूवात झाली आहे. हे सगळं सुंदर सुरू आहे, नजर लागू नये म्हणून तीट लावतात ना तशीही काही लोकं व्यासपीठावर बसली आहेत. नारायण राणेंनी विकासासाठी अनेक गोष्टी केल्या, त्यांचे मी धन्यवाद देतो. मात्र नारायण राणेंनी जे सांगितलं ते देखील खरं आहे की बाळासाहेबांना खोटं बोललेलं खपत नव्हतं. जे खोटं बोलत होते, त्यांना बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेच्या बाहेर हाकलून दिलं हा देखील इतिहास आहे त्यात मी फार काही पडत नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत नारायण राणे यांचं नाव न घेता खडे बोल सुनावले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

दरम्यान हा कार्यक्रम झाल्यानंतर काही माध्यमांनी नारायण राणे यांच्याशी संवाद साधला. त्यांच्याशी बोलताना नारायण राणे म्हणले की कोकणासाठी मुख्यमंत्र्यांनी काय जाहीर केलं ते सांगा? पाहुणे निदान एक दिवस राहतात तरी. मात्र हे आले आणि लगेच निघून गेले. कोकणातल्या कार्यक्रमाला आले ते चांगलंच झालं पण कोकणासाठी काहीही जाहीर करण्यात आलं नाही. जी टीका मुख्यमंत्र्यांनी भाषणात केली त्याबाबत विचारलं असता नारायण राणे म्हणाले की त्यांनी करायचं म्हणून भाषण केलं.

मुख्यमंत्र्यांनी कोणत्या माझ्या मुद्द्याला उत्तर दिलं नाही. त्यांनी माझ्या एका तरी मुद्द्याला उत्तर दिलं का? त्यांचं एक तरी वाक्य पूर्ण होतं का? पूरपरिस्थिती, वादळाची थकबाकी बाकी आहे. त्यातील एक रुपया तरी त्यांनी दिला का? त्यांनी काय दिलं ते तरी सांगा. विनायक राऊतांनी विमानतळाला विरोध केला होता. हे मी त्यांना सांगितलं. त्यावर ते काहीच बोलले नाही. त्यांच्या भाषणाला मी भाषण मानत नाही. त्यात काही मुद्देच नव्हते असंही राणे म्हणाले. त्यामुळे चिपी विमानतळ सोहळा चर्चेत राहिला असला तरीही तो गाजला तो दिवाळीच्या आधी कोकणात झालेल्या या राजकीय शिमग्यामुळे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in